शुभ दीपावली

नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु…

महाराष्ट्रवाल्मिकी ग. दि. माडगुळकरांनी ‘श्रीसंत निवृत्ती ज्ञानदेव’ या संतपटासाठी अगदी ज्ञानेश्वरांच्या शैलीत हे अर्थपूर्ण गीत रचले. प्रकाश उजळतो तेव्हा नुसता भोवतालचा अंधार मिटत नाही. आपल्या मनातल्या अंधाराचे सांदिकोपरेही उजळू लागतात आणि चैतन्य त्याची जागा घेते. प्रकाशाचे महत्त्व हे असे आहे. प्रकाशाच्या मानवी शरीरावर घडणार्‍या बर्‍यावाईट परिणामावर वैज्ञानिक संशोधनही झालेले आहे आणि प्रकाश आणि मानवी मनःस्थिती यांचा संबंध आहे असा निष्कर्ष त्या संशोधनातून काढला गेलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला महत्त्व दिले गेले आहे, प्रकाशाला महत्त्व दिले गेलेले आहे. तमसो मा ज्योतिर्गमय्, तिमिरातून तेजाकडे जा असेच आपली संस्कृती सांगते. आपल्या मनातला निराशेचा अंधार जर मिटवण्याचा प्रयत्न आपण केला, तर त्यातून येणार्‍या सकारात्मकतेच्या ऊर्जेने आपल्या हातून काही महान कार्य घडू शकते असा या दीपोत्सवाचा आपणा सर्वांना संदेश आहे. भोवतालच्या निराश करणार्‍या परिस्थितीबाबत सदोदित रडगाणे गाण्याची अनेकांना सवय असते. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करणार आहोत हे मात्र हे लोक सांगत नाहीत. ज्योतीने ज्योत उजळते, तशी मना-मनातून समाजज्योत उजळेल हा विश्वासच आपण हरवून बसलो आहोत का? परिस्थिती बदलू शकते, भोवतालच्या अंधारातून प्रकाशाचे चार कोवळे किरण वर येऊ शकतात हे सिद्ध करणार्‍या काही गोष्टी गेल्या वर्षभरामध्ये आपल्या देशात घडल्या. देशात सत्तापरिवर्तन झाले आणि कोणी काही म्हणो, वर्षानुवर्षे चालत आलेल्या आणि एक परंपराच होऊन बसलेल्या ढिसाळ सरकारी खाक्यावर एक भीमटोला पडला. एक गांधी जयंती अशीही उगवली, जेव्हा देशभरातील लाखो, करोडो सरकारी कार्यालयांमधील जुनाट, जिर्ण फायलींचे ढिगारे काही तासांत उपसले गेले, मोडकळीतील खुर्च्या – टेबले बाहेर निघाली. कार्यालये स्वच्छ झाली. फायलींच्या ढिगार्‍यांत दडपून गेलेल्या आणि शुष्क मानसिकता होऊन गेलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना निदान मोकळा श्वास घेता येऊ लागला. हे कोणी केले? माणसे तर तीच होती. पण वरून एक प्रेरणा मिळाली आणि त्यातून त्याच माणसांनी स्वयंप्रेरणेने म्हणा वा वैतागाने म्हणा हा चमत्कार करून दाखवला. पल्स पोलियोसारखी जबरदस्त मोहीम काही वर्षांपासून आपल्या देशात राबवली जाते. आरोग्य यंत्रणा तीच होती, पण त्या मोहिमेतून प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचवली गेली आणि त्यातून पोलिओमुक्त भारताचे उद्दिष्ट आपण गाठू शकलो. सरकार कोणाचे हा प्रश्न नसतो. सरकार काय करते आहे हाच खरा प्रश्न असतो. आणि सगळे सरकारनेच करायला हवे असेही नसते. गरज असते ती स्वयंप्रेरणेची. त्यातून जी कामे होतात ती कधी सक्तीने होत नाहीत, होऊ शकणार नाहीत. ही स्वयंप्रेरणा, ही आत्मप्रेरणा, हे आत्मतेज जागवणारा आपल्या संस्कृतीतील महत्त्वाचा उत्सव म्हणजे आजचा दीपोत्सव. हा तेजाचा उत्सव आहे. हा प्रकाशाचा उत्सव आहे. हा प्रकाश केवळ रोषणाईपुरता वा आकाशकंदील उजळण्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही. तो आपल्या सर्वांच्या मनामध्ये झिरपावा लागेल. मने उजळावी लागतील, तरच लढण्याचे बळ मिळेल. जनता जनार्दनाचा एक दणका बसला तर अनिष्ट प्रवृत्तींचे नरकासुर कसे एका फटक्यात दूर फेकले जातात हे नुकत्याच झालेल्या निवडणुकांतून आपण पुन्हा एकवार पाहिले. गरज असते सकारात्मक दृष्टिकोनाची. गरज असते अंधार मिटवण्याच्या जिद्दीची. अगदी जग बदलून टाकायचा आव आणायची काही जरूर नसते. सुरूवात छोट्या छोट्या गोष्टींतून केली तरी त्यातून मोठी कामे उभी राहतात याचे प्राचीन काळापासूनचे दाखले आहेत. कृष्ण आणि गोपालांच्या करांगुलीनेच तर गोवर्धन पेलला होता. रोजच्या जगण्याचा संघर्ष, रोजच्या जगण्याची आव्हाने या सर्वांना सामोरे जाणारी जिद्द मनांमध्ये पेरणार्‍या या दीपोत्सवाचे खुल्या मनाने स्वागत करूया आणि येणार्‍या आव्हानांना नव्या चेतनेने, नव्या ऊर्जेने, नव्या हिंमतीने सामोरे जाण्याचा संकल्प करूया! दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

Leave a Reply