ब्रेकिंग न्यूज़
सण – उत्सवांना आधुनिकतेची झालर नको!

सण – उत्सवांना आधुनिकतेची झालर नको!

  • डॉ. मनाली महेश पवार

आपल्या भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांची जी योजना केलेली असते ती ऋतुप्रमाणे होणार्‍या निसर्गाच्या बदलांमध्येसुद्धा आपल्या शरीर व मनाला आरोग्य लाभावे म्हणून. त्या त्या क्षणाला जो विशिष्ट आहार किंवा नैवेद्य घेतला जातो तो एका दिवसापुरती मर्यादित नसता, त्या संपूर्ण ऋतुकालामध्ये सेवन करण्याचा किंवा आचरणात आणायचा असतो.

या काळात चंद्रशक्ती एवढी प्रभावी असते की औषधी वनस्पतीदेखील अधिक वीर्यवान होतात. पुष्य, रोहिणी, हस्त इत्यादि नक्षत्रांचा स्वामी चंद्र आहे. म्हणूनच औषध सुरू करणे किंवा औषध तोडणे या काळात जास्त प्रशस्त समजले जाते. यावरून चंद्राची महती आपल्या लक्षात येते.

लग्न समारंभ म्हणा, बारसं म्हणा, ३१ डिसेंबर वर्षाची सांगता म्हणा, गटारी अमावस्या म्हणा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणा, नवीन संस्कृतीप्रमाणे पार्टी आलीच. सणसमारंभउत्सवातील त्या पारंपरिक खाद्यपदार्थांची जागा कधी.. मासे, चिकन, मटणाच्या पदार्थांनी घेतली हे बहुतेक माणसांना समजले नाही. आज-काल कोजागिरी व्रताला देखील रात्रभर जागरण करतात, मांसाहार सेवन करतात. काही मोठमोठ्याने गाणी लावतात. बिभत्स नाचणे, मद्यपान करणे यालाच कोजागिरी उत्सव समजतात. अशाप्रकारे रात्रभर जागरण करून शेवटी मसालेदुध, बासुंदी खाणारेही महाभाग कमी नाहीत. आपण जो आहार सेवन करतो तो आपल्या आरोग्यासाठी का आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी?.. यातला फरकच मुळी लक्षात घेत नाहीत.

आपल्या भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांची जी योजना केलेली असते ती ऋतुप्रमाणे होणार्‍या निसर्गाच्या बदलांमध्येसुद्धा आपल्या शरीर व मनाला आरोग्य लाभावे म्हणून. त्या त्या क्षणाला जो विशिष्ट आहार किंवा नैवेद्य घेतला जातो तो एका दिवसापुरती मर्यादित नसता, त्या संपूर्ण ऋतुकालामध्ये सेवन करण्याचा किंवा आचरणात आणायचा असतो. म्हणूनच भाद्रपदात गणपतीला गूळ-खोबर्‍याचा नैवेद्य, नवरात्रीत देखील पुरणाचा नैवेद्य तसेच गुढीपाडव्याला श्रीखंड इत्यादीचा. ऋतुबदलाप्रमाणे निसर्गामध्ये झालेल्या बदलाचा प्रभाव शरीरस्थ दोषांवर होत असतो. दोष संचय, प्रकोप, प्रशस्त अवस्थेतून जात असतात. या वाढलेल्या दोषांना शांत करण्याचे उत्तरही निसर्गच देत असतो. म्हणूनच पावसाळ्यात श्रावण महिन्यात व्रतवैकल्याद्वारे वाढलेला वात शांत होण्यासाठी लहान किंवा हलका आहार सांगितला आहे. तसेच उन्हाळ्यात सूर्याची उष्णता वाढत असल्याने शरीरातून स्वेदाच्या रुपाने रसभाव कमी होतो व तो भरून काढण्यासाठी उन्हाळ्यात द्राक्षे, कलिंगड, मोसंबी, संत्रे, आंबा यांसारखी रसरशीत फळांचे वरदानही निसर्गच देत असतो. असेच काहीसे शरदऋतूचे आहे. वर्षाऋतूत असणारे शैल्य ह्या ऋतूत एकदम कमी होते व सूर्य प्रखरतेने तळपू लागतो. सूर्यसंताप हा असा अचानक वाढल्याने त्या वाढलेल्या वर्षाऋतूत संचित झालेल्या पित्ताचा अधिकच प्रकोप होतो व पित्तप्रकोपाची लक्षणे दिसू लागतात.

