सत्यमेव जयते!

  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

 

सत्य हे सर्वश्रेष्ठ नैतिक मूल्य आहे. ते स्वयंभू असते. सत्याचा अवलंब करून जीवनाचे आचरण करणार्‍याला भीतीची भावना स्पर्श करू शकत नाही. निर्भयतेच्या बळावर आपल्या ध्येयमार्गावरून तो वाटचाल करू शकतो. त्याचा हा मार्ग काट्याकुट्यांतून जाणारा व संघर्षाचा असला तरी अंतिम विजय त्याचाच होतो.

‘सत्यमेव जयते!’ हा साडेसात अक्षरांचा केवळ शब्द नाही, तो मंत्र झालेला आहे. त्या शब्दाला पावित्र्य आहे. एक तर ते आपल्या राज्यघटनेने स्वीकारलेले बोधवाक्य आहे. राष्ट्रसंचिताचे दोहन करून आपल्याकडील प्रज्ञावंतांनी ते स्वीकारलेले आहे. ‘मुंडकोपनिषदा’तून ते घेतलेले आहे. मूळ वचन आहे ः
सत्यमेव जयते | नानृतं सत्येन पन्थः विततो देवयानः ॥
याचा अर्थ असा की सत्याचाच विजय होतो. अनृताचा म्हणजे असत्याचा होत नाही. देवयान मार्ग सत्याने युक्त आहे.

सत्य हे सर्वश्रेष्ठ नैतिक मूल्य आहे. ते स्वयंभू असते. सत्याचा अवलंब करून जीवनाचे आचरण करणार्‍याला भीतीची भावना स्पर्श करू शकत नाही. निर्भयतेच्या बळावर आपल्या ध्येयमार्गावरून तो वाटचाल करू शकतो. त्याचा हा मार्ग काट्याकुट्यांतून जाणारा व संघर्षाचा असला तरी अंतिम विजय त्याचाच होतो. सत्य किती निखळ असते आणि किती निस्तुल असते हे सिद्ध करण्यासाठी त्याला तेवढी किंमत मोजावीच लागते. खडतर प्रवास करावा लागतो. असत्याचे आचरण करणार्‍यांना आपले पितळ कधीही उघडे पडू शकेल याची भीति सतत ग्रासत असते. एक असत्य पचविण्यासाठी अनेक असत्यांचा अवलंब त्याला करावा लागतो. शेवटी अशी माणसे गर्तेतच जातात. सर्वनाश हीच त्यांच्या जीवनाची इतिश्री असते. सत्याचरण ही जशी वैयक्तिक मनोधारणा आहे; तशीच ती समष्टीची विचारधारा आहे. आपल्या भारतीय भूमीत जन्म घेतलेल्या सर्व धर्मांनी सत्य या जीवनमूल्याला अग्रस्थान दिलेले आहे, हे परंपरा समजून घेताना सहजतेने लक्षात येईल. सत्त्व, रज आणि तम या मानवी मूलप्रवृत्ती. त्यांतील सत्त्वाचा आणि सत्याचा अन्योन्यसंबंध अधोरेखित करण्यासारखा आहे. सत्याने वागणारा माणूस यःकश्‍चित स्वार्थापायी अघोर पाप कधी करणार नाही. सत्य हे त्याच्या जीवनाचे व्रत असते. ते शुभ्र वस्त्राप्रमाणे स्वच्छ असते. ते कलंकित होऊ नये म्हणून सत्यव्रत माणूस जपत असतो. निदिध्यास बाळगत असतो. अशा प्रकारची माणसे समाजात अधिकाधिक निपजतात तेव्हा त्याचा दर्जा उंचावत असतो.

