शिक्षकदिन

– सौ. पौर्णिमा केरकर

माझ्या या मुलांशी अंतरीच्या जिव्हाळ्याने मी जोडले गेले आहे. मला पक्के माहीत आहे, माझे विद्यार्थी, माझी मुलं यांना आयुष्यातून वजा करून मी पुढे जाऊच शकणार नाही. शिक्षकदिन, गुरुपौर्णिमा तर वर्षातून एकदाच येते… इथे माझा तर प्रत्येक दिवसच ‘शिक्षकदिन’ असतो.

१९९३ साल. आताच कोठे मी शिक्षकी पेशात रुजू झाले होते. नव्यानेच सुरू झालेले आमचे उच्च माध्यमिक विद्यालय. निसर्गरम्य परिसरातील एका गोडाऊनमध्ये सुरू झालेले आमचे वर्ग. अवतीभोवती गुलमोहोराची दाटी. उन्हाळ्यात जेवढे हे गुलमोहर आकर्षक, विलोभनीय वाटायचे, तेवढेच पावसाळ्यातील त्याचे पानाफुलांनी गळून पडून रस्त्यावर बुळबुळीतपणा निर्माण करणारे क्षण कंटाळवाणे वाटायचे. घाईघाईत चालताना कधी पाय घसरून सपशेल आडवा होण्याचा प्रसंग येईल हे सांगत येत नसे. असे असले तरी नव्या वास्तूत स्थलांतर होईपर्यंत सुदैवाने जिकिरीचा प्रसंग कधी ओढवला नाही हे विशेष.
पहिली दुसरीची बॅच. समोरील मुलं दोन वर्षांची अनुभवी. त्यांना शिकविणारे माझ्यासारखे शिक्षक समवयीन अन् अनअनुभवी. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणे हे महाकठीण काम होते. त्यातच खरी कसोटी होती. ‘विद्यार्थ्यांच्या हृदयात शिक्षकांसाठी खास जागा असावी, ती मारून-मुटकून नाही तर सहजपणाने उरावी’ असे दादा नेहमी सांगायचा. शिक्षकीपेशाचे व्रत स्वीकारल्यानंतर दादाने अशी जागा विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात निर्माण केलेली मी अनुभवली होती. ‘पांडुरंग मास्तरांसारखे शिक्षक माझ्या शालेय जीवनात मला लाभले म्हणून माझी उच्चशिक्षणाची वाट मोकळी झाली,’ असे जेव्हा तळकरसरांनी माझ्या विद्यार्थ्यांंसमोर मला सांगितले तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून आला होता. भाईची विद्यार्थिप्रियतासुद्धा मी माझ्या कॉलेजजीवनात अनुभवत वाढत होते. काहीही झाले तरी शिक्षकच व्हायचे ही खूणगाठ मी शालेय जीवनापासून मनाशी पक्कीच बांधली होती.
त्या वयात वाटत होते की अर्धा दिवस शाळा, शिवाय भरपूर सुट्‌ट्या… खूप जणांशी ओळखी आणि विद्यार्थ्यांमध्येच राहून राहून आपली शाळा-कॉलेज मागे सुटून गेलेय, आपण आता वयाने वाढलो आहोत हे कधी जाणवणारसुद्धा नाही. पण दादाने जेव्हा सांगितले की, ‘नुसतेच वर्गात शिकवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर त्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांची ‘प्रेरणा’ होणे गरजेचे आहे. शिक्षकरूपी प्रेरणा विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात कायम तेवती राहायला हवी.’ हे सगळे आठवताना मी माझ्या विद्यार्थ्यांची प्रेरणा बनले की नाही हे मला माहीत नाही. माझे विद्यार्थी मात्र माझी विवेकशील प्रेरणा आहेत. अशी नावे खूप आहेत, पण त्यांतील काही ठळकपणाने सामोरी येतात.
