शिक्षण ः गुरुकुल ते ऑनलाईन

  •  अनुराधा गानू
    (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी)

शाळेचे दिवस कमी होतील. पण त्यासाठी विषयांचा फापट पसारा कमी करता येईल. नको असलेले धडे कमी करता येतील. अभ्यासक्रम कमी करता येईल. या संकटाचा फायदा घेऊन शिक्षण पद्धतीच बदलण्याचा विचार, जो अनेक वर्षांपासून मागे पडलाय, तो पुन्हा करता आला तर…!!

काल-परवा मोबाईलवर एक व्हिडिओ बघितला. एक लहान मुलगा शाळेची बॅग पाठीवर आणि म्हणतोय, ‘नो मोबाईल इन स्कूल बट् नाऊ स्कूल इज इन मोबाईल!’ खरंच, मजाच वाटली. मुलांना शाळेत मोबाईल न्यायला परवानगी नसते. शाळेतच काय पण घरीसुद्धा जेव्हा पाच-पाच तास मुलं मोबाईल घेऊन बसली की पालकांचा आरडा-ओरडा सुरू होतो- ‘अरे, इतका वेळ बघू नको, डोळे खराब होतील, मान दुखेल.’ पण आता ऑनलाईन शिक्षण म्हटल्यामुळे तेही मुलांना सांगायची सोय उरणार नाही. आता जूनपासून म्हणे शाळा-कॉलेज ऑनलाईन सुरू होणार. होणार काय… १०वी, १२वीचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेत सुद्धा! म्हणजे शिक्षकांचे ‘टीच फ्रॉम होम्’ आणि विद्यार्थ्यांचे ‘स्टडी फ्रॉम होम्’. पुढे मग शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही अशीच सवय होऊन जाईल आणि शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था बंद पडायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तसं झालं तर प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या शिक्षकाची वेगळी वेगळी फी भरावी लागेल. शिवाय प्रॅक्टिकल्सचं काय?
पालकांची आर्थिक स्थिती कशीही असो, त्यांना परवडत असो वा नसो, मुलांना शिकवायचं असेल तर मोबाईल, लॅपटॉपवर खर्च तर करावाच लागेल. नाहीतर मुलांना शिक्षणापासून वंचित रहावं लागेल. म्हणजे परत शिक्षणाचा अधिकार फक्त पैसेवाल्यांच्या मुलांना आहे असं म्हणावं लागेल. अर्थात हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. असंही शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर भक्कम देणगी द्यावी लागते. म्हणजे परत शिक्षण घ्यायचं असेल तर फक्त मेरीट असून उपयोग नाही तर श्रीमंत बापाचं मूल असणंही गरजेचं आहे आणि इतका सर्व खर्च करूनही मुलांना सर्वांगीण शिक्षण मिळणार का हा प्रश्‍नच आहे.