पित्तप्रकोपाची लक्षणे
– मूळव्याध असणार्‍या रुग्णांचा त्रास अधिक वाढतो. सरक्त मलप्रवृत्ती किंवा मलप्रवृत्तीच्यावेळी गुदाकडे दाह होतो.
– पित्ताचा प्रकोप असताना तसाच पित्तकर आहार-विहार सेवन करीत राहिल्याने काविळ होण्याचे प्रमाण या ऋतूत वाढते.
– सूर्याच्या उष्णतेमुळे सारखी तहान लागते.
– ह्या काळात अग्नि संधुक्षित होऊन भूक लागते पण आहार तसाच पित्तकर सेवन करत राहिल्यास अजीर्णाचा त्रास होतो. म्हणून सारखे आंबट ढेकर येणे किंवा मळमळल्यासारखे वाटते.
– पित्त व रक्ताचा आश्रयाश्रयी भाव असल्याने पित्त वाढल्याने थेट परिणाम रक्तावर होतो व त्वचारोगाची समस्या या काळात जास्त दिसते. खाज येणे, पुरळ येणे, जळजळणे किंवा शीतपित्त उठणे अशी लक्षणे दिसतात.
असे हे त्रास होऊ नये किंवा वाढू नये म्हणून ही कोजागिरी व्रताच्या निमित्ताने पित्ताची चिकित्सा सांगितलेली आहे. पित्त वाढल्यावर पित्ताची मुख्य संशोधन चिकित्सा म्हणजे विरेचन. दूध हे मृदु विरेचक आहे व उष्ण-मिश्रण पित्ताचे गुण प्रशम करणारा चंद्राचा शीत गुण. म्हणूनच इथे चंद्राच्या किरणांना, रात्रीच्या चांदण्याला महत्त्व आहे. या काळात चंद्रकिरणांचे सेवन करावे, म्हणजेच अंगावर चांदणे घ्यावे. रात्री चंद्राच्या चांदण्यात ठेवून थंड झालेले दूध साखरेसह प्यावे.

आपले मन सगे-सोयरे, मित्र-मैत्रिणी, कुटुंबियांसोबत जास्त रमते, आनंदित असते. म्हणूनच सर्वांनी एकत्र येऊन रात्री पातळ, स्वच्छ कपडे घालून सुगंधी फुलांच्या माळा गजरे घालून चंद्रप्रकाशात बसून कोजागिरी व्रत सोनेरी करावे. ते एका दिवसापूरते नसून असे आचरण संपूर्ण शरदऋतूत ठेवायचे आहे.

प्रकुपित पित्त विविध आजार (पित्तात) उत्पन्न करते. पण प्राकृत पित्त मात्र मनाचा ‘सत्वगुण’ वाढवण्यास मदत करतो. चंद्र हा मनाचा अधिपती आहे. म्हणूनच पित्ताचे शमन करण्यासाठी सात्वीक आहार व प्रसन्न, आल्हाददायक मन असणे फार गरजेचे असते व चंद्र हा शीतल व मन प्रसन्न ठेवणारी सोम देवता आहे. म्हणून सात्विक आहार म्हणजे मधुर दुध प्राशन व त्यावर चंद्राच्या किरणांचे संस्कार होय.

या ऋतूत आकाशामध्ये ‘अगस्ति ’ या तार्‍याचा उदय होतो. या तार्‍याच्या प्रकाशामध्ये तलावातील पाणी हे अधिकच निर्मळ, पवित्र, शुद्ध बनते. या पाण्याला आयुर्वेदाने ‘हंसोदक’ म्हटले आहे. त्याप्रमाणे निर्मळ किंवा हंसपक्ष्यास उपयुक्त असे जे पाणी ते हंसोदक होय. वर्षा ऋतूत गढूळ झालेले पाणी व त्यामुळे उत्पन्न होणारे रोग या ‘अगस्ति’ तार्‍याच्या उदयाने नष्ट पावतात. याच हंसोदकाचा उपयोग स्नान, पान आदि सर्वांसाठी करावा. पिण्यासाठी कोमट पाणी वापरावे. पिण्यासाठी वापरायचे पाणी उशीर घालून मडक्यात ठेवून गार करून प्यावे. स्नानासाठी फार गरम पाणी न वापरता अगदी कोमट वापरावे.
या काळात चंद्रशक्ती एवढी प्रभावी असते की औषधी वनस्पतीदेखील अधिक वीर्यवान होतात. पुष्य, रोहिणी, हस्त इत्यादि नक्षत्रांचा स्वामी चंद्र आहे. म्हणूनच औषध सुरू करणे किंवा औषध तोडणे या काळात जास्त प्रशस्त समजले जाते. यावरून चंद्राची महती आपल्या लक्षात येते.