ऐहिक सुखाच्या परमावधीत खरे सौख्य सामावलेले नसते. ऐहिक सुखाच्या मागे लागून माणूस किती अनिष्ट मार्ग पत्करतो. याची कितीतरी उदाहरणे आपणास अनुभवायला मिळतात. पण अशा माणसांना खर्‍या जीवनाचा अर्थ कळलेला असतो का? ती सतत अस्वस्थ असतात. नव्या दिवसाच्या काळजीत असतात. त्यामुळे रात्रीची गाढ झोप त्यांना लागू शकत नाही. लिओ टॉलस्टॉयची ‘हाउ मच लँड मॅन नीड्‌स’ ही सुप्रसिद्ध कथा दुसरे काय सांगते?
आपल्या राष्ट्रीय परंपरेचे सूक्ष्म दृष्टीने अवलोकन केले तर साधनशुचिता हे तिचे प्राणतत्त्व आहे हे ध्यानात येते. आपल्या भारतवर्षाचे अंतर्बाह्य स्वरूप समजून घेण्यासाठी महाभारतासारखे महाकाव्य उपयुक्त ठरते. महाभारताचे वाचन हे केवळ आध्यात्मिक दृष्टीने केले जात नसून महाभारतीय युद्धकाळात जन्मलेली भगवद्गीता ही आपल्याला जीवनमार्गावरील एक दीपस्तंभ म्हणून अविचल निष्ठेने उभा असल्याचे दिसून येते.

जगातील पाशवी सत्ता जेव्हा लोभ, भय, असत्य, पोकळ अभिमान वगैरेसारख्या मानवी मनाला कमकुवतपणा आणणार्‍या मनोवृत्तींचा अवलंब करीत होत्या अशा वेळी आधुनिक कालखंडात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांसारख्या राष्ट्रनेत्यांनी भरकटलेल्या राष्ट्रनौकेला स्थैर्य दिले. यथार्थ मार्गदर्शन केले. त्यांनी अशावेळी पूर्वसूरींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला. नव्या युगमानसासमोर त्या जीवनमूल्यांचा अन्वयार्थ लावला. महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, अपरिग्रह आणि शांती इत्यादी जीवनमूल्यांचा अवलंब केला.
महात्मा गांधींनी भारतवर्षाच्या स्वातंत्र्याची चळवळ ज्यावेळी सुरू केली तेव्हा त्यांच्या हातात कोणते शस्त्र होते? कोणतीही शक्ती नव्हती किंवा लोकनियंत्रण करण्याचा एखादा जबरदस्त अधिकार नव्हता. पण त्यांच्या व्यक्तिमत्वात उफाळणारे तेज होते. या तेजाचा प्रचंड प्रभाव पडण्याचे कारण म्हणजे त्यात सामावलेली स्वयंस्फूर्तीने आत्मसमर्पण करण्याची शक्ती होती. ही आत्मिक शक्ती त्यांनी स्वीकारली. ती भारतीय जीवनमूल्यांतून मिळवली होती. सत्यप्रेमाच्या बळावरच त्यांनी भारतीयांची मने जिंकली.

