ब्रेकिंग न्यूज़
श्रावणी पौर्णिमा … अर्थात् …

श्रावणी पौर्णिमा … अर्थात् …

  •  अंजली आमोणकर

पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणकथा ऐकण्याचे उत्सव साजरे करत असत. तर कुमारांना शिक्षण घेण्यासाठी सुरुवात करण्यास मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे ‘श्रावणी’ साजरी करणे ठरते.

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणांमध्ये ‘रक्षाबंधन’ हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी पौर्णिमा’, महाराष्ट्रात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने तो साजरा केला जातो.

इंद्र, दानवांकडून पराजीत झाले होते तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवांचा आत्मविश्‍वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवांवर विजय मिळवला होता. अशी पौराणिक कथा आहे. तसेच महाभारतात श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहात होते, तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या वस्त्राची भरजरी किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला व पाळला. रक्षाबंधन हे नाव- संरक्षणाचे बंधन आहे.

भारतीय इतिहासातही रक्षाबंधनासंदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तौढगढची राणी कर्मावतीने, बहादूरशहापासून स्वतःची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायुने राणीच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावली होती. नोबेल पुरस्कार विजेते रवीन्द्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदू व मुस्लिम यांच्यात सलोखा निर्माण करण्यासाठी दोन्ही समुदायांना एकमेकांच्या हातावर रक्षासूत्र बांधण्याची विनंती केली होती.
पौराणिक कथा व इतिहास चाळता, रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला दिसतो. आता तर हे पर्व भाऊवहिणीच्या अतूट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते.

बहीण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा फक्त मस्तकाच्या आदराचा नसून, भावाच्या मस्तकातील सद्विचार व सद्बुद्धी जागृत राहण्यासाठीची पूजा आहे. सामान्य डोळ्यांनी जे पाहू शकत नाही ते सर्व विकार, भोग, लोभ, मत्सर, वासना, द्वेष, राग इत्यादींकडे भावाने आपल्या या तिसर्‍या डोळ्याने बघावे या हेतूने बहीण हा टिळा लावून भावाला त्रिलोचन बनवते. राखीचा धागा हादेखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील- स्नेह- पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे, पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे. या एवढ्याशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मनं प्रफुल्लित होतात.
एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात वा संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्त्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो – हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.
राखी सोन्याची, चांदीची, जरतारी शेल्याची, शाळकरी मुलांनी तयार केलेली किंवा इंटरनेटच्या माध्यमातून पाठवलेली ई-शुभेच्छापत्रासहितची राखी असो, या सर्वांमागे एकच भावना आहे व ती म्हणजे भावा-बहिणीचे परस्परांवरील प्रेम. जरी राखीच्या सणातून स्त्री आपल्या सुरक्षेची जबाबदारी भावावर टाकत असली तरी यातून तिचा दुबळेपणा सिद्ध न होता, भावाच्या कर्तृत्वावरचा विश्‍वासच सिद्ध होतो. त्यामुळेच भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानून त्याला ओवाळते. त्यापायीच चंद्र हा समस्त बच्चेकंपनीला ‘चंदामामा’ म्हणून ओळखीचा आहे.
तूच आमचा त्राता म्हणून देवालाही त्यादिवशी राखी वाहतात. उपयोगातल्या सर्व वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते. पूर्वी घरातले पुरोहित मंत्र म्हणून घरातील सर्वांना राख्या बांधायचे पण ते प्रत्यक्षात अभिमंत्रित सुरक्षाकवच असायचे.
लग्न झालेल्या बहिणीस दुवा म्हणून माहेरी जोडून ठेवण्याचे काम हे सण करतात. बहीण लहान असेल तर भाऊ वडिलांचीच भूमिका पार पाडतो पण बहीण मोठी असेल तर आईनंतर तीच त्याची आई बनलेली दिसते.
राखी पौर्णिमेच्या दिवशी यमलहरींचे प्रमाण जास्त असते. यमलहरी या पुरुष साकारत्व असतात म्हणजेच त्या पुरुषांच्या देहात जास्त प्रमाणात गतिमान होताना दिसतात. याच कारणास्तव यमदूत किंवा यमराज यांना प्रत्यक्ष चित्र साकारतेच्या दृष्टीने साकारताना पुरुष स्वरूपात साकारले जाते. पुरुषांच्या देहात यमलहरींचे प्रवाह वाहणे चालू झाले की त्यांची सूर्यनाडी जागृत होते आणि या सूर्यनाडीच्या आधारे देहातील रज-तमाची प्रबलता वाढून यमलहरी पूर्ण शरीरात प्रवेश करतात. जिवाच्या देहात यमलहरींचे प्रमाण ३० टक्क्याहून अधिक झाल्यास त्याच्या प्राणाला धोका उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून पुरुषात असलेल्या शिवतत्त्वाला जागृत करून, जिवाच्या सुषुम्ना नाडीची काही अंशी जागृती करून प्रत्यक्ष शक्तीबिजाद्वारे म्हणजेच बहिणीद्वारे प्रवाहित होत असलेल्या यम लहरींना तसेच प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी सहाय्य करणार्‍या सूर्यनाडीला राखीचे बंधन घालून शांत करण्यात येते- असे ज्ञानी सांगतात.
श्रावण पौर्णिमेसच ‘श्रावणी’ असेही म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणकथा ऐकण्याचे उत्सव साजरे करत असत. तर कुमारांना शिक्षण घेण्यासाठी सुरुवात करण्यास मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ, शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे ‘श्रावणी’ साजरी करणे ठरते. श्रावण महिन्यात जानवी बदलण्याचा कार्यक्रम होतो. या ऋग्वेदी आणि शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणांसाठी नागपंचमीच्या दिवशी, (श्रावण शुद्ध पंचमी) हिरण्यकेशी व तैत्तिरीय ब्राह्मणांसाठी वर्णषष्ठीच्या दिवशी (श्रावण शुद्ध षष्ठी) व सर्वसामान्य ब्राह्मणांसाठी श्रावण पौर्णिमेला होतो.

