ब्रेकिंग न्यूज़

सद्य आर्थिक परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करावी का?

  • शशांक मो. गुळगुळे

पुढील दोनतीन वर्षांनंतर अमेरिकेत फार मोठी मंदी येणार असल्याचे भाकित अर्थतज्ज्ञ वर्तवीत आहेत. त्यावेळी सोन्यातली गुंतवणूक विशेष फायदेशीर ठरणार नाही. डॉलरच्या तुलनेत रुपया वधारेल व सोने उतरेल.

 

जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात गेल्या एका वर्षात २० टक्के वाढ झाली तर गेल्या तीन महिन्यांत १४ टक्के वाढ झाली. आपल्या देशात गेल्या एका वर्षात सोन्याचे दर २३ टक्क्यांनी वधारले तर गेल्या तीन महिन्यांत १५ टक्क्यांनी वधारले.

सोन्यात गुंतवणुकीचे पर्याय
सोव्हरीन गोल्ड बॉण्डस् ः हे बॉण्डस् रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया- भारत सरकारच्या वतीने विक्रीस काढले. या बॉण्डस्‌मध्ये गुंतवणूकदाराला १ ग्रॅम सोन्याच्या पटीत गुंतवणूक करता येते. कमाल ४ किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीचा कालावधी ८ वर्षे आहे. पण पाच वर्षांनंतरही योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यावर २.५ टक्के दराने व्याज मिळते. यात गुंतवणूकदारांसाठी सोन्याचा दर ठरविताना ज्या दिवशी बॉण्डस्‌ची विक्री सुरू होणार आहे त्याच्या तीन दिवस अगोदर ९९९ शुद्धतेच्या सोन्याचा व २४ कॅरेट सोन्याचा जो भाव होता त्याची सरासरी काढून बॉण्डस् विक्रीसाठी सोन्याचा दर ठरविला जातो. मुदतपूर्तीच्या वेळीही याच पद्धतीने दर ठरविला जाऊन गुंतवणूकदाराला पैसे परत केले जातात. हे बॉण्डस् मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात ‘लिस्ट’ करण्यात येतात. गुंतवणूकदार बॉण्डस् विक्रीचा कालावधी संपल्यानंतर शेअरबाजारातून बाजारी मूल्याने हे बॉण्डस् विकत घेऊ शकतो. गुंतवणूकदारांना जर रोख रक्कम देऊन बॉण्डस् खरेदी करावयाचे असतील तर ते कमाल २० हजार रुपयांपर्यंतच असे बॉण्डस् खरेदी करू शकतात. जर ‘ऑनलाईन’ पद्धतीने बॉण्डस् खरेदी केले तर प्रत्येक बॉण्डस्‌मागे रुपये ५० ‘डिस्काऊंट’ दिले जाते. हे बॉण्डस् गणेशोत्सवाच्या कालावधीत ९ सप्टेंबर २०१९ ते १३ सप्टेंबर २०१९ या कालावधीत विक्रीस काढण्यात येणार आहेत. बँका, शेअर बाजार, पोस्ट ऑफिस व अन्य काही ठरविलेल्या ठिकाणांवरून हे बॉण्डस् खरेदी करता येतात.

ईटीएफ
गोल्ड ईटीएफस् आणि फंडस् ः म्युच्युअल फंडस् कंपन्यांच्या ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंडस्’ या योजना आहेत. या योजनांत जमा होणारा निधी म्युच्युअल फंड कंपन्या सोन्यात (फिजिकल गोल्ड) गुंतवितात. ईटीएफचे एक युनिट १ ग्रॅमचे असते. गुंतवणूकदारांना या युनिटमध्ये गुंतवणूक करावी लागते. या म्युच्युअल कंपन्यांनी जेवढे युनिट विकले असतील तेवढे सोने (फिजिकल सोने) ‘कस्टोडियन’ बँकेकडे ठेवावे लागते. या सोन्याचे वेळोवेळी मूल्यांकन केले जाते. ‘सिक्युरिटीज ऍण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’च्या (सेबी) नियमांनुसार म्युच्युअल फंड कंपन्यांना जेवढे ईटीएफ योजनेत सोने विकले तेवढे फिजिकल सोने कस्टोडियन बँकेकडे ठेवावे लागते. गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा नियम करण्यात आला आहे. देशांतर्गत सोन्याच्या दरांनुसार गुंतवणूकदारांना या योजनेत परतावा मिळतो. यात गुंतवणूक करणार्‍यांचे डिमॅट खाते असणे बंधनकारक केलेले आहे. या योजनेतील सर्व व्यवहार हे गुंतवणूकदाराच्या ‘डिमॅट’ खात्यामार्फतच केले जातात. इतर प्रकारच्या म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूकदार ज्याप्रमाणे गुंतवणूक करतात, त्याच प्रकारे यात गुंतवणूक करता येते.
फिजिकल गोल्ड- धातू स्वरूपातील सोने बाळगणे ः सोन्यात गुंतवणुकीच्या विविध योजना/विविध पर्याय अस्तित्वात येण्यापूर्वी लोक दागिने बनवून, नाणी किंवा बार या स्वरूपात सोने बाळगत होते. सोन्याबद्दल भारतीयांना प्रचंड आकर्षण आहे. ते सोन्याकडे गुंतवणूक म्हणून न पाहता घरी सोने असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानतात. मुलीचा सालंकृत विवाह करणे ही हिंदूंची पद्धती आहे. म्हणजे मुलीच्या अंगावर दागिने घालून तिला सासरी पाठवणे ही हिंदूंची रीत आहे. आपल्या देशात जेवढे सोने लागते तेवढे आपल्या देशात सोने उत्पादित होत नाही म्हणून आपण परकीय चलन वापरून फार मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो. आपला देश इंधन व सोने हे फार मोठ्या प्रमाणावर आयात करतो. त्यामुळे आपल्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असते. हे देशाच्या आर्थिकदृष्ट्या बरोबर नाही.

तुम्ही दागिने बनविले तर त्याला घडणावळ शुल्क द्यावे लागते. जे साधारणपणे सोन्याच्या किमतीच्या १५ टक्के असते. आणि जर सोने विकले तर घडणावळीवर केलेला खर्च विचारात घेतला जात नाही व सोनेधारकाचे नुकसान होते. सरकारने बीआयएस- होलमार्क ५ ग्रॅम , १० ग्रॅम व २० ग्रॅमचे सोन्याचे बार विक्रीस काढले आहेत. ही नाणी व बार २४ कॅरेट शुद्धतेचे आहेत. शासन ही विक्री मेटल्स ऍण्ड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एमएमटीसी) या सार्वजनिक उद्योगातील कंपनीमार्फत करीत आहे. ही नाणी व बार एमएमटीसीच्या विक्री केंद्रात व काही बँकांत विक्रीस उपलब्ध आहेत. तुम्हाला पैशांची गरज असल्यास ही नाणी किंवा बार एमएमटीसी ती परत घेते व विक्रेत्याला त्या वेळच्या बाजारी दराने पैसे देते. काही काही सोन्याच्या पेट्या ग्राहकांसाठी योजना जाहीर करतात की ठराविक कालावधीसाठी पैसे भरा व नंतर कालावधी संपल्यावर अमुक सोने घ्या. या गुंतवणुकीत जोखीम आहे. पेटी नावाजलेली असेल तर ठीक, पण यात फसवणूकही होऊ शकते.

डिजिटल गोल्ड ः ही सुविधा एमएमटीसी- पॉच प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे उपलब्ध आहे. एमएमटीसी- पॅम्प प्रा. लि. ही कंपनी भारतातील एमएमटीसी कंपनी स्वित्झर्लंड येथील पॅम्प एस यांची संयुक्त प्रकल्पातील कंपनी आहे. ही कंपनी सोन्याची खरेदी संस्था, ब्रोकिंग कंपन्या, पेटीएम, स्टॉक होलिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व अन्य यांच्यामार्फत ‘ऑनलाईन’ करते. यात गुंतवणूकदार प्रत्येक खरेदीच्या वेळी एक हजार रुपयांपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. जमा झालेले सोने एमएमटीसी- पीएएपीएलच्या सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवले जाते. याचा विमा पूर्ण उतरविलेला असतो. गुंतवणूकदार ‘डिलिव्हरी’ घेताना वेगवेगळ्या आकाराची नाणू मागू शकतो. किमान १ ग्रॅमपासून नाण्याची डिलिव्हरी मिळू शकते. सोने कस्टडीमध्ये जास्तीत जास्त पाच वर्षे ठेवले जाते. त्या कालावधीत डिलिव्हरी घेणे बंधनकारक आहे.

गुंतवणूक धोरण म्हणून सोन्यात गुंतवणूक करू नका. सध्या सोन्याचे भाव वधारलेले आहेत, पण ते खालीही येऊ शकतात. शेअरच्या भावाप्रमाणे सोन्याचे दर दररोज बदलत असतात. पुढील दोनतीन वर्षांनंतर अमेरिकेत फार मोठी मंदी येणार असल्याचे भाकित अर्थतज्ज्ञ वर्तवीत आहेत. त्यावेळी सोन्यातली गुंतवणूक विशेष फायदेशीर ठरणार नाही. डॉलरच्या तुलनेत रुपया वधारेल व सोने उतरेल. गुंतवणूकदाराकडे जितका निधी गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे त्याच्या १० ते १५ टक्के रक्कमच सोन्यात गुंतवावी. ज्यांना नजीकच्या भविष्यात पैशाची गरज लागणार नाही अशांनी सोव्हरिन गोल्ड बॉण्डस्‌मध्ये गुंतवणूक करावी. तरुण पिढीचे सोन्याचे आकर्षण पूर्वीच्या पिढीतल्या महिलांच्या तुलनेत फार कमी झाले आहे. तरुण पिढीला सोन्यापेक्षा हिरे व प्लॅटिनमचे दागिने आवडतात. तसेच भविष्यात पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळेही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलीच्या किंवा मुलींच्या लग्नासाठी फार मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा करू नये. याऐवजी मुलींसाठी शासनाच्या सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करावी. सोव्हरिन गोल्ड बॉण्डस् हा दीर्घमुदतीसाठी चांगला पर्याय आहे. कारण यात वेळोवेळी व्याज मिळणार आणि दीर्घ मुदतीच्या कॅपिटल गेन्सच्या कक्षेत ही गुंतवणूक येत नाही. गुंतवणूक केलेला पैसा कधीही परत मिळायला हवा अशांनी ‘ईटीएफ’मध्ये गुंतवणूक करावी. फिजिकल गोल्ड जास्त जवळ बाळगू नये. जोखीम असते. हे असल्यास घरफोडी वगैरेही होऊ शकते. ते जर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले तर लॉकरचे भाडे भरावे लागते म्हणून कमीत कमी ‘फिजिकल’ गोल्ड बाळगावे.