ब्रेकिंग न्यूज़

संभ्रमामि युगे युगे…

  • अंजली आमोणकर

चाणक्यनीतीमध्ये राजकारणात, अर्थकारणात, समाजकारणात यशस्वी होण्याचे जे नुस्खे- जे फॉर्म्युले (नीती, नियम वा सूत्र) दिले आहेत, त्यात ‘फोडा वा जोडा’ प्रमाणे ‘संभ्रम’ निर्माण करा वा जिंका, हा फॉर्म्युलाही दिला आहे! सोप्या भाषेत शंका! एकदा का मन ‘शंकित’ झालं की चलबिचल, अविश्‍वास, संशय अशी स्टेशनं घेत-घेत गाडी पुढे सरकते. शेवटचं स्टेशन हे अर्थातच खोल खड्‌ड्यात किंवा गर्तेत पडणं हेच असतं. याचा फायदा राजनीतिज्ञ, व्यापारी, सत्ताधीश, उद्योगपती अशी मंडळी यथेच्छपणे घेताना दिसतात.

जाहीरातक्षेत्र म्हणजेच ऍडव्हरटायझिंग हे एक टक्केही सत्य नसतानाही त्यात लोकांवर एकाचवेळी करणी-भानामती-संमोहन वगैरेंचा मुक्तहस्ते वापर करण्यात आलेला दिसतो व सावज अलगद जाळ्यात अडकतानाही दिसतं. कारण? संभ्रम!! लोकांच्या मनात एकदा का ते वापरत असलेल्या वस्तूंबद्दल संभ्रम निर्माण केला- जास्त फायद्याची लालूच दाखवली की काम फत्ते!! सर्व बळीचे बकरे, बकर्‍या, कोकरे आपणहून कसायाच्या हातात मान देताना दिसतात. समोरच्याची बिनबोभाट पकड घेण्याचा हा एकुलता एक यशस्वी मार्ग असावा. ‘संभ्रमाची’ पुढची शिकार म्हणजे पन्नाशीच्या आतली बाहेरची सुशिक्षित पिढी. अंधश्रद्धा, पारंपरिक रीतीरिवाज, चालीरीती, कौटुंबिक कुलाचार- त्याकरता करावी लागणारी कर्मकांडं (उपासतापास, पूजाअर्चा, विविध धार्मिक कृत्यं, श्राद्धपक्ष, सोवळं-ओवळं, संस्कार) एकीकडे व शिक्षणातून केलेलं त्यांचं खंडन, शास्त्रशुद्ध रितीने व वैज्ञानिक कारणांनी त्यांची केलेली मीमांसा दुसरीकडे- अशा कचाट्यात ही पिढी भरडून निघालीये. धरवतही नाही व टाकवतही नाही, अशी या पिढीची अवस्था झालीये. कारण? ‘संभ्रम’!!
मागच्या पिढीने सर्व काही डोळे मिटून स्वीकारलं होतं. त्यांचं चित्त स्थिर होतं. मुलाबाळांच्या पिढीनेही डोळे मिटून सर्व झुगारलं… त्यांचं ही चित्त स्थिर आहे. संभ्रम आहे तो तुमच्या-आमच्या पिढीच्या मनात. कोणत्या मर्यादेपर्यंत काय स्वीकारायचं, किती स्वीकारायचं, काय व किती झुगारायचं, शिवाय लोक (त्यात समाज व आपले नातलग आलेच..) काय म्हणतील’- ही जीवनाला खाऊन संपवणारी वाळवी असतेच मागे- ह्या ‘संभ्रमाच्या’ रहाटगाड्यात आपली पिढी गरगर फिरतीये. डोळे मिटून- मन बेडर करून झुगारायची हिंमत नाही व बिनबोभाट स्वीकारायची इच्छा

नाही- असं काहीसं झालंय. परिणामांची भीती- हा दुसरा समंध मानगुटीवर बसलेलाच असतो.
जसा चित्रपटांच्या कथांचा पाया ‘संभ्रम’ हाच असतो, तसाच आपल्या सर्व धार्मिक कहाण्यांचा पायादेखील ‘संभ्रमच’ आहे. मग तो कुरुक्षेत्रावरील अर्जुनाच्या मनात उत्पन्न झालेला संभ्रम असो, सीतेला वनवासातून परत आणलेल्या रामाच्या मनातला असो की इतर ग्रंथांतील कहाण्यांमधला असो.

इतकंच कशाला, सर्व साहित्य-कलांमध्ये देखील मोठमोठ्या शोकांतिका (भारतीय व पाश्चात्त्य) गाजल्या आहेत. त्या, त्यातील संभ्रमामुळे उत्पन्न होणार्‍या कथानकांपायी. ‘संभ्रम’ हा बाटलीतला जीव आहे. त्याला मनाच्या बाटलीत गाडून टाकून, घट्ट बंद करणंच इष्ट असतं. जरा मनाचं बूच सैल झालं, की तो बाहेर येऊन आधी मेंदूचा ताबा घेतो. असं झालं तर ‘टू बी ऑर नॉट टू बी’ करतच आयुष्य संपवावं लागतं. हा ‘संभ्रम’ कधी ब्रूटस् बनून काळजात खंजीर खुपसून आपला खातमा करेल याचा नेम नाही. ‘ब्रूटस्-यू टू?’- असं म्हणायचीसुद्धा संधी देणार नाही. तेव्हा, युगानुयुगे अमरत्व घेऊन आलेल्या ह्या ‘संभ्रम’ नावाच्या अश्वत्थाम्याच्या कपाळावरचा ‘यशा’चा मणी, हिसकावून घेऊन त्याला नेस्तनाबूत करा. ‘जितं मया’ म्हणण्याची संधी त्याला कधीच देऊ नका. नाहीतर, कृष्णाच्या जागी तुम्हावर ‘संभ्रमामि युगे-युगे’ करत, विल्हेवाटीची गाथा सांगण्याची वेळ येईल.