महात्मा गांधींनी आपल्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाची उभारणी साधनांच्या शुद्धतेवर व सत्यावर भर देऊनच केलेली होती. ही त्यांच्या दृढ स्वरूपाच्या मानवतेची साक्ष देते. कारण तिचा कटाक्ष असा आहे की, स्वतःच्या वैयक्तिक अथवा सामुदायिक हक्कांसाठी लढत असताना आपण आपले अधिकार अशा तर्‍हेने प्रस्थापित केले पाहिजेत की, त्यामुळे आद्य मानवी कर्तव्याच्या बाबतीत अंतर पडता कामा नये.
सत्य आणि असत्य यांच्या संघर्षाच्या संदर्भात महाभारतीय युद्धाची कथा सर्वश्रुत आहे. प्रश्‍न सुष्ट-दुष्ट प्रवृत्तींमधील संघर्षाचा होता. दोन्ही पक्षांकडून राज्याचा हक्क सांगितला जात होता. शेवटी समेट न होता युद्धाची पाळी आली. धर्मराज सत्प्रवृत्त होता. तो म्हणाला, ‘‘मला युद्ध नको आहे. आमची मागणी संपूर्ण राज्य मिळावे यासाठी होती. दुसर्‍यांदा मागणी अर्धे राज्य मिळावे अशी होती. तीही मी सोडून देतो. आता फक्त पाच गावांची मागणी करीत आहे.’’ श्रीकृष्णाने कौरवांकडे शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला ः ‘‘तुमच्याकडे एवढे मोठे राज्य आहे. त्यांतील फक्त पाच गावं पांडवांना द्या.’’ त्यावर दुर्योधन म्हणाला, ‘‘पाच गावं तर सोडाच परंतु सुईच्या नेढ्यावर मावेल इतकी मातीदेखील पांडवांना हक्क म्हणून मी देणार नाही.’’ त्यावरून युद्ध झाले. शेवटी विजय पांडवांचाच झाला. सत्याची बाजू खरी ठरली.
सत्याच्या संदर्भात रवींद्रनाथांनी ‘बुद्धदेव’ या निबंधात मांडलेले विचार आजही मननीय वाटतात ः
‘‘मनुष्य स्वतःला प्रकट करतो तो सत्याच्या द्वारा. हे सत्य कोणते ते उपनिषदांनी सांगितले आहे ः ‘‘आत्मवत् सर्वभूतेषु यः पश्यति|’’ भूतमात्राला तो स्वतःसारखेच जाणतो, त्यानेच सत्य ओळखले असे म्हणावे. आपल्यात ज्यांनी सत्याला अशा प्रकारे जाणले, त्यांच्यामध्ये मनुष्यत्व प्रकट झाले. मानवमहिमेने ते स्वतः दैदीप्यमान झाले.
यस्तु सर्वाणी भूतानि आत्मन्येवा तु पश्यति
चात्मानं सर्व भूतेषु न ततो विजुगुप्सते|
सकलाच्या ठायी स्वतःला आणि स्वतःच्या ठायी सकलाला जो पाहू शकला तो मग गुप्त राहू शकत नाही. त्याचा प्रकाश तिन्ही त्रिकाळ पसरत असतो.

रवींद्रनाथ या संदर्भात पुढे म्हणतात ः
‘‘मनुष्यत्वाचा हा प्रकाश आज अधिकांशपणे लोकामध्ये झाकून गेल्यासारखा आहे. त्याचा काही थोडासा अंश दृष्टीस पडतो, पण बराचसा अंश दृष्टीआड दडलेलाच असतो… आजची बहुतेक माणसेही कोणी आपल्या स्वार्थात, कोणी आपल्या अहंकारात, गुरफटून आच्छन्न झालेली, आपले चैतन्य अवरुद्ध करून बसलेली अशी झाली आहेत. ज्या सत्यामध्ये आत्म्याचा सर्वत्र प्रवेश असायचा, त्या सत्याचाच विकास त्याच्या ठायी परिणत अवस्थेप्रत जाऊन पोहचलेला नाही.

मानवाचे जग आजही असंपूर्ण अवस्थेतच आहे. ह्या असंपूर्णतेच्या निबिड आवरणामधून, अधून-मधून अचानकपणे असा प्रकाशमान महापुरुष उत्पन्न झाला नसता तर, माणसातील मनुष्यत्वाचा परिचय तरी आम्हाला कसा झाला असता? आपल्या विशाल हृदयात संपूर्ण मानवजातीला स्थान देऊन भगवान बुद्धाने मनुष्याच्या सत्यस्वरूपाचे दैदीप्यमान दर्शन घडविले, हे मानवजातीचे महद्भाग्यच म्हटले पाहिजे.’’
संतांनी सत्यनिष्ठेच्या बळावर समाजधारणा केली. तुकारामांसारख्या आत्मनिष्ठ संतकवीला सत्याच्या शोधार्थ सामाजिक रुढींशी संघर्ष करावा लागला. सत्याचा कैवार निःसंदिग्ध शब्दांत त्यांनी घेतलेला आहे.
सत्य बोले निरंतर |
तोचि पुण्याचा सागर ॥
देव त्याने जिंकियेला |
तिही लोकीं मानवला ॥
सर्वांभूतीं झाला लीन |
टाकूनियां अभिमान ॥
तुका म्हणे जन्मूनिया |
शांतिसुख लाभे तया ॥
तुकारामांनी आपल्या प्रखर अनुभूतीची अभंगगाथा या सत्यसाधनेच्या पाऊलवाटेवरून अज्ञ जनांना ऐकविली. त्या वाणीचे नादनिनाद आजही समाजमानसात मार्गदर्शक तत्त्वे म्हणून स्वीकारली जात आहेत. प्रतिकूलतेतून वाट काढीत आपल्या जीवननिष्ठेच्या बळावर त्यांनी नीतिसंवर्धनाचे जे कार्य केले त्याला सामाजिकदृष्ट्या फार मोठे मोल आहे. आजच्या काळातील व्यक्तींना तत्कालीन समाजस्थितीची कल्पनादेखील येणार नाही. या भयावहतेतदेखील त्यांनी आपली संवेदनशीलता जपली.