पित्त प्रकोपासाठी संशोधन –
या काळात पित्तज व्याधी उत्पन्न होतात, असे आपल्या लक्षात असेल. या पित्तज व्याधींसाठी सर्वांत महत्त्वाची चिकित्सा म्हणजे विरेचन चिकित्सा. ‘विरेचन’ म्हणजे केवळ एखादे जुलाबाचे औषध घेऊन पोट साफ करणे नव्हे. विरेचन म्हणजे विधीवत स्नेहन-स्वेदन करून संपूर्ण शरीरातील दूषित पित्त आमाशयात आणून रेचक औषध देऊन गुदावाटे दोषाचे निर्हरण करणे व हो हे शास्त्रोक्त पद्धतीनेच व्हायला हवे, नाहीतर त्याचे दुष्परिणाम होऊन इतर रोग होण्याची संभावना जास्त असते.
दोषांना अधोमार्गाने अर्थात गुदावाटे बाहेर टाकण्याच्या शोधन क्रियेला विरेचन असे म्हटले जाते. पित्त व रक्त यामधील असणार्‍या अन्ययान्ययी भावाचा विचार करता जेव्हा रक्तदृष्टी असते तेव्हा पित्ताचीही दृष्टी आढळतेच. याचसाठी पित्तावरील म्हणून ओळखला जाणारा हा विरेचनोपक्रम रक्तदृष्टीसाठीही तितकाच कार्यकारी होतो.
विरेचन हा उपक्रम शरीर मलाचे शोधन करणारा, मलाचे शोधन झाल्याने रोग दूर करणारा, वर्ण प्राकृत करणारा, आयुष्यभर म्हणजे रोग दूर करून स्वास्थ्य प्राप्त झाल्याने चिरकालपर्यंत स्वास्थ्य टिकवून आयुष्य वाढविणारा आहे. या उपक्रमाद्वारे बुद्धी निर्मल होते. इंद्रियांना बल प्राप्त होते. धातू दृढ होतात, अग्नी प्रदिप्त होतो, वार्धक्य लवकर येत नाही आणि पित्तज रोग नष्ट होतात.
या काळात पित्ताचा प्रकोप होतो म्हणजे पित्त एवढे वाढते, आपले स्थान सोडून बाहेर पडलेले असते. म्हणूनच या अवस्थेत पित्ताला बाहेर काढून टाकणे सहज शक्य होते. म्हणूनच या काळात विरेचन करून प्रकृतिक दोष शरीराबाहेर काढून टाकला तर पुढे वर्षभर पित्तासंबंधी त्रास सहसा होत नाही.

शास्त्रोक्त पद्धतीने ज्यांना विरेचन घेता येत नसेल, त्यांनी आठवड्यातून एकदा तरी एरंडस्नेह घ्यावा. किंवा रोज रात्री आरग्वध, अग्निपत्रिका चूर्ण, आमलकी चूर्ण यांसारखी औषधे घ्यावीत. दूध हेही मृदुरेचक म्हणून उपयोगी पडते.

अशा प्रकारे विधीवत पित्ताचे शोधन केल्यावर निसर्गतः संंधुक्षित झालेला अग्नी जास्त वाढतो व भूक खूप लागते. पचन करण्याची क्षमता वाढते व म्हणूनच मधुर रस प्राय दूध-तूपाची रेलचेल या ऋतूत शक्य आहे. म्हणून आश्‍विन पौर्णिमा पासून खारीक, बदाम, खसखस, काजू, पिस्ता वगैरे पौष्टीक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून, चांदण्यात बसून पिण्याची प्रथा आहे. हा पित्त शमनासाठी उत्तम उपाय आहे. म्हणून संपूर्ण शरद ऋतूमध्ये चांदीच्या भांड्यात दूध ठेवून चंद्राच्या प्रकाश किरणांची शक्ती त्यात पाडून सकाळी ते दूध प्यावे. चंद्राचे चांदणे, चांदीचे भांडे व दूध ह्या सर्व गोष्टी पित्तशामक आहेत.

– पित्तशमनासाठी आहार
दूध, घरचे ताजे लोणी, तूप ह्या सर्व गोष्टी पित्तशमनासाठी श्रेष्ठ आहेत. म्हणूनच पंचामृत हे या काळात अमृताप्रमाणे कार्य करते. रोज सकाळी या काळात दूध, तूप, मध, दही व साखर घालून पंचामृत करावे व रोज सकाळी त्याचे प्रत्येकाने सेवन करावे.
– नारळ हा मधुर रसाचा, शीतल, आल्हाददायक, पित्तप्रशमन करणारा असल्यानेच त्याचा उपयोग या ऋतूत सांगितलेला आहे. नारळीभात, नारळाच्या वड्या हेही आहारद्रव्य बल्य व पित्तघ्न म्हणून उपयुक्त आहे.

