ब्रेकिंग न्यूज़
संकल्प २०१५

संकल्प २०१५

सध्या माझ्याकडे ‘आयुष’ मंत्रालयाची जबाबदारी आहे. आयुष म्हणजे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्धयोग व होमिओपॅथी या पाच भारतीय पद्धतींचा समावेश आहे. या पद्धती प्रखर होत्या. तसेच यामध्ये शस्त्रक्रियासुद्धा केल्या जातात. परंतु गतकाळामध्ये या सर्व पद्धती दाबल्या गेल्या होत्या. ऍलोपॅथीलाच जास्त महत्त्व दिले गेले होते. पण या ऍलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम खूप असून त्यामुळेच भरपूर आजार आज डोके वर काढून आहेत जसे मधुमेह, कर्करोग इ.
म्हणून नवीन वर्षाचा संकल्प हाच केलेला आहे की या भारतीय उपचार पद्धतींना विशेषतः आयुर्वेदाला जास्त प्रोत्साहन देऊन त्यासाठी योग्य इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणे, प्रत्येक राज्यात आयुर्वेदाला पुनरुज्जिवीत करून जगभर त्याचा प्रचार, प्रसार करणे हे काम नवीन वर्षामध्ये करायचे आहे. कारण या पद्धती आपल्या मातीतील असून या प्रिव्हेन्टिव्ह, कमी खर्चाच्या आहेत. तसेच या विषयांमध्ये फारसे संशोधन झाले नाही त्याला प्रोत्साहन देणे. तसेच दवाखान्यांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. आपल्या पंतप्रधानांनी २१ जून हा ‘योगदिन’ म्हणून घोषित केला आहे व युनोनेही त्याला मान्यता दिली आहे. आणि योग तर नियमितपणे अनुसरल्यास तो रोग होऊच देत नाही. तेव्हा आयुर्वेद आणि योग तसेच इतर भारतीय उपचारपद्धतींचा प्रचार, प्रसार जगभर करण्याचा संकल्प केलेला आहे.
– श्री. श्रीपाद येसो नाईक
(‘आयुष’ आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री)

