ब्रेकिंग न्यूज़

सदराचं नाव ः ॥ मनःशांती उपनिषदांतून ॥ मनःशांतीचा झरा

  • प्रा. रमेश सप्रे

गुरुच्या जवळ जाऊन खाली बसणे म्हणजे पायाजवळ बसून ज्ञानविद्या ग्रहण करणे याला उपनिषद म्हणायचं. काळाच्या ओघात लिपीचा विकास होऊन हे ज्ञान शब्दबद्ध झालं. ग्रंथबद्ध झालं. भगवद्गीतेला ‘उपनिषदांचं उपनिषद किंवा उपनिषदांचं सार म्हणतात. कारण गीतेत विविध उपनिषदातील विचारसरणीचा हृद्य समन्वय किंवा संगम झालाय.

म. गांधीजींचं एक वाक्य आहे. ‘समजा जगातली सर्व पुस्तकं जळून गेली; उपनिषदातीलसुद्धा एकच पुस्तक जळताना वाचवलं गेलं- ‘ईशावास्योपनिषद’, समजा ते वाचवत असताना फक्त पहिला मंत्र उरला नि तो जळण्यापासून वाचवताना त्याचा फक्त पहिला चरण उरला, तर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन मी पुन्हा सर्व वाङ्‌मय निर्माण करीन.’ यात गांधीजींना इतर वाङ्‌मयासंबंधी काही सांगायचं नव्हतं, तर उपनिषदांचं विलक्षण सर्जनशील सामर्थ्य वर्णन करायचं होतं.

ईशावास्य उपनिषदाचा इतका प्रभावी श्‍लोकचरण कोणता?
तर ‘ईशावास्यम् जगत् सर्वम्’. हे जे सारं जग दिसतं त्यात परमेश्‍वराचा वास- निवास- सहवास प्रत्ययाला येतो. तसा तो यायला लागला तर मनःशांती किंवा आत्मानंद दूर नाही.
उपनिषदांनाच वेदांत किंवा श्रुती असंही म्हणतात. वेदाचे तीन भाग असतात- उपासनाकांड, भक्तिकांड नि ज्ञानकांड. अंतिम भागात ज्ञान सांगितलं गेलंय त्याला वेदांत म्हणतात. मुळात वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान- शुद्ध ज्ञान. ते उत्स्फूर्तपणे प्रकटलं प्रतिभावंत नि अनुभवी ऋषीमुनींच्या मुखातून. त्यावेळी त्या ऋषीमुनींची समाधिअवस्था होती. देहभान विसरल्याशिवाय असं साक्षात् ज्ञान प्रकटत नाही. म्हणून काही विद्वान वेदांना ‘अपौरुषेय’ म्हणतात. एका अर्थानं ही प्रतिभेची देणगी असते. नक्षत्रांचं देणं असतं. संत तर उपनिषदांना श्रुतिमाऊली म्हणतात. उपनिषदांची निर्मिती करतानाच नव्हे तर त्यांचं वाचन- मनन- चिंतन करतानाही माहेरी (आईच्या घरी) गेल्यासारखं वाटतं.
उपनिषदांचे विषय जरी निसर्ग, मानवी मन यातली रहस्य सांगणारे सूक्ष्म, गहन वाटले तरी ते मांडण्याची पद्धती फार प्रसन्न नि उद्बोधक आहे. मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट सांगताना निरनिराळ्या ऋषींची विवरण पद्धती वेगळी आहे. पण मुख्य विषय एकच आहे. खरं पाहायचं तर उपनिषद ही ज्ञान देण्याची नि मिळवण्याची एक पद्धती आहे. ती एक प्रकारची शिक्षण-पद्धती आहे. उपनिषद या शब्दाच्या अर्थातच ती व्यक्त झालीय.

