ब्रेकिंग न्यूज़
संयुक्त राष्ट्रांत भारताकडून पाकचे वाभाडे

संयुक्त राष्ट्रांत भारताकडून पाकचे वाभाडे

>> पाक विदेश मंत्र्यांच्या आरोपांना सणसणीत उत्तर ः काश्मीरबाबत अन्य कोणाचा हस्तक्षेप नको

पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महंमद कुरेशी यांनी काल येथील संयुक्त राष्ट्रांसमोर भारतावर केलेले आरोप म्हणजे जागतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या देशाकडून भारताविरोधात रचलेले कुभांड व बनावट कथानक आहे अशा शब्दात भारताने पाकची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या अधिवेशनासमोर खिल्ली उडवली. काश्मीरचा मुद्दा ही भारताची अंतर्गत बाब असून त्यात अन्य कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नसल्याचे यावेळी भारताने ठणकावले. जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या मानवी हक्कांच्या रक्षणासाठी भारत वचनबद्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

भारतीय शिष्टमंडळातर्फे या अधिवेशनात भारतीय विदेश मंत्रालयातील वरिष्ठ सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंग यांनी पाक विदेश मंत्र्यांनी भारतावर केलेल्या आरोपांची कठोर शब्दांत निर्भत्सना केली. उपहासात्मक कोट्या करीत ठाकूर यांनी कुरेशी यांचे आरोप फेटाळून लावले. सिंग म्हणाल्या, ‘एका शिष्टमंडळाने या ठिकाणी आक्रमक धावते समालोचन करताना माझ्या देशावर खोटे, तथ्यहीन आरोप केले आहेत. मात्र संपूर्ण जगाला पुरेपूर माहीत आहे की हे आरोप करणारा देश हा जगातील कुख्यात दहशतवाद्यांना अनेक वर्षांपासून आश्रय देणारा एक देश आहे. हा देश पर्यायी राजनितीचा भाग म्हणून दोन देशांच्या सीमा भागांमध्ये दहशतवादी कारवायांचे आयोजन करतो.’ पाकिस्तानचा नामोल्लेख न करता सिंग यांनी ही घणाघाती टीका केली.
सिंग यांनी आपल्या छोट्याशा भाषणाची सुरुवात जम्मू-काश्मीरशी निगडीत कायद्यात केलेली दुरुस्ती ही संसदेत चित्रिकरण प्रक्रियेतून खुलेपणाने करण्यात आल्याची माहिती दिली. लोकशाही पद्धतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरातील निर्बंध
जनतेच्या सुरक्षेसाठी
तसेच जम्मू-काश्मीरात जे निर्बंध घातले आहेत ते तेथील जनतेच्या सुरक्षिततेसाठी असल्याचे सांगितले. त्याचवेळी हे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
वरील निवेदन केल्यानंतर सिंग यांनी आपले वक्तव्य पुन्हा पाकिस्तानवर केंद्रीत केले. पाकिस्तान व दहशतवाद असे समीकरण प्रदर्शित करीत त्यांनी ४७ सदस्यीय संयुक्त राष्ट्र मानवाधिकार मंडळाला व आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरोधात भाष्य करण्याचे आवाहन केले. या अनुषंगाने त्या म्हणाल्या.

मानवाधिकाराच्या बाता करणार्‍यांकडून
स्वतःच्या देशात उल्लंघन
युनोच्या मानवाधिकार मंडळाच्या व्यासपीठाचा आपल्या वाईट राजकीय लाभासाठी वापर करणार्‍यांना जगाने उघडे पाडावे असे सिंग म्हणाल्या. दुसर्‍या देशातील अल्पसंख्यकांच्या मानवाधिकार उल्लंघनाच्या बाता करणारे त्यांच्याच देशातील मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. असे आरोप करणारेच स्वतः खरे गुन्हेगार आहेत, असे त्या म्हणाल्या.

संयुक्त राष्ट्रांसमोर पाककडून
भारतावर तथ्यहीन आरोप
>> काश्मीरात भारताकडून नरसंहाराचा आरोप

पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महंमद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रांसमोर काश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना भारतावर तथ्यहीन आरोप केले आहेत. काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी संयुक्त तपास समितीची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली. जम्मू-काश्मीरात सध्या स्मशान शांतता असून तेथे भारताकडून नरसंहार केला जात असल्याचा आरोपही कुरेशी यांनी केली आहे.

जम्मू-काश्मीर संदर्भातील भारतीय राज घटनेतील कलम ३७० रद्द ठरविण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाकडून निराशा पदरी पडल्यामुळे वैफल्यग्रस्त बनलेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर भारताविरोधात ११५ पानांचे निवेदन सादर करताना खोटे आरोप केले आहेत. जम्मू-काश्मीरात भारताकडून मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचा आरोप पाकने केला आहे.

पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महंमद कुरेशी यांनी काश्मीर प्रश्‍न ही भारताची अंतर्गत बाब नसल्याचा दावाही संयुक्त राष्ट्रांसमोर बोलताना केला आहे. जम्मू काश्मीरात सुमारे दहा लाख सैनिक तैनात केले असून हा प्रदेश जगातील सर्वात मोठा कैदखाना ठरल्याची टीका कुरेशी यांनी केली आहे. तेथील सहा हजारहून अधिक राजकीय नेते, सामाजिक कायकर्ते व विद्यार्थी यांना अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काश्मीरात पॅलेट गनचा वापर बंद करावा व संचार बंदी हटवावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
भारताने जम्मू-काश्मीरातील परिस्थिती सर्वसाधारण असल्याचा दावा केला आहे. मग तेथे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना बंदी का घातली आहे असा सवाल कुरेशी यांनी केला आहे.

जम्मू-काश्मीर भारताचे
असल्याची पाकची कबुली?
पाकिस्तानचे विदेश मंत्री कुरेशी यांनी काश्मीरप्रश्‍नी संयुक्त राष्ट्रांसमोर भारतावर अनेक बेछूट आरोप केले. मात्र त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नकळत जम्मू-काश्मीर भारताचाच भाग असल्याची कबुली दिली. पत्रकारांशी बोलताना कुरेशी म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमे, संस्था, एनजीओ यांना भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश का दिला जात नाही?’ यामुळे जम्मू-काश्मीर भारताचा भाग असल्याची कबुली पाकने दिली अशी चर्चा सुरू आहे.