काही संख्यांना उगीचच महत्त्व प्राप्त झालेलं असतं. उदा. १७६०! ‘तुझ्यासारखे १७६० पाहिलेत’ असं म्हणताना दुसर्‍याविषयीची तुष्छता दिसून येते. तशी ही २०१५ संख्या आहे का? हो, हे जसं नवं वर्ष आहे तशी माझ्या आत्तापर्यंत केलेल्या संकल्पांची संख्याही असू शकेल.
वर्षानुवर्षं संकल्प करतच असतो आपण. बरं, वर्ष म्हणजे फक्त एक जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा, दिवाळीतला पाडवा, वाढदिवस इ. इ. इ. म्हणजे वर्षाला चांगले अर्धा डझन संकल्प केले जातात. या संकल्पांचं एक बरं असतं. नवा करतो तेव्हा आधीचा केव्हाच मोडलेला असतो.
संकल्प हे पूर्ण करण्यासाठी कमी व मोडण्यासाठी अधिक असतात काय?- हा बिलकुल संशोधनाचा विषय नाही कारण ज्याचा त्याचा अनुभवच आहे ना हा? नव्याची नवलाई नऊ दिवस… नाइन डेज वंडर… चार दिनकी चॉंदनी, फिर अंधेरी रात… अशा वाक्‌प्रचारांना जीवनाच्या संदर्भात वेगवेगळे अर्थ असतीलही पण संकल्पांच्या अल्पायुष्याबद्दल सार्‍यांचं एकमत दिसून येतं. पण म्हणून संकल्प करूच नयेत की काय? – हे ज्याचं त्यानं ठरवावं.
आपण बुवा संकल्प करण्याची (नि मोडण्याची) एकही संधी सोडत नाही. असो. जीवनाच्या उत्तरायणात नवा संकल्प सुचणं हेही अवघड होऊन बसतं. कारण आजवर केलेले असंख्य संकल्प!
तरीही संकल्प करायचा ठरवला की देहापासून आरंभ करायचा. म्हणजे वजन (मुख्यतः पोट) कमी करणे! सकाळी लौकर उठून फिरायला जाणे – व्यायाम करणे – निदान योगाभ्यास! यावेळी ठरवलंय आजुबाजूला पसारा करून अस्वच्छता निर्माण करण्याची सवय बदलणं. म्हणजे अगदी नेस्तनाबूत करणं. ‘अस्ताव्यस्त समस्त वस्तु मिळोनी गृहस्थ हा स्थापिला’- हे वर्णन आपल्याला फिट्ट बसत असेल तर संकल्प आपोआपच या परिस्थितीतून वर येईल. तो म्हणजे ॐ नमो स्वच्छतादेव्यै नमः॥ या संकल्पाचा त्या ‘नमो’शी संबंध आहेही आणि नाहीही. संकल्पाचे पैलू ः
देहाची स्वच्छता ः देहाची स्वच्छता निदान जनलज्जेस्तव राखावीच लागते. म्हणून संकल्पाचा हा महत्त्वाचा पैलू नाही.
घराची-खोलीची स्वच्छता ः इथं भरपूर वाव आहे कष्टांना नि कल्पकतेला! बिछान्यापासून किंवा खोलीतल्या कोपर्‍यांपासून किंवा लिहिण्याच्या टेबलापासून अगदी जमिनीपासून ते छपरापर्यंत सगळीकडे स्वच्छता – कचरा व्यवस्थापन – प्रसन्न वायुमंडल यासाठी अगरबत्तीपासून सुगंधी फवार्‍यापर्यंत सारं वापरायचं ठरवलंय.
परिसराची स्वच्छता ः सर्वप्रथम परिसर घाण न करणं अन् सामुहिक अभियान असेल तर अवश्य सहभाग घेणं. कारण स्वच्छता हा केवळ सहयोग नाही तर सहयज्ञही आहे.
अंगभूत सवयींची स्वच्छता ः ‘पडिले वळण इंद्रिया सकळा’ अशा सवयीतूनच अस्वच्छता फोफावते.
इतर खूप कष्ट, प्रयत्न करतच असतो त्यात ‘स्वच्छतेच्या संस्काराला’ प्राधान्य व प्राथमिकता देणं हा या संकल्पाचा प्राण आहे.
मन-बुद्धीची स्वच्छता ः आयुष्यभर खूप कचरा मनात साठलाय. बुद्धीची विचारक्षमताही मंद व मलीन झालीय. खरी स्वच्छतेची (याला शुद्धता म्हणता येईल) आवश्यकता इथंच आहे. इंटिरियर डेकोरेशन म्हणजे मनाची सजावट असेल तर त्यासाठी मनाची मशागत ही पूर्वतयारी आहे. याचा आरंभ अर्थातच स्वच्छतेनं म्हणजे शुद्ध भाव, मंगल विचार यांनीच व्हायला हवा ना?
चित्ताची स्वच्छता म्हणजे शुचिता ः पावित्र्य! यासाठी अंतरंगीची उपासनाच हवी. यासाठी एकांतसेवन व निवांतसाधना करून मनाला-बुद्धीला सर्वांगीण स्वच्छतेचा प्रखर संदेश देणं अत्यावश्यक आहे. अशा स्वच्छतेसाठी झाडू – ब्रश – बादली अशी साधनं नकोत. हवी स्वच्छता – पवित्रता -शुचिता यांची प्रेरणा देणारी सप्तपदी ः श्रवण-वाचन-मनन-चिंतन-ध्यान-निदिध्यासन-अनुसंधान अन् या प्रवासासाठी शिदोरी म्हणून ‘अंतरीच्या ज्ञानदिव्यां’च्या प्रकाशात चालू असलेलं अखंड नामस्मरण! असं अंतर्बाह्य स्वच्छ-स्वच्छ होण्यासाठी स्वतःला व स्वसंकल्पाला शुभकामना द्यायला काय हरकत आहे? देऊ या तर नववर्षाच्या शुभेच्छा!!
– श्री. रमेश पु. सप्रे

नवीन वर्षांत मी माझं चित्रात्मक आत्मचरित्र प्रसिद्ध करायचं ठरवलं आहे. ज्यामध्ये वैयक्तिक आठवणी, गोमंतकातील ऐतिहासिक क्षण नमूद झालेले असतील. आता वयाच्या ८१ व्या वर्षी संकल्प तो काय करणार? निरनिराळ्या अनेक कार्यक्रमांमध्ये समाजातील अनेक घटकांना मार्गदर्शन करणार.
– श्री. गोपाळराव मयेकर
(ज्येष्ठ साहित्यिक)