उप, नि आणि सद् असे तीन शब्द उपनिषद या शब्दात आहेत. यांचा अर्थ ‘जवळ खाली बसणं’. अर्थातच गुरुंच्या जवळ ज्ञानार्जनासाठी जायचं (पालक मुलांना असं घेऊन जातात त्याला ‘उपनयन’ म्हणतात. मुंज किंवा व्रतबंध विधीनंतर गुरुगृही अध्ययनासाठी जात असत.) गुरुच्या जवळ जाऊन खाली बसणे म्हणजे पायाजवळ बसून ज्ञानविद्या ग्रहण करणे याला उपनिषद म्हणायचं. काळाच्या ओघात लिपीचा विकास होऊन हे ज्ञान शब्दबद्ध झालं. ग्रंथबद्ध झालं. भगवद्गीतेला ‘उपनिषदांचं उपनिषद किंवा उपनिषदांचं सार म्हणतात. कारण गीतेत विविध उपनिषदातील विचारसरणीचा हृद्य समन्वय किंवा संगम झालाय. हा समन्वय भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेल्या दैवी वाणीला तेवढंच सामर्थ्य असलेल्या महर्षी व्यासांनी शब्दांकित केलं. म्हणून भगवद्गीता दिव्य नि अमर होऊन गेली.

या उपनिषदांवर आद्यशंकराचार्यांनी भाष्य करून त्याचे गद्य ग्रंथ सादर केले हे त्यांचे मानवजातीवर केलेले चिरंतन उपकारच आहेत.
तेजस्वी बुद्धिमत्ता असलेले ऋषीमुनी, देवत्वाचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण आणि अलौकिक प्रतिभा असलेले महर्षी व्यास हा जर वाङ्‌मयीन त्रिवेणीसंगम असेल तर आद्यशंकराचार्य हे त्या त्रिवेणीसंगमावरचं ज्ञानाचं प्रयाग क्षेत्र आहे.
या संदर्भात अलीकडच्या काळात आपल्या देशात जे अस्सल विचारवंत होऊन गेले त्यात अग्रभागी असलेल्या विद्वान् नानी पालखीवालांचं मत पाहण्यासारखं आहे.

‘मानवाच्या बुद्धीची सर्वोच्च झेप उपनिषदात दिसून येते. त्याचा अर्क काढून ‘अद्वैत सिद्धांत’ जगापुढे मांडणारे आद्य शंकराचार्य ही मानवाच्या इतिहासातली सर्वांत बुद्धिमान व्यक्ती असू शकते.’
एवढंच नव्हे तर एकविसाव्या शतकातील मानवानं विशेषतः युवावर्गानं, उपनिषदांचा चांगला अभ्यास केला पाहिजे. त्यातला ज्ञानमार्ग व ज्ञान हे आजच्या विज्ञानाला पूरक आहे. परमेश्‍वराकडे म्हणजेच अखंड आनंदाकडे जाण्याचे चार प्रमुख मार्ग सांगितलेयत. ज्ञानमार्ग- कर्ममार्ग- भक्तिमार्ग नि ध्यानमार्ग. निरनिराळ्या आचार्यांनी, विद्वानांनी अर्थातच एकाच ग्रंथाचे अनेक अंगांनी अर्थ लावलेयत. त्याचप्रमाणे जीवनाची चार महत्त्वाची ध्येयं (गोल्स ऑफ् आइफ) सांगितलीयत- धर्म- अर्थ- काम- मोक्ष. हीसुद्धा परस्पर पूरक असून सर्वांचा उद्देश आनंद- समाधान- शांती यांची प्राप्ती हाच आहे.

जीवनाची चार टप्प्यांची व्यवस्था आहे. त्याचंसुद्धा अंतिम ध्येय आनंद किंवा शांती यांची प्राप्ती हेच होय. ब्रह्मचर्याश्रम- गृहस्थाश्रम- वानप्रस्थाश्रम- सन्यासाश्रम या परस्परपूरक जीवनावस्था आहेत. हे करतानाही शांती- समाधान- आनंद यांची प्राप्ती हेच उद्दिष्ट समोर ठेवलंय.
या सर्वांचं प्रातिनिधिक रूप नि स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष भगवंतानं सांगितलेली- गीता. एक श्‍लोक सर्वपरिचित आहे. तो फार चित्रदर्शी तसाच रुपकात्मकही आहे. डोळ्यासमोर प्रत्यक्ष चित्र उभं राहतं म्हणून चित्रदर्शी नि एका सुंदर रुपकातून एक महान जीवनसंदेश दिला गेलाय म्हणून रुपकात्मक किंवा प्रतीकात्मक. हा श्‍लोक गीतामाहात्म्य वर्णन करताना सांगितला गेलाय-

* सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः |
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥

अर्थ फार छान आहे….
सर्व उपनिषदं या गाई (गावो) आहेत. त्यांचं दूध काढणारा (दोग्धा) आहे साक्षात् गोपालनंदन कृष्ण. आपल्या तान्ह्यानं (वासरानं) ढुशा दिल्याशिवाय गोमाता आपला पान्हा सोडत नाही. एकदा पान्हा सुटला की घरातील तान्ह्या- कान्यासाठी दूध काढलं जातं. नंतर पुन्हा वासरासाठी ठेवलं जातं. असं म्हणतात की आदर्श गवळी गाईच्या चार स्तनांपैकी एका स्तनातलं दूध पूर्णपणे वासरासाठी राखून ठेवतो. शेवटच्या थेंबापर्यंत स्वार्थासाठी दूध पिळून घेत नाही. या क्रियेला दोहन म्हणतात. पृथुराजानं गोमाता जिचं प्रतीक आहे, अशा पृथ्वीचं दोहन केलं. निर्माण झालेल्या अन्न- धान्यावर सर्वांचा अधिकार मान्य करून पशु- पक्षी- अनाथ- अतिथी सार्‍यांचा वाटा आधी काढून नंतर उर्वरित अन्नाचं सेवन करत राहिला.

आज पर्यावरण रक्षण, पृथ्वीवरील जैव विविधतेचं (बायो डायव्हर्सिटी) जतन करण्यासाठी पृथु, गोपालकृष्ण यांनी अवलंबलेलं दोहनसूत्र कल्याणकारी आहे. पाश्चात्त्य संस्कृती सर्व नैसर्गिक साधनसामग्रीचा अखेरच्या थेंबापर्यंत, शेवटच्या कणापर्यंत उपभोग घेण्यावर म्हणजेच शोषण करण्यावर अजूनही भर देते आहे. त्याऐवजी हे दोहन तत्त्व विश्‍वकल्याणकारी आहे.

पोषण हवं, शोषण नको; तोषण (आनंद देणारं) हवं, केवळ भक्षण्य (उपभोग) नको- हे ज्या दिवशी मानवजातीच्या विविध क्षेत्रातील नेत्यांना कळेल तो दिवस विश्‍वशांतीसाठी सुदिन असेल. उपनिषदातील गुरु-शिष्य संवादात ऋषींची हीच विशाल दृष्टी दिसून येते.

* सर्वेऽत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः|
सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॥

