संकटमोचकाची प्रतीक्षा

देशात असो वा गोव्यात असो, कोरोनाचा फैलाव आटोक्यात येताना दिसत नाही. देशामध्ये एकूण रुग्णसंख्या साडे अकरा लाखांवर जाऊन पोहोचली आहे आणि आतापर्यंत २८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर गोव्यामध्ये एकूण रुग्णसंख्या कालपर्यंत ३८५३ पर्यंत पोहोचली असून आतापर्यंत २५ बळी गेले आहेत. देशाचा विचार करता कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्क्यांवर गेले आहे, तर मृत्यूदर चार टक्के आहे. गोव्यामध्ये सध्या बरे होण्याचे प्रमाण ६१.२८ टक्के आहे, तर मृत्यूदर ०.६० टक्के आहे. राज्यातील चाचण्यांच्या प्रमाणात शिथिलीकरण आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न कोरोनाच्या फैलावामुळे अंगलट आला आणि परिणामी नवनव्याने सापडणार्‍या रुग्णांशी संबंधितांच्या चाचण्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे दर दहा लाखांमागे ७०४२८ चाचण्या असे सध्याचे प्रमाण आहे. तरीही राज्याची फार मोठी लोकसंख्या कोरोनाच्या या थैमानापासून स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी ठरणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक प्रयत्न जरूरीचे आहेत.
आरोग्य खात्याकडून सध्या दिल्या जाणार्‍या आकडेवारीतून गावांची नावे चतुराईने वगळण्यात येत आहेत. त्यामुळे कोणकोणत्या नव्या गावामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे हे सांगणे आता कठीण झाले आहे. परंतु राज्यातील विविध आरोग्यकेंद्रांशी संबंधित रुग्णांची जी आकडेवारी सरकारतर्फे प्रसृत केली जाते आहे, ती पाहिली तरी नवनव्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याचा ठोस अंदाज बांधता येतो. कालपर्यंतची उत्तर गोव्याची आकडेवारी पाहिल्यास, पेडण्यामध्ये रुग्णसंख्या २१ वर गेली आहे. कासारवर्णेत १५ रुग्ण आहेत. साखळीत तब्बल ७२, डिचोलीत ८ आणि वाळपईत ११ आहेत. म्हापशात ५१ रुग्ण आहेत, तर पणजीत २३. चिंबलची संख्या ९१ वर आली आहे, तर पर्वरीची २६ वर. कोलवाळमध्ये १३, खोर्लीत २०, कांदोळीत ३० रुग्ण आहेत.
दक्षिण गोव्यातील स्थिती अजूनही भयावह आहे. वास्को नागरी आरोग्य केंद्राशी संबंधित रुग्णसंख्या ३१५, तर कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संबंधित रुग्णसंख्या ३६९ वर गेलेली आहे. फोंड्यात ४७, धारबांदोड्यात २९, शिरोड्यात १४, मडकईत ७, मडगावात ४७, कुडचड्यात १५, केप्यात ११, काणकोणात ८, शिवाय कासावली, कुडतरी, लोटली, नावेली अशी नामावली मोठी आहे. हा सगळा तपशील विस्ताराने सांगण्याचे कारण एवढेच की अजूनही कोरोनाचा फैलाव राज्यामध्ये वाढताच आहे. तो कमी झालेला नाही.
रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देशाच्या इतर भागांप्रमाणेच गोव्यातही मोठे जरी असले, तरी गेल्या महिन्याभरामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे ही चिंतेची बाब आहे. ‘कोमॉर्बेडिटी’ च्या युक्तिवादाचे बिंग राज्यपालांनी फोडलेच आहे. त्यामुळे निष्कारण सारवासारव न करता या वाढत्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्याची शिकस्त करावी लागणार आहे. प्लाझ्मा उपचारपद्धतीचा अवलंब सरकारने सुरू केला, परंतु त्याच्या यशापयशासंबंधीची माहिती अद्याप सरकारने उघड केलेली नाही. ती माहिती पारदर्शकरीत्या जनतेपुढे आली पाहिजे.
लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांना चाचणी न करताच थेट घरी पाठवण्याची रणनीती विद्यमान रुग्णसंख्या कमी दाखवण्यासाठी जरी उपकारक ठरत असली, तरी अशा प्रकारे घरी परतणार्‍या रुग्णांकडून इतरांना संसर्ग होत आहे का यासंबंधी अधिक तपशील उपलब्ध झाला पाहिजे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलेले असूनही सध्याची रुग्णसंख्या सरासरी सातशे – आठशेवरून आता रोज दीड हजाराच्या घरात चालली आहे.
या सार्‍या पार्श्वभूमीवर एक फार मोठी दिलासादायक बाब म्हणजे जागतिक स्तरावर कोरोनावर औषध शोधण्याचे जे व्यापक प्रयत्न चालले आहेत, त्यापैकी बर्‍याच जणांना यश येऊ लागल्याचे दिसते आहे. त्यात सर्वांत आघाडीवर असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पातील लशीची चाचणी यशस्वी झाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे भारतामध्येही सेरम इन्स्टिट्यूटतर्फे तिच्या उत्पादनास लवकरच हिरवा कंदील मिळेल. शिवाय आयसीएमआर पुरस्कृत लशीच्या मानवी चाचण्यांनाही प्रारंभ झाला आहे. त्या चाचण्यांकडेही देश डोळे लावून बसला आहे. कोरोनाला आता जग उबगले आहे. त्यावर लवकरात लवकर औषध यावे आणि एकदाचा हा काळा कालखंड दूर व्हावा अशा अपेक्षेत जग आहे. जगाचा संकटमोचक कोण होतो आणि हे संकट केव्हा एकदाचे दूर सारतो हे पाहूया!