तामिळ पंचांगाप्रमाणे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी ‘अवनी’ नावाचा तामीळ महिना चालू असतो. जैन लोक हा दिवस रक्षापर्व म्हणून पाळतात. त्यादिवशी जैन मंदिरातून राख्या ठेवलेल्या असतात. जैनमुनी त्यांचे आदराने ग्रहण करतात. उत्तर भारतात नोकर मालकाच्या हाताला राखी बांधतात.
राखी बांधताना बहिणीने म्हणावे…..
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल
तेन त्वा मनुबद्धामि रक्षै मा चल, मा चल….
(दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहे) …. असे सांगितले आहे.
राखी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमाही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी राहणारे लोक, वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. जहाजांनी मालाची वाहतूक करताना गलबतं व मचव्यांनी मासळी धरायला खोल समुद्रात जाताना… वरुणदेव प्रसन्न असल्यास तो सहाय्य करतो असे मानतात.

प्राचीन काळात थोडे आणखी डोकवावे तर अशी माहिती मिळते की रोगनिवारक औषधे रेशमी वा तलम सुती कपड्यात बांधून आरोग्याचे संरक्षण व्हावे म्हणून बांधली जात असत. पावसाळ्यात श्रावण महिन्यात अनेक प्रकारचे कीडे-कीटक वातावरणात असतात. त्यांच्यापासून सुरक्षित राहता यावे, यासाठी हे बंधन समारंभपूर्वक बांधले जात असे.
रक्षाबंधन जरी श्रावण पौर्णिमेलाच करत असलात तरी पौर्णिमा जर दोन दिवसात विभागून आली असेल तर दुसर्‍या दिवशी राखी बांधली जाते. राखी बांधण्याची सर्वोत्तम वेळ अपरोहन (अपरान्ह) काळ (म्हणजे दुसरा प्रहर- दुपार) असतो. रक्षाबंधन विधी भद्रामध्ये करू नये असे शास्त्र सांगते. तिथीचा पहिला प्रहर हा भद्रकाळ असतो.
देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणार्‍या सैनिकांसाठी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (नॅब)च्या अंध मुली एकहजार राख्या तयार करून पाठवतात. गेल्या वर्षी त्यांनी नौदलालाही पाचहजार राख्या तयार करून पाठवल्या. राखी मेकिंग व डिझायनिंग हा रोजगार म्हणूनही आज फोफावत आहे.