ही त्यांची केवळ प्रार्थना नव्हती, तर प्रतिज्ञाही होती. त्यांचे सारे विचार- उच्चार- आचार या आदर्श जगतासाठी नि आनंदी मानवजातीसाठीच होते. इतकंच नव्हे तर त्याचा सर्वत्र सुरु असलेला संचारही हाच संदेश देऊन जात असे.
अशा विचारमंथनात नि अशा आचारयज्ञात सदैव गुंतलेले असल्याने ‘तयांचे विसाट शब्द ‘सुखे म्हणो येती वेद॥ ही वस्तुस्थिती होती. उपनिषदात त्यांच्या विचारांची कल्पनांची उंची दिसून येते. या दृष्टीनं काही उपनिषदं प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर आद्यशंकराचार्यांनी भाष्यग्रंथ लिहून त्यांचं आकलन अनेकांना सोपं करुन दिलं.
पुढे संतमंडळींनी ते प्राकृत (मराठी) भाषेत आणून सामान्य जनांना कळेल अशा पद्धतीनं वर्णन करून सांगितलं- ‘वेदांचा अर्थ’ म्हणताना उपनिषदांचा, गीतेचा अर्थ आम्हालाच ठाऊक आहे. कारण आमच्या (म्हणजे संतांच्या) वागण्यातून तो अर्थ व्यक्त होतो. अर्थ समजल्याशिवाय तो जीवनात कसा काय उतरेल? वेदशास्त्रसंपन्न पंडितांना जर ‘एकोऽहं बहुस्याम् प्रजायेय’ (मी एकच या सृष्टीतील सर्व रुपं निर्माण करून त्यांच्यात व्यापून राहिलोय) हे कळलं असतं तर अस्पृश्यता अस्तित्वातच आली नसती. समाजातील सर्व प्रकारची विषमता नष्ट झाली असती. पण तसा अनुभव येत नाही कारण विद्वान अशा द्विवेदी- त्रिवेदी- चतुर्वेदी मंडळींचे वेद (म्हणजे संहिता- टेक्स्ट) मुखोद्गत म्हणजे पाठ असतात. पण ते पाठांतर पोपटासारखं असतं. नुसता ध्वनी, उच्चार या गोष्टींकडे लक्ष असतं (ही अर्थातच चांगली गोष्ट आहे) पण अर्थावर चिंतन नि त्याचं व्यवहारात उपयोजन (ऍप्लिकेशन) नसतं.
परंपरेनं पहिलं उपनिषद ‘ईशावास्य’ उपनिषद मानलं जातं. फक्त अठरा मंत्रांचं हे उपनिषद सार्‍या जीवनाला- जगाला- विश्‍वाला स्पर्श करतं. फारच खोल नि सुंदर विचार यातील मंत्रामंत्रात ठासून भरलाय. त्याच्या पहिल्या मंत्राचा पहिला चरण फक्त चिंतनासाठी घेतला तरी अक्षय आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आपली तयारी होईल. कोणता आहे तो पहिला चरण?- ईशावास्यं इदं सर्वम्‌॥
हे एक सुंदर सूत्र आहे. हे जे सारं दिसतंय ते ईश्‍वराचा निवास आहे. सोप्या भाषेत सांगाययं तर ‘कण कण में भगवान’. ज्ञानोबा माऊली म्हणते, ‘उपाधिमाजी गुप्त | चैतन्य जे सर्वगत | परि ते तत्त्वज्ञ संत | स्वीकारिती ॥
म्हणजे प्रत्येक वस्तूत किंवा पदार्थात परमेश्‍वर वसून आहे. व्यापून आहे. विष्णुसहस्रनाम स्तोत्राच्या आरंभीच ‘विश्‍वं विष्णुः’ असं म्हटलंय. याचा अर्थ आधी विश्‍व तयार केलं मग त्याच्या अणुरेणूत विष्णू व्यापून राहिला.
याचा मनःशांतीशी काय संबंध?- असं वाटू शकतं. पण जर खरंच हे सूत्र जर संपूर्ण जीवनाच्या म्हणजेच विचार- उच्चार- आचार यांचा विचार करतंय तर मला पावलोपावली यापासून योग्य प्रेरणा मिळाली पाहिजे. प्रत्येक कृती करताना योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. एवढंच नव्हे तर माझ्या क्रिया- प्रतिक्रिया- आंतरक्रिया या सार्‍यात ईश्‍वरी अंशाचं प्रतिबिंब पडलं पाहिजे.

आपल्या प्रत्येक निर्णयावर, भावनेवर, कल्पनेवर, विचारावर या तत्त्वाचा ठसा उमटायला हवा. मग काय होईल? आपली दृष्टी- वृत्ती- कृती पूर्ण बदलून जाईल. मत्सर, द्वेष, स्पर्धा, हेवादावा, भेदाभेद यांना आपल्या जीवनात काही स्थानच उरणार नाही. पाय नि मस्तक यात नीच-उच्च भाव असणार नाही. शीत- उष्ण, सजीव- निर्जीव, वनस्पती- पशु- पक्षी सार्‍यात एकाच चैतन्याचा प्रवाह वाहताना दिसेल.

कुणाशीही वैर, संघर्ष नसल्यानं मनावर ताण असणार नाही, मनात चिंता, भय, असुरक्षित भाव असणार नाही, या सार्‍याचा परिणाम म्हणून माझं मन शांत राहील. बुद्धि स्थिर होईल. चित्त शुद्ध होईल. सर्व चराचरात प्रकट असलेल्या पण न जाणवणार्‍या ईशत्वाचा म्हणजे दिव्यत्वाचा अनुभव क्षणोक्षणी येईल. मग मन शांतीनं ओतप्रोत भरुन ओसंडून वाहायला काही वेगळं करावं लागणार नाही. ‘मन करारे प्रसन्न’ असं न म्हणता निश्चितपणे म्हणता येईल… मन झालं रे प्रसन्न.. मन आहे रे प्रसन्न… मन राहे रे प्रसन्न!