ब्रेकिंग न्यूज़

श्रीलंकेचा विंडीजवर विजय

>> अविष्का फर्नांडोचे शतक सार्थकी, निकोलस पूरनची सेंच्युरी व्यर्थ

निकोलस पूरन (११८) याचा कडवा प्रतिकार ’ोडून काढत काल श्रीलंकेने विंडीजचा २३ धावांनी पराभव केला. उभय संघांच्या विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा या सामन्यापूर्वीच मावळल्या होत्या. त्यामुळे या सामन्याला फारसे महत्त्व नव्हते. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना केलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना विंडीजला ९ बाद ३१५ पर्यंतच जाता आले.

तत्पूर्वी, कर्णधार दिमुथ करुणारत्ने व कुशल परेरा यांनी विंडीजच्या गोलंदाजांना दाद न देता ९३ धावांची खणखणीत सलामी दिली. करुणारत्ने (३२) बाद झाल्यानंतर काही षटकांनंतर कुशल परेरा (६४) बाद झाला. त्याने आपले चौदावे वनडे अर्धशतक झळकावले. कुशल मेंडीसच्या साथीने अविष्का फर्नांडोने संघाचा डाव पुढे नेला. मेंडीसने चांगली सुरुवात केली होती, पण एलनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. नवोदित अविष्का फर्नांडोने मात्र एक बाजू लावून धरली आणि दमदार शतक झळकावले. पण शतक ठोकल्यानंतर तो लगेचच बाद झाला.

विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकवणारा तो सर्वात तरुण श्रीलंकन फलंदाज ठरला. त्याने १०३ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकार खेचत १०४ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लाहिरू थिरिमाने याने डाव सावरत श्रीलंकेला तीनशे पार मजल मारून दिली. थिरिमाने याने नाबाद ४५ धावा केल्या. विंडीजकडून जेसन होल्डर याने सर्वाधिक २ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः श्रीलंका ः ५० षटकांत ६ बाद ३३८ (फर्नांडो १०४, कुशल परेरा ६४, थिरिमाने नाबाद ४५, कुशल मेंडीस ३९, करुणारत्ने ३२, होल्डर ५९-२, कॉटरेल ६९-१, थॉमस ५८-१, एलन ४४-१) वि. वि. वेस्ट इंडीज ५० षटकांत ९ बाद ३१५ (पूरन ११८, एलन ५१, गेल ३५, हेटमायर २९, होल्डर २६, मलिंगा ५५-३, मॅथ्यूज ६-१, वंदेरसे ५०-१, रजिता ७६-१)