सभापतीपदासाठी आज निवडणूक

सभापतीपदासाठी आज निवडणूक

>> राजेश पाटणेकर – प्रतापसिंह राणे यांच्यात लढत

गोवा विधानसभेच्या आज मंगळवार दि. ४ रोजी होणार असलेल्या खास अधिवेशनात राज्याच्या नव्या सभापतींची निवडणूक होणार असून त्यासाठी या कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले कॉंग्रेसचे प्रतापसिंह राणे व भाजपचे राजेश पाटणेकर यांच्यात लढत होणार आहे. कार्यवाहू सभापती मायकल लोबो यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११.३० वा. ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. काल सकाळी प्रतापसिंह राणे यांनी कॉंग्रेसतर्फे तर राजेश पाटणेकर यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज सादर केले.

दरम्यान, भाजप हा सध्या गोवा विधानसभेतील सर्वांत मोठा एकेरी पक्ष असून त्यांच्या आमदारांची संख्या १७ एवढी आहे. भाजप सरकारचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डच्या आमदारांची संख्या ३ आहे. तर ३ अपक्ष आमदार असून त्यांचा भाजप आघाडीला पाठिंबा आहे.

दुसर्‍या बाजूने विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या १५ एवढी असून एक मगो व एक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आमदार आहे. प्रतापसिंह राणे यांनी कॉंग्रेसचे केंद्रीय निरीक्षक चेल्लाकुमार, रवी नाईक, इजिदोर फर्नांडिस, दिगंबर कामत, जेनिफर मोन्सेरात, फिलीप नेरी रॉड्रिग्स, चंद्रकांत कवळेकर आदींच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर केला. तर राजेश पाटणेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, मंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत अर्ज सादर केला.

उमेदवारीबाबत कॉंग्रेस
गंभीर ः दिगंबर कामत
यावेळी भाजपचे उमेदवार राजेश पाटणेकर यांनी बहुमत आपल्या बाजूने असल्याने आपणच निवडून येऊ असा दावा अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला. तर प्रतापसिंह राणे यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना दिगंबर कामत यांनी सांगितले की, राणे यांच्यासारख्या सर्वात ज्येष्ठ आमदाराला उमेदवारी देऊन या निवडणुकीबाबत आम्ही गंभीर असल्याचा संदेश कॉंग्रेसने दिला आहे.