श्रीलंकेची शरणागती

विश्‍वचषक स्पर्धेपूर्वीच्या सराव लढतीत काल दक्षिण आफ्रिकेने व्यावसायिक खेळाचे दर्शन घडवताना श्रीलंकेचा ८७ धावांनी पराभव केला. क्विंटन डी कॉक व डेल स्टेन यांना न उतरवतादेखील आफ्रिकेने या सामन्यात बाजी मारली. ३३८ धावा फलकावर लगावल्यानंतर त्यांनी लंकेचा डाव ४२.३ षटकांत २५१ धावांत संपवला.

दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात आक्रमक खेळ दाखवला. सलामीला उतरलेला हाशिम आमला, कर्णधार फाफ ड्युप्लेसी व वेंडर दुसेन यांनी आघाडी फळीतील जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. चांगल्या सुरुवातीनंतर ऐडन मार्करम मात्र मोठी खेळी करू शकला नाही. हाणामारीच्या षटकांत ख्रिस मॉरिसने १३ चेंडूंत जलद २६ धावा फटकावत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. लंकेकडून धावा रोखण्याचे काम इसुरु उदाना याने केले. इतर गोलंदाज महागडे ठरत असताना त्याने १० षटकांत केवळ ४२ धावा मोजून १ गडी बाद केला. धावांचा पाठलाग करताना लुंगी एन्गिडीने लंकेची २ बाद १० अशी केविलवाणी स्थिती केली. कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने ९२ चेंडूंत ८७ धावांची आश्‍वासक खेळी केली.

अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने ६४ धावांचे योगदान दिले. परंतु, अष्टपैलू म्हणून संघात असलेल्या धनंजय डीसिल्वा, जीवन मेंडीस, मिलिंदा सिरीवर्धना व थिसारा परेरा यांना प्रभाव पाडता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून अष्टपैलू आंदिले फेहलुकवायो याने ३६ धावांत चार गडी बाद करत लंकेचे कंबरडे मोडले. एन्गिडीने आपल्या सहा षटकांत केवळ १२ धावा दिल्या.

धावफलक
दक्षिण आफ्रिका ः हाशिम आमला त्रि. गो. जीवन ६५, ऐडन मार्करम झे. कुशल परेरा गो. लकमल २१, फाफ ड्युप्लेसी झे. लकमल गो. धनंजय ८८, हिथर वेंडर दुसेन झे. धनंजय गो. प्रदीप ४०, डेव्हिड मिलर झे. करुणारत्ने गो. उदाना ५, जेपी ड्युमिनी झे. कुशल मेंडीस गो. लकमल २२, आंदिले फेहलुकवायो झे. वंदेरसे गो. प्रदीप ३५, ड्वेन प्रिटोरियस नाबाद २५, ख्रिस मॉरिस नाबाद २६, अवांतर ११, एकूण ५० षटकांत ७ बाद ३३८

गोलंदाजी ः सुरंगा लकमल ९-०-६३-२, नुवान प्रदीप १०-०-७७-२, थिसारा परेरा ६-१-३१-०, इसुरु उदाना १०-०-४२-१, जीवन मेंडीस ५-०-४५-१, जेफ्री वंदेरसे २-०-३०-०, धनंजय डीसिल्वा ८-०-४४-१
श्रीलंका ः कुशल परेरा झे. मिलर गो. एन्गिडी ०, दिमुथ करुणारत्ने झे. मार्करम गो. रबाडा ८७, लाहिरु थिरिमाने झे. मिलर गो. एन्गिडी १०, कुशल मेंडीस पायचीत गो. फेहलुकवायो ३७, अँजेलो मॅथ्यूज झे. मॉरिस गो. ड्युमिनी ६४, धनंजय डीसिल्वा त्रि. गो. फेहलुकवायो ५, जीवन मेंडीस झे. मिलर गो. फेहलुकवायो १८, मिलिंदा सिरीवर्धना झे. मार्करम गो. फेहलुकवायो ५, थिसारा परेरा नाबाद ८, जेफ्री वंदेरसे झे. ड्युमिनी गो. प्रिटोरियस ३, सुरंगा लकमल पायचीत गो. ताहीर १, अवांतर १३, एकूण ४२.३ षटकांत सर्वबाद २५१
गोलंदाजी ः लुंगी एन्गिडी ६-२-१२-२, कगिसो रबाडा ७-०-४०-१, ख्रिस मॉरिस ४-०-३१-०, आंदिले फेहलुकवायो ७-०-३६-४, इम्रान ताहीर ५.३-०-३१-१, ड्वेन प्रिटोरियस ५-०-३४-१, तबरेझ शम्सी ५-०-३७-०, जेपी ड्युमिनी ३-०-२७-१