शिक्षकांना आजपासून शाळेत हजर राहण्याचे आदेश

राज्यात सरकारी आणि अनुदानित विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना बुधवार २४ जून २०२० पासून शाळेत हजर राहण्याची सूचना करणारे परिपत्रक शिक्षण खात्याच्या संचालिका वंदना राव यांनी काल जारी केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सरकारी व अनुदानित विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना विद्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती करण्याची घोषणा केली होता. त्यानंतर शिक्षण संचालिका राव यांनी यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे.

कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विद्यालयाचे वर्ग सुरू करण्यात आलेले नाही. राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून विद्यालयाचे वर्ग सुरू करण्याबाबत येत्या १५ जुलैनंतर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाईन पद्धतीने अभ्यासात गुंतवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. राज्यातील बहुतांश खासगी विद्यालयांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्यास प्रारंभ केलेला आहे. परंतु, मोबाईल कनेक्टिव्हीटी योग्य नसल्याने या पद्धतीच्या शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत. आता, राज्य सरकारकडून शिक्षकांना विद्यालयात उपस्थित राहण्याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
विद्यालयाचे वर्ग सुरू होईपर्यंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करून गुंतवून ठेवावे. ज्या ठिकाणी ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्याची व्यवस्था नाही. त्याठिकाणी शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी, असे शिक्षण संचालिका राव यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

विद्यालयाचे नियमित वर्ग सुरू होईपर्यंत शिक्षकांनी शिकवणीसाठी आवश्यक वर्कशीट, लेक्चरची तयारी करावी. विद्यालयाचे नियमित वर्ग सुरू झाल्यानंतर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील संपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, असेही परिपत्रकात म्हटले आहे.

कन्टेनमेंट झोनमधील विद्यालयांना सूट
राज्यातील कन्टेनमेंट झोनमधील विद्यालये, कन्टेनमेंट झोनमध्ये राहणारे शिक्षक कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने ताब्यात घेतलेल्या विद्यालयांना हे परिपत्रक लागू होणार नाही. तसेच, दिव्यांग मुलांचे पालक असलेले कर्मचारी, गरोदर कर्मचार्‍यांना घरातून काम करण्याची मोकळीक देण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांनी गरजेच्या वेळी मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उपलब्ध राहण्याची सूचना परिपत्रकातून करण्यात आली आहे.