‘संजीवनी’ कायमचा बंद करणार नाही

>> प्रशासकांच्या इशार्‍यावर सरकारचे स्पष्टीकरण

संजीवनी साखर कारखाना बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असा खुलासा सरकारने केला आहे. तर दुसरीकडे दयानंदनगर – धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना नुकसानीत चालत असल्याने हा कारखाना या वर्षापासून बंद करण्याचा निर्णय कारखान्याचे प्रशासक तारीक थॉमस यांनी ऊस उत्पादकांच्या बैठकीत घेतला. बुधवारी ऊस उत्पादक शेतकर्‍यांची संजीवनीच्या प्रशासकांसमवेत प्रकल्पाच्या परिषद सभागृहात बैठक झाली, त्यात ही माहिती देण्यात आली. यावेळी गोमंतक ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, उपाध्यक्ष हर्षद प्रभुदेसाई व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संजीवनी बंद करण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादकांत खळबळ उडाली असून संजीवनी बंद करण्याबाबत लेखी काय ते द्या, आणि धोरण स्पष्ट करा, अन्यथा संजीवनीसमोर उपोषण करण्याचा निर्णय ऊस उत्पादकांनी घेतला आहे.

ऊस उत्पादकांची रक्कम
सरकारकडून येणे बाकी
ऊस उत्पादकांना अजून टनामागे २४०० सरकारकडून यायचे शिल्लक आहेत. आधीच कर्जबाजारी झालेल्या ऊस उत्पादकांना वेळेवर पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे कुटुंब चालवायचे कसे, असा सवालही या शेतकर्‍यांनी केला.
वर्षभरापासूनच संजीवनी साखर कारखाना बंद केला जाणार असल्याचे ऐकू येत होते. मात्र, सरकारने विधानसभेत विरोधकांना कारखाना कोणत्याही परिस्थितीत बंद केला जाणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते. गेल्या गळीत हंगामात कारखाना बंदच होता. त्याविषयी विरोधकांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना सहकार खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी कारखाना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिले होते.
आम्ही ऊसाऐवजी नवे पीक घेऊ. पण त्यातून आम्हाला उत्पादन मिळेपर्यंत आम्हाला ऊस उत्पादनासाठी जशी मदत केली जात होती, तशी मदत केली जावी, असा प्रस्ताव उत्पादकांनी दिला होता.

सरकारकडून खुलासा
राज्य सरकारने याबाबत खुलासा करताना सरकारने संजीवनी साखर कारखाना बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. कारखान्यासंदर्भात शेतकर्‍यांनी दिलेल्या वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा करण्यासाठी शेतकर्‍यांसोबत कारखान्यात सभा झाली, अशी माहिती प्रशासकांनी दिली असल्याचे माहिती खात्याच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सावंत यांचे मुख्यमंत्रिपद
धोक्यात : सुदिन
जर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संजीवनी साखर कारखाना बंद केला तर त्यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे. हा कारखाना बंद करणे म्हणजे शेतकर्‍यांवर घाला घालणे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सुदिन ढवळीकर यांनी दिली.

निर्णय धक्कादायक ः कामत
संजीवनी साखर कारखाना कायमचा बंद करण्याचा निर्णय धक्कादायक असून तेथे कारभार हाताळण्यासाठी नेमलेला प्रशासक हे जाहीर करतो यामागे भाजपचे कपट असल्याचे उघड होत आहे. बहुजन समाजाचे नेते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा वारसा कायमचा पुसून टाकण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे.
संजीवनी साखर कारखान्याची जागा खूप मोठी असून, कारखाना बंद करून तेथे एखादा वेगळा प्रकल्प आणण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो. सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी सर्व शेतकर्‍यांना विश्वासात घेऊनच व त्यांच्या संमतीनेच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी कामत यांनी केली आहे.