अडीच दशकांचा काळ उलटला खरा, पण वर्गातली चंद्रलेखा, ममता, स्मिता, वर्षा, सुभदा, प्रियवंदा, स्नेहा, ऍनी, संतोषी, उज्ज्वला, निकिता, समीर, श्याम, यशवंत, विजय, विवेक, कल्पना, रश्मिता, संपदा, सुखदा, स्नेहल, भक्ती, संगीता, विठ्ठल, चंद्रकांत, रघुनाथ, दीक्षा, हर्षदा, सुबोध, प्रदीप, गणेश, देवेश, शिल्पा, कुंदा, श्रद्धा, मंगेश अशी कितीतरी नावे अगदी ती बसत असलेल्या बाकड्यापासून ती त्यांचे लिखाण, अक्षर, वर्तवणुकीपर्यंत आठवतात. विद्यार्थ्यांना अनुभवणं, त्यांच्याशी मनाकाळजातून संवाद साधणं, त्यांचं भावविश्‍व समजावून घेणं ही एक आनंदपर्वणी शिक्षकाला आपले वय विसरायला लावते. खूप कोवळा हळवेपणा भरून राहिलेल्या त्या किशोरवयीन मुलांत मी पाहत आलेले आहे. मला फुले खूप आवडतात याची आपसुकच जाणीव खूप विद्यार्थ्यांना झाली होती. दिवसाची सुरुवात तर ममताने दिलेल्या कवठीचाफ्यानेच व्हायची. तीही कवठीचाफ्यासारखीच टवटवीत, सदाप्रसन्न, बोलक्या डोळ्यांची, गोड आवाजाची… बोलण्यात कोणालाही हार न जाणारी आणि मनातले गुज एखाद्या सखीला सांगावे, तसेच मला सांगणारी. गुलमोहरावर भरभरून प्रेम करणारी. आज दोन मुलांची आई झालीय, तरी नातं ‘सखी’चं टवटवीत कवठीचाफा बनूनच बहरत आहे.
वर्षाला तर वर्गात मी विषय शिकविला नाही. तिने हिंदी विषय घेतलेला. समोर आली ती पंढरीने लिहिलेल्या निबंधाच्या माध्यमातून. वर्गात निबंध लिहिण्यासाठी विषय दिला होता. पंढरीने तर खूप सुंदर निबंध लिहिला होता. तिचं नाव वर्गात जाहीर केल्यावर प्रामाणिकपणाने तिने मला येऊन सांगितलं होतं की, ‘टिचर, निबंध मला वर्षाने लिहून दिला.’ मिस्कील डोळ्यांची वर्षा त्यावेळी भेटली ती अजूनही भेटते आहे. तिच्याशी असलेले बंध दिठीमिठीचे… कवठीचाफा जसा ममताचा तसाच मोगरा वर्षाचा. गोड गळ्याची वर्षा मोगर्‍याच्या, जाईच्या लडी घेऊन यायची. ‘मोगरा फुलला…’ हा जनाईचा अभंग तिच्या गळ्यातून ऐकण्याचे सुखद क्षण तर माझ्या जीवनजाणिवांचा अविभाज्य घटकच बनून राहिले आहेत. तिचं नाव ‘वर्षा’, परंतु माझ्यासाठी मात्र ती आजही टपोर्‍या कळ्यांची ‘मोगरा’ बनूनच राहिली आहे.
‘माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण’ हा विषय वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मी दिला होता. तुमच्या जीवनप्रवासातील कडूगोड चिरस्मरणीय आठवणी तुम्ही लिहा असं मी मुलांना सांगितलं होतं. आठवणी तर सगळ्यानीच लिहून आणल्या होत्या. त्यांतील एक निबंध मात्र चटका लावणारा ठरला. चतुर्थीच्या धामधुमीचे दिवस… एक कष्टकरी कुटुंब समूहाने वावरणारे… घरात गाईवासरांचा राबता. गवताच्या गंजी, गोठा, दूधदुभते, शेतीभाती याचे वैभव होतेच. पण उत्सवाच्या धुमधडाक्यात एका क्षणी गवताच्या गंजी पेट घेतात. त्याची झळ जनावरांना लागते. सगळीच रडारड… आकांत… नेमका हाच आकांत उत्कट आर्ततेने त्या निबंधातून व्यक्त झाला होता. निबंध वाचताना मी त्यातील प्रत्येक शब्दाशी समरस झाले होते. वाचून संपल्यावर मी हळूच वर बघितले तर तिचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. ‘टिचर, खरी घटना’ असे म्हणून ती परत रडली. ती चंद्रलेखा होती. तिने वाचन केले तर ती खूप चांगलं लिहू शकते याची जाणीव मला झाली. तिला तसे सांगितले. तिने ते मनावर घेतले. चंद्रलेखाची ‘बबिता’ झाली. अजूनही लिहिते. अडलं-नडलं तर विचारते. तिच्या बरोबरीने जोडली गेली ती कुंदा आणि शिल्पासुद्धा.
