ब्रेकिंग न्यूज़
सगळेच गतिमान, तर शाश्‍वत काय?

सगळेच गतिमान, तर शाश्‍वत काय?

– प्रकाश आचरेकर, मुंडवेल, वास्को
आपल्या भोवती असलेल्या निसर्गाच्या वस्तू, त्यांचे रहस्य व कारण जाणून घेण्याची माणसाची हजारो वर्षांपासूनची धडपड चालू आहे. प्राचीन काळी म्हणा अथवा थोड्याच वर्षांपूर्वी विज्ञानातील गंध माहीत नसलेल्या गावांतील माणसे विचार करीत असत की, सूर्य पूर्वेला उगवतो व पश्‍चिमेला मावळतो, मग पाताळात जातो आणि ताजातवाना होऊन नंतर तो पूर्वेला उगवतो. म्हणून सूर्य-चंद्र हे दोन्ही गोल या सपाट धरतीभोवती फिरत आहेत. अर्थात आपण व आपली धरती स्थिर आहे. याप्रमाणे प्राचीन काळापासून माणसे निसर्गाचे गुपित जाणण्यासाठी आपल्या मनाप्रमाणे विचार करून कारणे शोधत असत. मग आपल्या ज्ञानापलीकडच्या गोष्टीला ईश्‍वराचे गुपित आहे असे समजत असत.काही शतकांपूर्वी खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओने पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतःभोवती फिरते म्हणून सूर्य चंद्र, तारे व ग्रह पृथ्वीभोवती फिरत असल्याचे सांगितले. खरे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे हे गुपित त्याने जगजाहीर केले. पुढे वैज्ञानिकांनी हेही सांगितले होते, सूर्य हा मध्यभागी स्थिर असून त्याच्याभोवती आपले नऊ ग्रह फिरत आहेत. म्हणजेच पृथ्वी इतर ग्रहांप्रमाणे अस्थिर व गतिमान आहे.
आता वैज्ञानिकांच्या मागील संशोधनातून सूर्य व त्याची ग्रहमालिका ही आमच्या आकाशगंगेतील घटक आहे. म्हणजेच आकाशगंगेतील सर्व तारे व त्यावरील ग्रह आकाशगंगेत आपल्या लंबगोलाकार कक्षेत फिरत आहेत. अर्थात सूर्य हा या आकाशगंगेतील तारा असल्याने तो स्थिर नसून इतर तार्‍यांप्रमाणे आपल्या कक्षेत भ्रमण करतो, म्हणजे तोही गतिमान आहे.
पुढे विचार येतो आपल्या विश्वाचा. या विश्वात आमच्या आकाशगंगेप्रमाणे अनेक आकाशगंगा आहेत. या सर्व आकाशगंगा वैश्‍विक अंड्याचा स्फोट झाल्यानंतर निर्माण झाल्या आणि नंतर विश्‍वाच्या पसरणानुसार त्या सर्व अंतराळात दूर दूर सरकत गेल्या. म्हणजे आपली ही त्या आकाशगंगेतील एक आकाशगंगा आहे आणि तीही त्यांच्याप्रमाणे दूर दूर जात आहे. शेवटी सांगायचे म्हणजे आपली आकाशगंगाही स्थिर नसून जोरात प्रवास करीत आहे. म्हणजेच सर्व तारे, ग्रह, उपग्रह, कृष्णविवरे हे स्थिर नसून गतिमान आहेत. आता आपला विचार मनात येतो की, या विश्वात काय बरे स्थिर असेल?
दगड तरी स्थिर आहे का? आपण त्याचे विभाजन करीत राहिलो तर मग शेवटी त्या दगडाच्या रेणूकडे म्हणजे शेवटच्या कणाकडे पोचतो. त्याला ‘मॉलिक्युल’ म्हणतात. त्याच्यानंतरही विभाजन केल्यास त्याचे अणू अथवा ऍटम सापडतात. नंतर त्या अणूत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्यूट्रॉन कण आहेत. त्यातील इलेक्ट्रॉन उणे विद्युत भार असलेला कण, अधिक भार असलेल्या प्रोटॉन कण व विद्युतभाररहित न्युट्रॉन कणाभोवती अत्यंत जोराच्या गतीत फिरतो. सांगायचे म्हणजे अचल दिसणारे दगड, डोंगर स्थिर नसून ते सर्व गतीमान आहेत.
पुढे विचार येतो की, या विश्वातील कुठलीच वस्तू स्थिर नाही याचे सुप्रसिद्ध वैज्ञानिक ऍल्बर्ट आईनस्टाईनच्या सुप्रसिद्ध सिद्धांत नुसार स्पष्टीकरण होते. या सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे ऊर्जेचे रुपांतर पदार्थ व गतीत होते. म्हणजेच उर्जा, पदार्थ व त्यांची गती अस्थिर असून एक दुसर्‍यात रूपांतर होणारी आहे.
आता या विश्वातील अत्यंत सूक्ष्म अशा कणापासून आकाशगंगेपर्यंतचे सर्व काही अस्थिर व गतिमान आहे अशा निष्कर्षापर्यंत आपण पोचतो. तरी आपले मन आपल्यालाच विचारते की दिसणारे सर्व अचल आहे तर इथे स्थिर अशी वस्तू काय आहे? शाश्‍वत असे काय आहे? शेवटी उत्तर मिळते परमात्मा स्थिर, अचल आणि शाश्‍वत आहे. तो या लौकिक जगाच्या पलीकडील अलौकीक सत्य आहे. ती अलौकीक शक्ती असून आदी, मध्य व अंत्याच्या पूर्वी व मगही अस्तित्वात असलेली अलौकीक शक्ती आहे.
आजच्या युगातील माणसाला विज्ञानाचा तिसरा नेत्र प्राप्त झाला आहे. ह्या नेत्राद्वारे केवळ पाच टक्केच का असेना, ब्रह्मांडाचे रहस्य उलगडलेले आहे. ज्याचे रूप, रहस्य व करणी जाणून घेण्यासाठी अनेक वर्षे माणूस तळमळत होता. अशा या परमेश्‍वराच्या विश्वाला किती जणांनी जाणून घेतले आहे? आज आपण पाहतो आहोत, माणूस खूप कमावतो आहे. चमचमीत चविष्ट खाणे-पिणे, अलिशान बंगले, गाडी व आलिशान आरामदायी जीवन भोगण्यातच माणसाचा वेळ जात आहे. दुसर्‍या बाजूने गरीब, अशिक्षित लोक दिवसभर राबराब राबतात, मग या हलाखीच्या जीवनात वेळ जातो आणि राहिलेला वेळ जो असतो तो टीव्हीवर मनोरंजन कार्यक्रम बघण्यातच जातो. शेवटी सभोवतीचे ज्ञान व विश्वदर्शन घेण्यास वेळ मिळत नाही व रसही नसतो. माणसाला खरे सुख काय आहे? हे त्याने विचारपूर्वक जाणून घ्यायचे असते. त्यासाठी त्याने आपल्या व्यापातील थोडा वेळ विश्वदर्शनासाठी काढावा. विश्वदर्शन हेच परमेश्‍वर दर्शन आहे हे समजावे असे मला वाटते.

Leave a Reply