सत्याच्या शोधयात्रिकाला वेदनांच्या वणव्यातून जावे लागते हेदेखील त्रिकालाबाधित सत्य आहे. आपल्या देशाच्या इतिहासात आणि जगाच्या इतिहासात अशी कैक उदाहरणे आढळतात. सॉक्रेटिस, ब्रुनो, मार्टिन ल्युथर आणि आपल्याकडचे गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ही तेजस्वी व्यक्तिमत्त्वे या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. ‘सत्यासाठी प्राणपणाने लढणारा योद्धा’ म्हणून सॉक्रेटिसची ख्याती आहे.

सत्यासाठी समर्पित वृत्तीने कार्य करणार्‍या आणि बुद्धिप्रामाण्यवादी वृत्तीने आचरण करणार्‍या अशा प्रकारच्या व्यक्तींवर प्रकाशझोत टाकणारा ‘विश्‍वाविरुद्ध’ हा अंतर्मुख करणारा लेख डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांनी ‘माझे चिंतन’ या पुस्तकात लिहिला आहे. त्यातून अशा ध्येयवादी व्यक्तींच्या कार्याचा शोध आणि बोध आपल्याला घेता येईल. पण समाजात असे प्रबोधन करणारे प्रज्ञावंत असूनही आपला समाज पूर्वीसारखाच राहिला आहे ही फार मोठी शोकात्मिका आहे. या पार्श्‍वभूमीवर महात्मा जोतिराव फुले यांनी विशद केलेली ‘सार्वजनिक सत्यधर्मा’ची मूलतत्त्वे आपल्या डोळ्यांत अंजन घालणारी आहेत. ‘‘सत्यवर्तन केल्याशिवाय मानव सुखी होणार नाही.’’ हे तर त्यांच्या जीवनाचे ब्रीदवाक्य होते. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथाच्या प्रारंभी ते म्हणतात ः
सत्य सर्वांचे आदी घर | सर्व धर्मांचे माहेर ॥
जगामाजी सुख सारे | खास सत्याची ती फेरे ॥
सारांशरुपाने सांगायचे झाल्यास प्राचीन काळापासून ऋषिमुनींनी सत्याचा निदिध्यास बाळगला. आपल्या चिंतनाचे नवनीत आपल्या भावी पिढ्यांना दिले. नंतरच्या काळात मानवाचे भौतिक जीवन समृद्ध व्हावे म्हणून आपल्या जीवनात अखंडितपणे साधना करणार्‍या शास्त्रज्ञांनीदेखील सत्यान्वेषी वृत्तीचा अवलंब केला. त्यासाठी त्यांना संघर्षातून जावे लागले. चंदन पुनःपुन्हा घासले असता त्याचा सुगंध अधिक पसरतो या अर्थाचे संस्कृत सुभाषित आहे. त्याप्रमाणे सत्याची पारख समाजाला उशिरा कळते. तोपर्यंत त्याच्या वाट्याला प्रतिकूलता येते पण शेवटी विजय सत्याचाच होतो. नवविचारांची प्रेरणा देणारे प्रज्ञावंत म्हणून ते ओळखले जातात.
(पणजी आकाशवाणीच्या सौजन्याने)