सनी, अमिन बांगलादेश संघात

0
132

>> भारताविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका

भारताविरुद्धच्या तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश संघात डावखुरा फिरकीपटू अराफत सनी व जलदगती गोलंदाज अल अमिन हुसेन यांचे पुनरागमन झाले आहे. अफगाणिस्तान व झिंबाब्वे यांचा समावेश असलेल्या तिरंगी टी-ट्वेंटी मालिकेतून विश्रांती घेतलेला सलामीवीर तमिम इक्बाल याचे संघात पुनरागमन झाले आहे. सनी व हुसेन यांनी २०१६ साली शेवटचा टी-ट्वेंटी सामना खेळला होता. यानंतर त्यांचा विचार करण्यात आला नव्हता. ३३ वर्षीय सनी याने १० टी-ट्वेंटीमध्ये १२ बळी घेतले आहेत. २०१६ सालच्या आयसीसी टी-ट्वेंटी स्पर्धे दरम्यान त्याची गोलंदाजी शैली अवैध आढळून आली होती.

त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. २०१७ साली कौटुंबिक वादामुळे त्याला दोन महिने तुुरुंगाची हवादेखील खावी लागली होती. वैविध्यतेपेक्षा दिशा व टप्पा राखणारा गोलंदाज म्हणून सनीकडे पाहण्यात येते. याच कारणास्तव त्याची निवड केल्याचे निवड समिती प्रमुख मिन्हजुल अबेदिन यांनी सांगितले. प्रमुख वेगवान गोलंदाज जायबंदी असल्यामुळे अल अमिनला संधी मिळाली आहे. सब्बीर रहमान, नझमुल हुसेन शांतो, रुबेल हुसेन व ताईजुल इस्लाम या चौकडीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. टी-ट्वेंटी मालिकेची सुरुवात ३ नोव्हेंबर रोजी फिरोजशाह कोटला मैदानावर होईल. दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे राजकोट व नागपूर येथे ७ व १० नोव्हेंबर रोजी खेळविला जाणार आहे.

बांगलादेश संघ ः शाकिब अल हसन, तमिम इक्बाल, लिटन दास, सौम्य सरकार, मोहम्मग नैम शेख, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला रियाद, अफिफ हुसेन, मोसद्देक हुसेन, अमिनूल इस्लाम, अराफत सनी, मोहम्मद सैफुद्दिन, अल अमिन हुसेन, मुस्तफिझुर रहमान व शफिउल इस्लाम.