ब्रेकिंग न्यूज़

संजीवनी साखर कारखान्याला आतापर्यंत १०१ कोटींचे नुकसान

>> महिन्याभरात तोडगा काढणार ः मंत्री गावडे

संजीवनी सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत १०१ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून ह्या कारखान्याला वार्षिक १० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत असल्याचे, सहकार मंत्री गोविंद गावडे यानी काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला विधानसभेत सांगितले.

यावेळी काही विरोधी आमदारांनी सरकार अशा परिस्थितीतही हा कारखाना सुरूच ठेवणार आहे काय, अशी विचारणा केली व चर्चिल आलेमांव यांनी कारखाना बंद करण्याची सूचना केल्याच्या पार्श्‍वभूमीवर गावडे यानी याप्रकरणी एका महिन्याच्या काळात काय तो तोडगा काढण्याचे आश्‍वासन सभागृहात दिले. ह्या कारखान्यात १३२ जण काम करीत आहेत. तसेच राज्यात ९५६ ऊस उत्पादक आहेत. त्यामुळे काहीही निर्णय घेताना या लोकांचाही विचार करावा लागणार असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.

कारखान्यात अल्कोहॉलचे
उत्पादन करावे ः राणे
प्रतापसिंह राणे यानी यावेळी कारखान्यात केवळ साखरेचे उत्पादन न करता ऍथेनॉल ह्या आल्कोहॉलचेही उत्पादन करावे, अशी सूचना केली. गोव्यात ऊसाची लागवड कमी होत असल्याने कारखान्याला हवा तेवढा ऊस मिळत नाही, असे गावडे यानी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात आता साखर् कारखान्यांची संख्या वाढल्याने तेथील ऊस उत्पादक गोव्यात ऊस पाठवीत नसल्याचेही गावडे यानी सांगितले.

नोव्हेंबरमध्ये कारखाना सुरू होणे अशक्य
प्रसाद गांवकर यानी हा कारखाना येत्या नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल काय, असे विचारले असता गावडे यांनी शक्य नसल्याचे सांगितले. विजय सरदेसाई यानी सांगितले की, मंत्रिमंडळाने हा कारखाना कृषी खात्याकडे सोपवला होता. आता सहकार मंत्री ह्या कारखान्यासंबंधीच्या प्रश्‍नाना कसे काय उत्तर देतात, असा प्रश्‍न केला.