शिरोलीत सापडले चार नवे कोरोना रुग्ण

>> सत्तरीत कोरोनाचे रुग्ण झाले अकरा

सत्तरीत कोरोनाचे काल चार रुग्ण सापडले असून तेथील कोरोनाचे एकूण अकरा रुग्ण झाले आहेत. यापूर्वी मोर्ले-सत्तरीत चार, शिरोली-सत्तरीत दोन व गुळेलीत एक रुग्ण सापडले होते. काल मोर्ले येथे त्यात चार रुग्णांची भर पडली. शिरोलीत कोरोनाचा प्रसार झाला आहे. मोर्ले सत्तरीत कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर ती व्यक्ती शिरोलीत गेली असता तिथे कोरोनाचा प्रसार झाला. शिरोलीतील सोमवारी केलेल्या तपासणीचे अहवाल काल निगेटीव्ह आले. तर काल ५५ जणांची तपासणी करण्यात आली असून त्याचे अहवाल उद्या मिळतील.

सत्तरीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने वातावरण भयभीत झाले आहे. काल वाळपई शहरात बाजार असून देखील शुकशुकाट होता. केरी बाजार लॉकडाऊन करण्याचा काल दुसरा दिवस होता. केरीत कडकडीत लॉकडाऊन सुरू आहे. मोर्ले सत्तरीत ज्या वाड्यावर कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत त्या वाड्यावर कडकडीत लॉकडाऊन सुरू आहे. तसेच शिरोलीतसुद्धा कडकडीत लॉकडाऊन सुरू आहे. गुळेलीत काल सर्व व्यवहार बंद होते. वाळपई शहरात सुद्धा दुकाने खुली करण्यास व्यापारी भीत असून अनेकांनी आपले व्यवसाय अजूनही सुरू केलेले नाही.

कोरोनाचा प्रसार हळुहळू सर्व सत्तरीत होत असून तो टाळण्यासाठी सर्व सत्तरी लॉकडाऊन करा अशी मागणी नागरिक करीत आहेत. सत्तरीतील अनेकजण आरोग्य खात्यात कामाला असून त्यांच्या मार्फत सत्तरीत कोरोनाचा प्रसार होत आहे. ते सर्व कर्मचारी एका गाडीत बसून कामाला जातात. त्यामुळे काही दिवसांसाठी का होईना सत्तरी लॉकडाऊन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.