संपादित करायच्या भूखंडाची माजी मंत्र्याकडूनच खरेदी

मडकईकर यांच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
सन २००४ मध्ये जुने गोवे पोलीस स्थानकासाठी तत्कालीन मंत्री व कुंभारजुवेचे विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांनी सुचविलेल्या जमिनीचे संपादन करण्यास आपण तात्काळ मान्यता दिली होती. त्यावेळी तो भूखंड धुमे नामक व्यक्तीच्या मालकीचा होता. मात्र, आता तो मडकईकर बिल्डर्सच्या मालकीचा असल्याचे आढळून आले आहे. हा भूसंपादन कायद्याचा सरळसरळ गैरवापर असून भ्रष्टाचाराचाच प्रकार आहे. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधी पोलिसांकरवी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आपण आजच देऊ असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले.
मडकईकर यांनी भूसंपादनासंदर्भात विचारलेला प्रश्न त्यांच्यावरच उलटल्याने काल सभागृहात खळबळ माजली. सदर भूखंड संपादित करण्यास नगरनियोजन खात्याने हरकत घेतली होती, त्यामुळे नंतरच्या काळात तो आपण विकत घेतला असे सांगण्याचा मडकईकर यांनी प्रयत्न केला, मात्र, सरकार संपादित करू पाहात असलेली जमीन मंत्रीच खरेदी करतो हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्याची समूळ चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरोधकांचा आवाज बंद पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप मडकईकर यांनी यावेळी केला. आपला पणजीतील एक भूखंडही सरकार संपादित करू पाहत आहे. सरकारला हवा असेल तर जुने गोवे पोलीस स्थानकासाठी आपण हा भूखंड दान करू असे मडकईकर म्हणाले. मात्र, या प्रकरणाच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री ठाम राहिले. काही दिवसांपूर्वी सां जुझे द आरियाल येथे बॉम्ब असल्याचे वृत्त मिळाल्यानंतर सदर पोलिसांना तेथे पाठविले होते. त्यावेळी त्यांनी काय केले हे सर्वश्रृत आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे डीजीपी संकटात आले असते, असे ते म्हणाले. बॉम्ब शोधक पथक तयार करण्यासाठी नवीन पोलिसांना प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले जाईल, असे पर्रीकर यांनी सांगितले.

 

Leave a Reply