शेवटचा शिलेदार

मराठी वृत्तपत्रसृष्टीतील मालक – संपादक परंपरेचे शेवटचे अध्वर्यू म्हणता येईल असे पत्रपंडित नीळकंठ खाडिलकर यांचे काल निधन झाले. ‘अग्रलेखांचा बादशहा’ अशी स्वतःची ओळख निर्माण केलेल्या खाडिलकरांचा ‘नवाकाळ’ आजही मुंबईत भांडवलदारी वर्तमानपत्रांच्या गळेकापू स्पर्धेमध्ये जिद्दीने तग धरून आहे आणि त्यांच्या कन्या त्यांच्यामागून ती लढाई लढत आल्या आहेत. कोणत्याही वर्तमानपत्राची खरी ताकद ही त्याच्या खपापेक्षा त्याच्या वाचकांवरील प्रभावावरून मोजली जात असते. खप वाढवण्यासाठी आजकाल भेटवस्तू आणि कूपनवर चालणार्‍या सवंग वर्गणीदार योजना सर्वत्र बोकाळलेल्या दिसतात. भांडवलदारी व्यवस्थापनाकडून प्रचंड पैसा ओतून वाचकाला आपल्याकडे आकृष्ट करण्याचा खटाटोप सतत चाललेला असतो. परंतु वर्तमानपत्र हे शेवटी विचारपत्र आहे आणि प्रबोधनाचे माध्यम आहे ही भूमिका जर त्यामागे नसेल तर नुसत्या खपाऊ वर्तमानपत्रांना सजग वाचकांच्या मनामध्ये ती प्रतिष्ठा कधीच लाभत नाही, जी प्रबोधनाच्या वाटेवरून चालणार्‍या वर्तमानपत्रांना लाभत असते. अग्रलेख हा कोणत्याही वर्तमानपत्राचा प्राण आहे. तो जितका निष्पक्ष, सडेतोड आणि शैलीदार असेल तितका त्या वृत्तपत्राचा राजकीय, सामाजिक जीवनामध्ये दबदबा असतो. खाडिलकरांनी आपल्या शैलीदार अग्रलेखांनी हाच दबदबा आपल्या संपादकीय कार्यकाळामध्ये निर्माण केला आणि स्वतःचा वाचकवर्ग निर्माण करीत अवतीभवतीच्या गळेकापू वृत्तपत्रीय स्पर्धेशी निकराने झुंज दिली. वास्तविक ‘नवाकाळ’ ची सुरूवात त्यांचे आजोबा नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी केलेली होती. नाट्याचार्य खाडिलकर हे एकेकाळचे लोकमान्य टिळकांचे अनुयायी आणि टिळकांच्या हयातीतच न. चिं. केळकर यांच्या जोडीने ‘केसरी’चे संपादक होते. टिळकांना १९०८ साली दुसर्‍यांदा राजद्रोहाच्या खटल्यात सहा वर्षांचा कारावास झाला ते ‘देशाचे दुर्दैव’ व ‘हे उपाय टिकाऊ नव्हेत’ हे अग्रलेख टिळकांनी नव्हे, तर खाडिलकरांनी लिहिले होते. पुढे १९२३ साली खाडिलकरांनी ‘नवाकाळ’ ची सुरूवात केली. लवकरच ब्रिटीश सरकारने त्यांच्यावरही राजद्रोहाचा खटला भरला आणि एका वर्षाच्या कारावासात रवानगी केली. खाडिलकरांनी तेव्हा आपल्या मुलापाशी – अप्पासाहेबांकडे नवाकाळची सूत्रे सोपवली. अप्पासाहेबांनी वयाच्या ६४ व्या वर्षी ती आपल्या मुलाकडे नीळकंठरावांकडे सोपवली. वडिलांच्या काळात अवघ्या पाचशे प्रतींवर उतरलेला ‘नवाकाळ’ नीळकंठरावांनी आपल्या घणाघाती अग्रलेखांच्या बळावर लोकप्रिय केला. सर्वसामान्य वाचकांना समजेल, रुचेल अशा विषयांवर शैलीदार अग्रलेख त्यांनी सातत्याने लिहिले. कोणाचीही तमा न बाळगता तुटून पडून आपला बाणेदारपणा दाखवला. आपल्या वयाची साठी उलटताच त्यांनीही नवाकाळची धुरा आपल्या कन्येकडे सोपवली होती. खाडिलकरांचा संपादकीय कार्यकाळ जवळजवळ तीन दशकांचा. या काळामध्ये केवळ आपल्या अग्रलेखांच्या बळावर त्यांनी या वृत्तपत्राचा दबदबा निर्माण केला. मालक – संपादकांची पूर्वीची परंपरा लयाला चालली असताना ‘नवाकाळ’ ची ध्वजा मुंबईसारख्या शहरामध्ये फडकत ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी त्यांच्या मराठी पत्रसृष्टीतील योगदानाची दखल घ्यावीच लागते. मॅराथॉन मुलाखत हा प्रकार अलीकडच्या काळात ‘सामना’ मधून संजय राऊतांनी गाजवला, परंतु त्यापूर्वी खाडिलकरांनी घेतलेल्या सत्य साईबाबा किंवा गोळवलकर गुरुजींच्या मुलाखती त्या काळी अशाच गाजल्या होत्या असे सांगतात. जवळजवळ चाळीसहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. रशिया दौर्‍यानंतर त्यांनी लिहिलेल्या ‘प्रॅक्टिकल सोशलिझम’ मुळे त्यांची ‘कांदेवाडीचे कार्ल मार्क्स’ अशी खिल्लीही उडवण्यात आली होती, परंतु कोणाची फिकीर करणे त्यांच्या स्वभावात नव्हते. निळुभाऊंची लेखणी सतत दणाणत राहिली. ‘देश परतंत्र होता, तेव्हा वृत्तपत्रे स्वतंत्र होती, परंतु देश स्वतंत्र झाला आणि वृत्तपत्रे परतंत्र झाली’ अशी खंत त्यांना होती. ‘पूर्वी वर्तमानपत्रांचा प्रसार कमी, परंतु प्रभाव जास्त असे. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचे लोकांवरील वजन जाऊन रद्दीतील वजन वाढले’ असे निळुभाऊ म्हणायचे. भांडवलदारांच्या वृत्तपत्रांना ध्येयवाद नसतो, तर हितसंबंध असतात असा त्यांचा आक्षेप असे. आजची वृत्तपत्रसृष्टी हा भांडवलदारांचा जनानखाना बनला आहे असे ते म्हणत. अस्तंगत होत चाललेल्या मालक – संपादक परंपरेचा हा शेवटचा शिलेदार आता त्यांच्या मृत्यूमुळे काळाच्या पडद्याआड गेला आहे. आज वर्तमानपत्रांची कमतरता नाही. चहुबाजूंनी भांडवलदारी चकचकीत, गुळगुळीत वर्तमानपत्रांचा पाऊस पडतो आहे, परंतु त्यातून अपेक्षित असलेला विचाररूपी आत्मा हरवत चाललेला आहे. विचारांची ही ज्योत तेवत ठेवणार्‍या आणि आपल्या वाचकाचे सतत उद्बोधन आणि प्रबोधन करीत राहिलेल्या नीळकंठ खाडिलकरांचा मृत्यू म्हणूनच हे भान बाळगणार्‍या प्रत्येक पत्रकाराच्या काळजात कळ उठवणारा आहे.