सचिनच्या संघात पाच भारतीय

यजमान इंग्लंडने न्यूझीलंडला हरवून विश्‍वविजेतेपद पटकावल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्‍वचषक स्पर्धेमधील आपला सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघात सचिनने भारताच्या पाच खेळाडूंना स्थान दिले आहे. सचिनने आपल्या संघाचे नेतृत्व उपविजेता न्यूझीलंडच्या केन विल्यमसन याच्याकडे सोपविले आहे. तर विश्‍वविजेत्या इंग्लंडच्या जॉनी बॅअरस्टोवला यष्टीरक्षक म्हणून निवडले आहे. सचिनच्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह असे पाच भारतीय खेळाडू आहेत. परंतु धोनीला मात्र सचिनने डावलले आहे.
सचिनचा संघ ः रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), विराट कोहली, शाकिब अल हसन, हार्दिक पंड्या, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, मिचेल स्टार्क, जोफ्रा आर्चर व जसप्रीत बुमराह.

अजून एक सुपर ओव्हर

विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात ‘सुपर ओव्हर’नंतरही विजेता ठरू न शकल्याने सर्वाधिक चौकार ठोकलेल्या संघाला विजेता घोषित करण्याऐवजी आणखी एक ‘सुपर ओव्हर’ घ्यायला हवी होती, असे परखड मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या प्रमाणावर यजमान इंग्लंडला विजेता संघ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर आयसीसीवर चोहोबाजूंनी टीका सुरू झाली आहे. न्यूझीलंडच्या संघावर अन्याय झाल्याचे मत क्रिकेट जगतात व्यक्त केले जात आहे. फुटबॉलमध्ये सामना बरोबरीत राहिल्यानंतर सामना अतिरिक्त वेळ देण्यात येते, असे सचिनने म्हटले आहे. रोहित शर्मा, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि युवराज सिंग यांनीही आयसीसीच्या या नियमावर नाराजी व्यक्त केली आहे.