ब्रेकिंग न्यूज़

संवादाला संधी

रमझानच्या निमित्ताने काश्मीरमध्ये युद्धविराम पुकारण्याचा निर्णय जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या आग्रहावरून केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला, परंतु या विरामकाळात लष्कर आणि निमलष्करी दलांवर सातत्याने सुरू असलेले ग्रेनेड हल्ले पाहिले, तर या युद्धविरामाची फलनिष्पत्ती काय असा प्रश्न उभा राहतो. यापूर्वीच्या आत्मघाती हल्ल्यांऐवजी अशा प्रकारचे पळपुटे हल्ले चढवण्यामागील या दहशतवादी शक्तींचा उद्देश स्पष्ट आहे. लष्कराशी समोरासमोर लढत देण्याची हिंमत नाही, त्यामुळेच ग्रेनेड फेकून दुचाकी, चारचाकीवरून पळायचे प्रकार हे पळपुटे करीत आहेत. सरकारने भले युद्धविरामाद्वारे सकारात्मक पाऊल उचलले तरी दहशतवादी शस्त्रे खाली ठेवतील याची शाश्‍वती काय, असे या युद्धविरामाचा निर्णय झाला तेव्हा आम्ही विचारले होते. खरोखरच सरकारच्या प्रयत्नांना विफल करण्यासाठी दहशतवाद्यांनी जोरदार प्रयत्न सध्या चालवलेले दिसतात. पाच दिवसांत चौदा ग्रेनेड हल्ले झाले, याचा अर्थ दहशतवाद्यांना रमझानच्या काळातही काश्मीर पेटते ठेवायचे आहे. लष्कर, निमलष्करी दलांना लक्ष्य करायचे आहे. सरकारला काश्मिरी युवकांशी कोठेही संवादाला जागा राहू नये यासाठीच हे हल्ले चढवले जात आहेत. सगळे शांत राहिले तर केंद्र सरकारला काश्मिरींशी संवाद साधण्याची संधी मिळेल आणि त्यातून स्थानिक बेरोजगार तरुणाईचे आपल्याला मिळत असलेले समर्थन घटेल याची या पाक पुरस्कृत दहशतवादी शक्तींना चिंता आहे. केंद्र सरकार क्रीडा, पर्यटन आणि रोजगार या तीन आघाड्यांवर काश्मिरी युवकांना संधी उपलब्ध करून देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याची स्वप्ने पाहते आहे, परंतु त्यासाठी मुळात स्थानिक काश्मिरी नेतृत्वाने आपला दुटप्पीपणा आणि ढोंगबाजी सोडण्याची आवश्यकता आहे. आजवर अनेक काश्मिरी मुला-मुलींनी मुख्य प्रवाहात सामील होण्याची हिंमत दाखवली. त्यांनी लष्करात नोकर्‍या मिळवल्या, निमलष्करी दलांमध्ये ते भरती झाले. क्रीडा क्षेत्रात नैपुण्य दाखवले. परंतु दहशतवादी शक्तींना हे सारे पाहावत नाही. त्यामुळे भारतविरोधी विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर त्यांनी सतत चालवलेला आहे. जन्मापासून ‘आझादी’चेच दिवास्वप्न दाखवले जात असल्याने भरकटलेली कोवळी मुले मग अटळ मृत्यूच्या मार्गाने निघतात. एकामागून एक दहशतवाद्यांना सामील होतात. एक काळ असा होता, जेव्हा काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया लपून छपून चालायच्या. नव्याने स्थानिक युवकांची भरती करायची झाल्यास चोरीछिपे चालत असे. बुरहान वानी मारला गेल्यानंतर मात्र काश्मिरी तरुणांची दहशतवादी म्हणून उघडउघड भरती केली जात आहे आणि हे वाट भरकटलेले तरुण आपली खरीखुरी सशस्त्र छायाचित्रे सोशल मीडियावर अपलोड करून खोर्‍यात ‘ग्लॅमर’ मिळवीत आहेत. काश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांच्या भरतीसंदर्भात नुकताच एक अहवाल तयार करण्यात आला आहे, त्यातून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. पूर्वी काश्मिरी तरुणांना आयएसआयचे हस्तक आपल्या नादाला लावायचे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपार तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवायचे. तेथून प्रशिक्षण घेऊन मग ते शस्त्रांनिशी खोर्‍यात परतायचे, परंतु ते प्रमाण पाकिस्तानी घुसखोरांच्या तुलनेत कमी असे. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर स्थानिकांच्या भरतीचे प्रमाण वाढले आहे आणि आपण दहशतवादाला जाऊन मिळणे म्हणजे काही मोठा पराक्रम करणे असा भ्रम काश्मिरी तरुणांमध्ये फैलावू लागला. या तरुणांना मुख्य प्रवाहात सामील करण्यात काश्मीरमधील आजवरच्या सर्व सरकारांना घोर अपयश आले आहे. विद्यमान पीडीपी – भाजप सरकारकडून त्या आघाडीवर मोठी अपेक्षा होती, परंतु तीही फोल ठरली आहे. विशेषतः मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या मनातच वैचारिक गोंधळ दिसतो आणि तो वेळोवेळी प्रत्ययाला येतो. लष्कराचे, निमलष्करी दलांचे मनोबल खच्ची करण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. एकीकडे केंद्र सरकारकडे काश्मिरींच्या पुनर्वसनासाठी मदतीचा टाहो फोडायचा आणि दुसरीकडे केंद्र सरकार काश्मीरसंदर्भात राबवीत असलेल्या नीतीला विरोध करीत राहायचे, त्यात अडथळे आणत राहायचे अशाने काश्मीरचा तिढा सुटेल कसा? दगडफेक करणार्‍या तरुणांच्या टोळक्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी आकाशपाताळ एक करणार्‍या मेहबुबांचे सरकार त्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही ठोस करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे या निर्नायकी स्थितीत हे तरुण सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी पडत राहिले तर नवल ते काय? मुख्य प्रवाहात सामील होणे या काश्मिरी युवकांसाठी ‘ग्लॅमरस’ बनले पाहिजे, तरच ती मुले दहशतवादाकडे पाठ फिरवतील. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह नुकतेच काश्मीर दौर्‍यावर होते. काश्मिरींना मुख्य प्रवाहात आणण्याची भाषा त्यांनी केली, त्यांच्यासाठी योजनांची घोषणाही केली, परंतु जो विश्वास त्या युवकांना मिळायला हवा तोच जर मिळू शकलेला नसेल, तर ते पालथ्या घड्यावरचे पाणीच ठरेल. काश्मीरसाठी केंद्र आणि राज्य सरकारने हातात हात घालून प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील.