शिवोलीतील भीषण अपघातात पिता-पुत्र जागीच ठार

शिवोलीतील भीषण अपघातात पिता-पुत्र जागीच ठार

>> महाराष्ट्रातील वाहनाने पुलावर बेफामपणे ठोकरले मोरजीतील वाहनाला

>> स्थानिकांकडून कारणीभूत वाहनास आग

शिवोली – चोपडे पुलावर काल सकाळी दोन वाहनांदरम्यान झालेल्या भीषण अपघातात मोरजी येथील पिता-पुत्र जागीच ठार झाले. त्यांच्या गाडीतील अन्य चौघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. मोरजीतील फर्नांडिस कुटुंबियांच्या गाडीस ठोकरलेल्या महाराष्ट्रातील वाहनाला स्थानिक ग्रामस्थांनी पुलावरच पेटवून दिल्याने सुमारे अर्धा तास पुलावर आगीमुळे धुराचे लोट पसरले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशामक दलाने घटनास्थळी जाऊन वाहनाची आग विझवली. पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी घटनास्थळी पोलीस फौजफाटा पाठवून तेथे निर्माण झालेले तंग वातावरण बर्‍याच प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणले. पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेल्या महाराष्ट्रातील वाहनामधील पाचजणांना ताब्यात घेतले. मोरजीतील मृतांची नावे जुआंव फर्नांडिस (वय ६२) व ज्युदास फर्नांडिस (वय २५) अशी आहेत. जुआंव यांच्या पत्नीची स्थिती चिंताजनक आहे. पोलिसांनी फॉर्च्युनर गाडीचा चालक शेखर दुबे याला अटक केली आहे.

या अपघाताची तीव्रता एवढी जबरदस्त होती की पुलानजीकच्या परिसरात मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी तेथे धाव घेतली. तेथील दृश्य पाहून संतापलेल्या लोकांनी दोन्ही बाजूंची वाहतूक रोखली.
प्राप्त माहितीनुसार सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. विठ्ठलदासवाडा – मोरजी येथील दुर्दैवी फर्नांडिस कुटुंबीय शिवोली येथील चर्चच्या फेस्तानिमित्त प्रार्थनेला आपल्या वाहनाने जातेवेळी विरोधी दिशेने आलेल्या फॉर्च्युनर चार चाकी वाहनाने फर्नांडिस यांच्या वाहनाला ठोकरले. या आपघातानंतर संशयित घटनास्थळावरून पळून गेले.

घटनास्थळी जमलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी १०८ वाहनाद्वारे जखमींना म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात पाठविले. तेथून त्यांना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात हलविण्यात आले. एका बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात फॉर्च्युनरने फर्नांडिस कुटुंबियांच्या वाहनाला ठोकल्याचे सांगण्यात आले.

अपघात घडल्यानंतर शिवोली – चोपडेतील लोक मोठ्या संख्येने पुलावर जमा झाले. लगेच पोलीसही दाखल झाले. त्यानंतर तेथे बराच वेळ पोलीस व ग्रामस्थ यांच्यात बाचाबाचीचे प्रकार घडले. संशयितांना ताब्यात घेऊन घटनास्थळावर आणण्याची मागणी ग्रामस्थ पोलिसांकडे करीत होते. यावेळी घटनास्थळी दाखल झालेले उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांच्यासह म्हापसा पोलीस निरीक्षक कपिल नायक, हणजूणचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई आदींनी ग्रामस्थांना समजावण्याचे प्रयत्न केले. अखेर सर्व सशयितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन पोलीस अधिकार्‍यांनी दिल्यानंतर जमावाने वाहतूक खुली केली.

प्रार्थना सभेस जाणार्‍या
कुटुंबियांवर काळाचा घाला
शिवोली येथील सेंट एन्थॉनी चर्चच्या फेस्तानिमित्त रविवारच्या प्रार्थना सभेला उपस्थित राहाण्यासाठी आपल्या स्विफ्ट कारमधून सहकुटुंब प्रवास करणार्‍या मोरजीतील जुआंव फर्नांडिस यांच्या गाडीला चोपडे- शिवोली पुलाच्या मध्यावर महाराष्ट्र स्थित फॉर्च्युनर जीपगाडीने विरुद्ध दिशेने येत समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात जुवांव फर्नांडिस (६२) व त्यांचा मुलगा ज्युड फर्नांडिस (२५) जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी मिलाग्रीस फर्नांडिस (४८), एल्टॉन सिमॉईश (२३), सिंन्थिया उर्फ मोनिका (२९), तसेच सानिया लोबो ( २२) यांच्यावर गोवा वैद्यकीय ईस्पितळ बांबोळी तसेच म्हापसाच्या जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. दरम्यान, अपघातातील जखमी मिलाग्रीस फर्नांडिस (४८) यांची स्थिती चिंताजनक असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. फॉर्च्युनर गाडीचा चालक शेखर सत्यनारायण दुबे (भैराववाडी-कल्याण-मुंबई) यास मद्यधुंद अवस्थेत गाडी हाकुन अपघातास कारणीभुत ठरल्याच्या कारणांवरून हणजुण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात (३०४) कलमाखाली सदोष मनुष्यवधाचा आरोप गुदरण्यात येणार असल्याचे निरीक्षक नवलेश देसाई यांनी सांगितले.

हणजुण पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेखर सत्यनारायण दुबे, (कल्याण – मुंबई) तसेच त्याचे साथीदार संजय सिंग, (३१- ठाणे- महाराष्ट्र), केतन जाधव (२७-पनवेल), अब्दुल खान (२७ – कुर्ला- मुंबई) तसेच करिश्मा कनाळकर (२९-मुंबई) हा पाच जणांचा गट शुक्रवारी संध्याकाळी गोव्यातील कळंगुट किनारी भागात उतरले होते. शनिवार दिवसभर कलंगुटात घालविल्यानंतर काल सकाळी आपल्या फॉर्च्युनर जीपगाडीने मोरजीच्या दिशेने भरधांव वेगाने निघाले असतां समोरून येणार्‍या स्विफ्ट गाडीवर ( क्र: जीए-११/१२७६) त्यांनी जोरदार धडक मारली. यावेळी फॉर्च्युनर चालक शेखर दुबे हा दारुच्या नशेत होता असे अपघातस्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले. दरम्यान, या अपघाताऩतर जमावाकडून जीपगाडीला आग लावण्यात आली त्यामुळे गाडी भस्मसात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हणजुण पोलिसांनी अपघातस्थळी धांव घेत परिस्थितीवर नियंत्रण आणले. शेखर दुबे याला रितसर अटक करण्यात आली असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सन २००१ साली कुठल्याही सोपस्काराविना स्थानिक लोकांच्या हेकेखोरणामुळे घाईगडबडीत उद्घाटन करण्यात आलेल्या येथील पुलावर छोटेमोठे मिळून वीस ते बावीस अपघात घडून आलेले आहेत. दीड वर्षापुर्वी दिल्लीस्थित तरुणांच्या टोळक्याने बुलेट मोटरसायकलला समोरून धडक दिल्याने याचभागातील एका पोलिस कॉन्स्टेबल ल त्याच्या महिला साथीदारास कायमचे अपंगत्व आले होते. दरम्यान, आजपासून याभागात रात्री तसेच दिलसां फिरती पोलिस गस्त तैनात करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांनी सांगितले.

फादर्स डे दिवशीच झाला
पिता-पुत्रांचा मृत्यू
शिवोली-चोपडे पुलावर रविवारी पहाटे ६.३० च्या सुमारास स्विफ्ट आणि फॉर्च्युनर कार यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मोरजी विठ्ठलदासवाडा येथील पिता-पुत्र ठार झाले. आईची प्रकृत्ती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. आज सर्वत्र फादर्स डे साजरा करीत असताना पिता-पुत्राचा असा दुर्दैवी मृत्यू व्हावा याबद्दल मोरजी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दोषीवर कडक कारवाईचे ठोस आश्वासन मिळेपर्यंत या पुलावरील वाहतूक सकाळी ६.३० पासून ११.३० पर्यन्त सुमारे पाच तास वाहतूक रोखून धरली होती. युवकाचा मृतदेह सुद्धा त्याच जागी पडून होता त्यालाही लोकांनी हात लावू दिला नाही. अपघातास कारणीभूत ठरलेल्या महाराष्ट्रातील फॉर्च्युनर गाडीला संतप्त नागरिकांनी जाळली दरम्यान फॉर्च्युन चालक शेखर दुबे-ठाणे-कल्याण ३४ याला आयपीएस कलम ३०४, २७९, ३३७ खाली पोलिसांनी अटक केली आहे तसेच त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंद केला आहे त्यांची व त्याच्या बरोबर असलेल्या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली आहे अपघातास कारण ठरलेल्या फॉर्च्युनर गाडीत चालक व मालक असलेल्या शेखर दुबे (५३), ठाणे कल्याण याच्या सोबत गाडीत केतन जाधव (२६), रायगड, अब्दुल खान (२६), कुर्ला मुंबई, संजय सिंग (२१), नवी मुंबई आणि त्यांची मैत्रीण करिष्मा करलकर (२८) खेतवाडी मुंबई या युवतीचा समावेश होता. सर्वजण एका हॉस्पिटलचे कर्मचारी असून ते गोव्यात फिरायला आले होते. आरोपींना घटना स्थळी आणल्याशिवाय मृत युवकाचा रस्त्यावर पडलेला मृतदेह हटवण्यास नागरिकांनी नकार दिला. उशिरापर्यंत मृतदेह तसाच पडून होता. अखेर उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी यांनी घटना स्थळी धाव घेऊन संतप्त नागरिकांची समजूत काढून दोषींना कडक शिक्षा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होतो ती तब्बल पाच तासानंतर म्हणजे ११.३० वा सुरळीत झाली तोपर्यंत प्रवाशांना तुये-आरोबा मार्गे म्हापसा गाठावे लागले

याबाबत हणजूण पोलिसांनी दिलेली माहिती अशी शिवोली चोपडे पुलावर रविवारी पहाटे घडला .फर्नांडीस कुटुंबिय जीए-११ए१२२७या स्विफ्ट गाडीने चोपडेहून शिवोली येथील सेंट अन्थोनी चर्चमध्ये प्रार्थनेला जात होते. त्याच वेळी मुंबई येथील पाच जण एम एच ०४ एफए-५०५७ या फॉर्च्युन गाडीतून आश्वे मांद्रे येथे जात होते एका बसला ओवर टेक करताना त्यांनी स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. त्यात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आणि स्विफ्टकार चालवत असलेला जुडास फर्नांडीस हा युवक जागीच ठार झाला तर त्याचे वडिल जुवाव फर्नांडीस ६२ यांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये नेताना मृत्यू आला. तर त्याची आई मिलाग्रीन फर्नांडीस ५३ ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोली येथे उपचार चालू आहे. तसेच अपघातात जखमी झालेली मृत युवकाची बहिण सिंथिया फर्नांडीस (२९), सोनिया लोबो (२२) व मित्र आल्टोन सिमोईश (२४) यांना म्हापसा येथील आझिलो हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे.

चंदन चौधरी यांची यशस्वी शिष्टाई
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर अखेर उत्तर गोवा पोलीस महानिरीक्षक आयपीएस चंदन चौधरी अपघात स्थळी दाखल झाल्या. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना तसेच नागरिकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या जीत आरोलकर, सचिन परब, दीपक कलंगुटकर आदींनी मध्यस्थी करून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर चंदन चौधरी यांची शिष्टाई सफल झाली.

चंदन चौधरी यांनी नातेवाईकांची मागणी मान्य केली. अपघातास कारण ठरलेल्यांची नावे लिखित स्वरुपात त्यांना दिली. तसेच चारपाच जणांनी पोलीस स्टेशन वर यावे व आरोपींची त्याठिकाणी ओळख परेड घडवून त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्याचे मान्य केले तेव्हा केव्हा पोलिसाशी आपल्या न्याय मागणी साठी हुज्जत घालणारे शांत झाले. जीत आरोलकर व मृतांचे नातेवाईक त्यानंतर चंदन चोधरी यांच्यासोबत पोलीस स्थानकात गेले त्याठिकाणी आवश्यक सोपस्कार पूर्ण केल्यानंतर चंदन चौधरी यांनी कडक कारवाईचा शब्द दिल्याचे जीत आरोलकर यांनी सांगितले. आरोपीवर अजामीनपात्र कलम लावल्याचे सांगून उद्या पंचनाम्याची कागद पत्रे मिळणार असल्याचे सांगितले.

दरम्यान या भागाचे आमदार दयानंद सोपटे यांनी सकाळी अपघात स्थळी धाव घेऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केल्याचे सांगितले. त्यांना सरकारकडून सर्वप्रकारची मदत मिळवून दिली जाईल असेही त्यांनी सांगितले. आपण अपघाताची माहिती घेल्यानंतर पोलिसांना आवश्यक आदेश दिल्याचेही ते म्हणाले. तसेच दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले.
त्यानंतर उपस्थित पोलिसांनी अग्नीशामक दलाच्या जवानांच्या सहाय्याने व पोलिसांच्या सहकार्याने मृतदेह तसेच अपघात ग्रस्त वाहने हलवली व वाहतूक सुरळीत केली तोपर्यंत दुपारचे १२ वा.होते .

गाडीत एका राष्ट्रीय पक्षाचा बावटा लोकांनी पाहिल्यानंतर याबाबत चर्चा चालू होती. तसेच गाडीत दारूच्या बाटल्या आढळल्याने चालकासहित सर्वजण दारूच्या नशेत असल्याची जोरदार चर्चा नागरिकात चालू होती. चालकाने दारूच्या नशेतच दोघांचा नाहक बळी घेतला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असेही लोकांचे म्हणणे आहे. वैद्यकीय रिपोर्ट मिळाल्यानंतरच या विषयीची माहिती उघड होणार आहे.
अपघातात मृत झालेल्या विठ्ठलदास वाडा मोरजी येथील फर्नांडीस कुटुंबातील पितापुत्रावर अंत्यसंस्कार निश्चित कधी होतील याबाबत माहिती मिळू शकली नाही. त्यांच्या कुटुंबातील आई मिलाग्रीन फर्नांडीस या गोमेकोत उपचार घेत असून त्यांचीही प्रकृति अत्यंत चिंताजनक आहे. तसेच अन्य नातवाईकही उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले.

संतप्त नागरिकांनी गाडी पेटवून दिली
पहाटे साडे सहा वाजता अपघात घडल्यानंतर अपघाताची बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पसरली. मोठ्या संख्येने नागरिक अपघातस्थळी जमा झाले. मात्र पोलिसांना घटना स्थळी पोचण्यास थोडा उशीर झाला. तोपर्यंत संतप्त झालेल्या नागरिकांनी फॉर्च्युन गाडीला आग लावली. अग्नी शामक दलाची गाडी घटना स्थळी पोचेपर्यंत गाडी जाळून खाक झाली. त्यानंतर हणजूण पोलीस निरीक्षक नवलेश देसाई, म्हापसा पोलीस निरीक्षक कपिल नाईक, पेडणे पोलीस निरीक्षक हरीश मडकईकर फौजफाट्यासह अपघातस्थळी दाखल झाले त्यांनी अनेक प्रकारे मृतांचे नातेवाईक व संतप्त नागरिक यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र सर्वच जण आरोपींना घटना स्थळी आणण्यासाठी अडून बसले. जोपर्यंत अपघातास कारण ठरलेल्यांना घटना स्थळी आणले जात नाही तो पर्यंत मृतदेह हलवू दिला जाणार नाही या मागणीवर अडून राहिले. तोपर्यंत पुलावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. अनेकांनी मृतांच्या नातेवाईकांना तसेच संतप्त नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते. अनेकदा पोलीस व त्यांच्यात शाब्दिक चकमकीही उडाल्या. पोलिसांची हुर्यो उडवणे चालूच होते. दरम्यान उत्तर गोवा पोलीस उपधीक्षक गुरुदास गावडे घटनास्थळी आणखी पोलीस फाटा घेऊन दाखल झाले. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु जोपर्यंत आरोपींना शिक्षेचे वचन मिळेपर्यंत मृतदेह हटवण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तसेच हे सर्व लेखी द्यावे, अशी मागणी लावून धरली. यावेळी सुद्धा पोलीस आणि नागरिक यांच्यात शाब्दिक चकमकी उडाल्या. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली होती.