माझा नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे ‘हार्ड वर्क’ करणे हा आहे. खाण विभागात विशेष तपासकाम अधिकारी म्हणून माझी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे ते काम प्राधान्याने करणार. तसेच कधी कधी काही कार्यक्रमांमध्ये आम्हाला बोलवलं जातं. तेव्हा सरकारच्या अनुमतीनेच आम्ही जाऊन त्यांना मार्गदर्शन करणार. या नवीन वर्षांत आजच्या महिलांनी जरा कडक व्हायला पाहिजे, शरणागती पत्करू नये, असे मला वाटते. तसेच त्यांनी मनापेक्षा बुद्धीने निर्णय घ्यावेत असे मला वाटते. ही माझ्या आईची शिकवण आहे जी मी जन्मभर ध्यानात ठेवीन व आजच्या महिलांनाही सांगीन की त्यांनी बुद्धीने निर्णय घ्यावेत. कारण मन हे भावनावश होऊन निर्णय घेते पण बुद्धी ही सारासार विचार करून निर्णय घेते. बुद्धी ही चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही.
– सुनिता सावंत
(डेप्युटी पोलीस अधीक्षक)

या युरोपियन नवीन वर्षांत मला विद्याभारती या शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून अधिकाधिक शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणे, विद्येच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या टीमला पोषक आणि पूरक राहणे व आणखी नवीन संस्था उघडणे हे उद्दिष्ट गाठायचे आहे. सध्या विद्याभारतीच्या ६० शाखा आहेत त्या १०० पर्यंत वाढवायच्या आहेत. तसेच या संघटनात्मक कार्यासाठी इन्टेन्सिव कार्यकर्ता, चांगल्या पद्धतीने काम करणारा कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी गाठीभेटी तसेच त्यांची काळजी घेणे यादृष्टीने कार्य करायचे आहे.
गोव्यातील एकमेव संस्था विद्याप्रबोधिनी येथे डिएबिएड हा उपक्रम सुरू करायचा आहे ज्यामुळे अधिकाधिक संस्कारपूर्ण शिक्षक निर्माण होतील. यामध्ये विद्यार्थ्याला पदवी मिळविण्याची गरज नसून १२ वी मध्येच त्याला शिक्षकी पेशा स्विकारण्याचे निश्‍चित करावे लागेल. त्यामुळे अधिक चांगले शिक्षक निर्माण होतील.
– श्री. सुभाष वेलिंगकर
(ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ)

सर्वप्रथम आपल्या पंतप्रधानांचे जे स्वच्छ भारत अभियान आहे त्याच्या अंतर्गत आपल्या इस्पितळात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून स्वच्छता आणि सहानुभूती या दोन गोष्टी रुग्ण बरा होण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाकडे सहानुभूतीच्या दृष्टीने बघितले जाईल जे त्याच्या आरोग्याकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज तपासणीसाठी येणारे रुग्ण तसेच इस्पितळात भरती होणार्‍या रुग्णांचा निवास येथे जास्तीत जास्त आरामदायी कसा राहील याकडे लक्ष पुरविणार असून त्या दृष्टीने स्वच्छता अभियानाला सुरुवातही झालेली आहे.
येथील साचलेल्या कचर्‍याची उचल झालेली असून ठिकठिकाणी झाडे, हिरवळ लावण्यात आलेली आहेत. त्यामुळे स्वच्छतेबरोबरच सौंदर्यवृद्धीही साधली जाणार आहे.
– डॉ. सुनंदा आमोणकर
(वैद्यकीय व्यवस्थापक गो.मे.कॉ.)
सर्वप्रथम जानेवारी महिन्यात ११ ते १७ या दरम्यान ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह’ पाळण्यात येणार असून या माध्यमातून अधिकाधिक युवकांमध्ये रस्ता सुरक्षेसंबंधी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले जाईल, ज्यामध्ये दारू पिऊन वाहन चालविणे तसेच हेल्मेट वा सीट बेल्ट सक्ती इ. गोष्टींचा समावेश आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे वाहतूक संचालनालयामध्ये सर्व कामकाजासाठी जास्तीत जास्त संगणकाचा वापर करून त्यासाठी बाहेरील लोकांचा कमीत कमी संपर्क राहावा, यासाठी एका माहिती केंद्राची योजना केलेली असून संपूर्ण माहिती लोकांना मिळेल तसेच परवाने, करवसुली इत्यादीसाठी लोकांची कामे लवकर होतील.
तिसरी गोष्ट म्हणजे वाहतूक संचालनालयातील कर्मचार्‍यांसाठी इंटर पर्सनल स्किल्स (वैयक्तिक कौशल्ये) या दृष्टीने प्रशिक्षण वर्ग घेण्यात येऊन त्यांची वृत्ती व त्यांची वर्तणूक या संदर्भात त्यांना असे सांगितले जाईल की तुम्ही फक्त सरकारी नोकर नसून तुम्ही लोकसेवक आहात. त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील. तसेच शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोव्यात येणार्‍या पर्यटकांच्या सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा तसेच सुरळीत करण्यासाठी भरघोस प्रयत्नकेले जातील.
– श्री. अरूण देसाई
(वाहतूक संचालक)