– आहारात मधुर, मिक्स, कषाय रसांच्या द्रव्यांचे अधिक्य असणे आवश्यक आहे. निसर्गतःच विसर्गकाळामुळे वाढणारे बल आणखी वाढावे यासाठी बल्य पदार्थांची जोड आहारास देणे संयुक्तिक ठरते. यासाठीच या काळात बदाम, खारीक, पिस्ता यांसारखी मधुर, बल्य द्रव्यांचे सेवन सांगितले आहे. दूध-तूप अधिक प्रमाणात सेवन करणे हितावह ठरते.

– तेल-विशेषतः करडई व तिळाचे तेल मात्र पित्तप्रकोपक असल्याने अगदी कमी प्रमाणात वापरावे.
– तसेच हरभर्‍याची डाळ, गूळ, गहू यांपासून बनविली जाणारी पुरणाची पोळी ही सणाला खाण्याची वस्तू नसून या प्रकाराची द्रव्ये, पदार्थ नित्य खावेत. भरपूर दूध व तूपात बुडवून खावेत.
– या सर्व दृष्टीने पाहता भात, ज्वारी, गहू या द्रव्यांचा आहारात प्रामुख्याने उपयोग केला पाहिजे. याच्या जोडीला मूग, मटकी, हरभरा, मटार यांसारखी तुरट रसाची व मधुर अनुरस असणारी द्विदल धान्येही भरपूर प्रमाणात घेतली पाहिजेत.
– या मधुर रसाच्या द्रव्याबरोबर कडू पदार्थही पित्तशामक असल्याने आहारात आले पाहिजेच.

– कडवट पदार्थांपैकी कारल्याची भाजी, मेथीची भाजी यांसारख्या भाज्या अधिक खाल्ल्या पाहिजेत. स्वयंपाकामध्येही मेथी, हळद, कडूनिंब यांसारख्या द्रव्यांचा वापरही भरपूर झाला पाहिजे. कवठांसारखे तुरट पदार्थही या ऋतूत उपयुक्त ठरतात.
या काळात द्रव्ये मात्र फारशी घेऊ नयेत. कारण त्यामुळे पित्तप्रकोप अधिकच होण्याची शक्यता असते. परंतु यास अपवाद म्हणजे आमसुले. याचा रस आंबट असला तरी या द्रव्याच्या उपयोगानंतर पित्तप्रकोप न होता पित्तप्रशमनच घडते. आवळा हेही अशाच प्रकारते द्रव्य आहे. कषाय व अम्लरसाचे हे द्रव्य उत्कृष्ट पित्तघ्न आहे. आवळ्यापासून बनविला जाणारा मोरावळा वापरणेही हितावह आहे. मोरावळ्यात असणारी खडीसाखर हीसुद्धा मधुररसाची असल्याने पित्तप्रशमनास सहाय्यभूत ठरते. म्हणून रोज एक आवळा खावा.

– मधुर रसाची चिकूसारखी फळे व लिंबाच्या वर्गातील मधुर, अम्लरस असणारी संत्री, मोसंबी इत्यादी फळेही हितकर आहेत.
– खारट व तिखट पदार्थही आंबट द्रव्यांप्रमाणेच कमी केले पाहिजेत. कारण हे दोन रसही पित्त वाढविणारे आहेत. हिरवी मिरची कमी वापरावी. तिखटपणासाठी आले भरपूर प्रमाणात वापरणे हितकारक ठरते. आले हे तिखट असले तरी परिणामतः मधुरच असल्याने ते पित्तशामक ठरते. आले, ओळी हळद व लिंबू यांपासून बनविलेले लोणचे किंवा केवळ लिंबाचे लोणचे या ऋतूत चालेल, पण कैरीचे लोणचे मात्र वापरू नये.

– मधुर रसाचे आधिक्याने सेवन करावे हे खरे, पण मधुररस हा पचण्यास जड असतो, हे लक्षात घेऊन दोन घास खाणेच अधिक योग्य आहे.
विरेचनाद्वारे शरीराची शुद्धी करून अशाप्रकारे आहार-विहाराचे आचरण केल्यास हा ऋतूही म्हणा किंवा हा काळही तुम्हाला कोणताच पैत्तिक आजारांचा त्रास न होता तुम्ही आरोग्यपूर्ण व्यतीत करू शकता.
सण-उत्सवांचे महत्त्व लक्षात घ्या. या सणांना आधुनिकतेची झालर नको.