‘टिचर, सर खय गेले गे?’ अकरावी-बारावीच्या दोन वर्षांत दरदिवशी शुभदा न चुकता मला हा प्रश्‍न विचारायची. तिच्यासाठी ‘तुझे सर मला सांगून कोठेच जात नाहीत’ हे उत्तर हमखास ठरलेलेच असायचे. मी आणि राजेंद्र एकाच उच्च माध्यमिक विद्यालयात शिकवीत असल्याने आम्हा दोघांचे विद्यार्थी समानच होते. वर्षा, ममता, चंद्रलेखा मला जेवढ्या जवळच्या, तेवढीच शुभदा आपल्या सरांच्या संपर्कात असलेली. गावातूनच, मुख्य म्हणजे एकांतात वसलेल्या घरातून आलेली ही मुलगी इतर जगाविषयी तशी अनभिज्ञच होती. नाही म्हटले तरी दूरदर्शनचे खुणावणारे जग ओळखीचे होतेच. धनगर जमातीच्या प्रकल्पाच्या निमित्ताने ती आमच्या कुुटुंबाशी जोडली गेली. आमच्या कुटुंबाबरोबरीनेच आम्हा उभयतांच्या जीवनातील दर एक क्षणाची ती साक्षीदार ठरली. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या प्रवाहातील तिचा प्रवास आज सुरू आहे.
माझ्या अवतीभोवती सतत माझे विद्यार्थी असतात. वर्गात आणि वर्गाबाहेरही. घरात रांधताना, वाढताना, लिहिताना, जेवताना. काहीजण खास अभ्यास करण्यासाठी, काहीजणांना घराकडून कॉलेज येऊन-जाऊन करणे शक्य नाही म्हणून, तर थोड्यांना घरच्या बिकट परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण घेणे शक्य होत नाही म्हणून. आमचं घर त्यांना जवळचं वाटतं. माझ्या विद्यार्थ्यांच्या सहवासात मला सतत वावरायला मिळते याचाच मोठा आनंद वाटतो. ‘आता पूर्वीसारखे विद्यार्थी राहिलेले नाहीत’ अशी वाक्ये बर्‍याच वेळा ऐकू येतात. अशा वेळी मला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे शब्द-विचार आठवतात. ते म्हणतात, ‘आपल्याला असे वाटते की मुलांनी पाहिलेले नाही; पण त्यांना बघायला डोळे आहेत व ऐकायला कान पण आहेत. आपले शिक्षक कुठे जातात, काय करतात इकडे त्यांची बारीक नजर असते. जर विद्यार्थी शिक्षकाला मान देत नसतील, तर तो विद्यार्थ्यांचा दोष नसून, शिक्षकांचा दोष आहे. कारण मान देण्याइतकी शिक्षकांची मान उंच राहत नाही.’
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या या युगात मी अनुभवते, विद्यार्थ्यांची वर्गात हजेरी घेताना पेन मागितले की पटकून चार-पाच मुलांची पेनं समोर येतात. त्यांपैकी एकट्याचे पेन घेतले की त्या चेहर्‍यावरचा निरागस आनंद मला ओंजळीत भरून ठेवावासा वाटतो. नोकरीनिमित्ताने बातमी घेणारे देवेश, श्याम यांना मी विसरूच शकत नाही. स्वतः शिक्षक झालेले विठ्ठल, चंद्रकांत, संगीता यांना आजही त्यांच्या चुकांबद्दल त्यांना खडसावले की त्यांच्या चेहर्‍यावरील तोच आदरयुक्त निरागस भाव मी माझ्या या मुलांशी अंतरीच्या जिव्हाळ्याने जोडले गेले आहे याची जाणीव करून देतो. मला पक्के माहीत आहे, माझे विद्यार्थी, माझी मुलं यांना आयुष्यातून वजा करून मी पुढे जाऊच शकणार नाही. शिक्षकदिन, गुरुपौर्णिमा तर वर्षातून एकदाच येते… इथे माझा तर प्रत्येक दिवसच ‘शिक्षकदिन’ असतो.