बघा हं! शिक्षण पद्धतीची सुरुवात झाली ती ‘गुरुकुला’पासून. अगदी ऋषीमुनींच्या काळापासून गुरुकुलपद्धती सुरू आहे. ठरावीक वय झालं की मुलांना गुरुगृही म्हणजेच गुरुकुलात पाठवलं जायचं. तिथे मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळत असे. अगदी घरकामापासून, नीतिमत्तेपासून, कसं बोलावं, कसं वागावं इथपासून अभ्यास, धनुर्विद्येच्या शिक्षणाचा त्यात समावेश असायचा. त्यावेळी विशिष्ट असा नेमलेला अभ्यासक्रम नव्हता. गुरुपत्नी ही त्या मुलांची गुरुमाता. तीच त्यांचे संगोपन करी. शिक्षण फक्त परीक्षा किंवा टक्केवारीवर अवलंबून नसायचं, तर मुलांना एक समर्थ माणूस घडवणारं, जे शिक्षण त्याला आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर उपयोगी पडेल, जे शिक्षण मुलांना कोणत्याही संकट प्रसंगातून, समस्येतून सोडवणारं होतं. देणगीची वगैरे भानगड नाही. फी म्हणाल तर ज्याला जशी शक्य असेल तेवढी गुरुदक्षिणा. मुलांना प्रत्येक विषयाचं पूर्णपणे आकलन झालं पाहिजे, हा गुरुंचा कटाक्ष. गुरुकुल म्हणजे एक प्रकारची शैक्षणिक संस्थाच होती. किंबहुना त्याला शैक्षणिक संस्था न म्हणता ज्ञानपीठ म्हटलं तर ते जास्त योग्य ठरेल.
गुरुकुलांनंतर शाळा आल्या. गुरुकुलाच्या उलट. जिथे सगळ्या विषयांना शिक्षक, मुले तेथे जाऊ लागली. नेमून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण होणं गरजेचं झालं. विद्यार्थ्यांना विषय पूर्णपणे समजलाय की नाही, याच्याशी काही देणं-घेणं नाही. पुस्तकात असेल तेवढंच मुलांनी शिकायचं. त्याच्याबाहेर नाही. पुस्तकात दिलेली उत्तरं तशीच्या तशी पेपरात उतरवायची. म्हणजे टक्केवारी वाढवायची. पण मग त्या मुलांच्या विचारशक्तीचं काय? का त्यांनी ती वापरायचीच नाही? असे विद्यार्थी ज्ञानी म्हणायचे का? असे विद्यार्थी कदाचित पैसा भरपूर मिळवतीलही. पण ही त्यांची प्रगती म्हणायची का?
मग एखाद्याला आयुष्यात अशी समस्या आली की जी त्याच्या अभ्यासक्रमात नव्हती, मग तो विद्यार्थी कसा तरून जाणार? नातवाच्या शिक्षणाच्या निमित्ताने एक-दोन शिक्षकांचे विचार ऐकायला मिळाले. एक शिक्षक म्हणाले, ‘‘तुमच्या मुलाला पुस्तकात आहेत, तशीच उत्तरे त्याच पद्धतीने पेपरात लिहायला शिकवा. एखाद्या प्रश्‍नावर स्वतः विचार करून उत्तर लिहू नको म्हणावं. कारण पुस्तकातल्या उत्तराप्रमाणेच आम्ही पेपर तपासतो. इतर वेगळं वाचत बसत नाही’’.

आणखी एक शिक्षक भेटले त्यांना म्हटलं, ‘‘आमचा मुलगा गणितात थोडा कच्चा आहे.’’ तर ते म्हणाले, ‘‘अहो, प्रत्येक वर्गात ४-५ मुलंतरी कोणत्या ना कोणत्या विषयात कच्ची असतातच’’. पण माझा प्रश्न असा होता की मग अशा मुलांसाठी शिक्षकांची जबाबदारी काय? त्या मुलांना असंच सोडून द्यायचं? यावर उत्तर काही नाही. त्यामुळे मुलं समर्थ होत नाहीत. गोंधळलेलीच राहतात. गुरुकुलात असं होत नव्हतं.

आणि आता तर या नव्या संकटामुळे गुरुकुल गेलं, शाळा गेली आणि शिक्षण मोबाईल, लॅपटॉपमध्ये बंद झालं. ऑनलाईन अभ्यास. या पद्धतीमुळे शाळा-कॉलेजसारखं अभ्यासाचं वातावरण तयार होईल का हा प्रश्‍न आहे. आणि तसं नसेल तर मुलांचं अभ्यासात लक्ष लागेल का? असा प्रश्‍न एका विद्यार्थ्यानेच विचारलाय. आता ऑनलाईन शिक्षण का?… तर नेमलेला अभ्यासक्रम पूर्ण व्हायला पाहिजे म्हणून. काही हुशार मुलं तसं शिकतीलही. पण सर्वसामान्य मुलांचं काय? गुरुकुलात गुरुंबद्दल जी निष्ठा, जो आदर, जो विश्‍वास होता, तो गुरुचा शिक्षक झाल्यावर कमी कमी होत चाललाय. तो या ऑनलाईन शिक्षणामुळे आणखी कमी होईल. अर्थात आजच्या विज्ञान युगात, मोबाईल, कम्प्युटर हे सगळं वापरणं शिकलंच पाहिजे. ही सगळी माणसाच्या विज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी महत्त्वाची साधने आहेत. पण त्यासाठी हा मार्ग नव्हे!

त्यापेक्षा शाळा उशीरा सुरू कराव्यात. शाळेचे दिवस कमी होतील. पण त्यासाठी विषयांचा फापट पसारा कमी करता येईल. नको असलेले धडे कमी करता येतील. अभ्यासक्रम कमी करता येईल. मी काही शिक्षणतज्ज्ञ नव्हे. पण एक सुचवावेसे वाटते की या संकटाचा फायदा घेऊन शिक्षण पद्धतीच बदलण्याचा विचार, जो अनेक वर्षांपासून मागे पडलाय, तो पुन्हा करता आला तर…!!