ब्रेकिंग न्यूज़
शिकविले ज्यांनी…

शिकविले ज्यांनी…

छत्तीस वर्षांपूर्वीचा काळ… १९८२ सालातील मे महिन्याचे दिवस… पुणे विद्यापीठाच्या क्रमांक पाचच्या वसतिगृहात दीड महिने पीएच.डी.च्या अभ्यासासाठी मी जाऊन राहिलो… तेथील अल्प वास्तव्य आनंदात गेले. ऐन उन्हाळ्याचे दिवस असून दुपार जर सोडली तर सकाळची आणि संध्याकाळची वेळ आल्हाददायी वाटायची. याचे कारण तेथील रमणीय परिसर… बोगनवेलाच्या विविध छटा असलेला भव्य आसमंत… पिवळ्या आणि लालबुंद फुलांनी डंवरलेली गुलमोहराची झाडे. अधूनमधून आढळणारे उंच गर्द हिरवेगार वृक्ष… अन् तीक्ष्ण काट्यांची पाऊलवाटांवर, तटबंदीकडे वाढलेली विशिष्ट आकाराची झुडपे… त्यांची लागवड म्हणे आफ्रिकेच्या जंगलातून बियाणे आणून केलेली… लक्ष वेधून घेणारी जुन्या धाटणीची अतिभव्य आकाराची मेन बिल्डिंग. डाव्या हाताला वळल्यावर ‘जयकर ग्रंथालय’… जवळच असलेला पदार्थविज्ञानशास्त्र विभाग… त्याचाच अविभाज्य भाग बनून राहिलेली अद्ययावत साधनसामग्रीची ‘सीडेक’… बाह्यांगात आणि अंतरंगात परंपरा अन् नवता यांचा अपूर्व संगम… पुण्यनगरीच्या पुण्यसंचयाचा हा केंद्रबिंदू… ‘जयकर ग्रंथालया’ने माझ्या मनाला तेव्हापासून वेध लावलेला… त्यानंतरही मी तेथे अनेकदा गेलो. तळमजल्याच्या अष्टकोनी आकाराच्या काऊंटरवर उभे राहून वर नजर फेकली आणि आजूबाजूला न्याहाळले तर तेथील ग्रंथविश्‍व नजरेत भरते. कमी उजेड असलेला, तुलनेने शांत भासणारा स्टॅक रूम… विविध ज्ञानशाखांची तेथील ग्रंथसंपदा… अभ्यासदालनात भरपूर खिडक्या अन् प्रकाश असलेला अभ्यासकक्ष… तिथे वावरणारे चैतन्य.
मला सर्वात आवडलेला तेथील नियतकालिक विभाग. मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्यावरील तेथील नियतकालिके… विज्ञान व तंत्रज्ञानावरील अद्ययावत नियतकालिके. फोल्डर उघडल्यावर त्या-त्या विषयांवरील काही जुने अंक आढळणारे…
तिथे मी बसलेलो असताना सकाळी दहाच्या सुमारास एका व्यक्तीला पाहिले. चेहरा पूर्वी कधीतरी पाहिल्यासारखा… मुखावर वेगळ्या प्रकारचे तेज विलसणारे… गौरवर्ण… पांढरेशुभ्र केस… शुभ्र होऊ पाहणारी दाढी, साधा वेश, पांढरा पायजमा, पिंगट रंगाचा झब्बा, काळी नक्षीदार शबनम… त्यातून पुस्तकांबरोबर, नियतकालिकांबरोबर बाहेर काढलेल्या लोकविलक्षण चिजा… डोळे विस्फारून त्या व्यक्तीकडे आणि त्या चिजांकडे मला पुनः पुन्हा पाहावेसे वाटले… या माणसाशी जवळीक साधता येईल असे अंतर्मन म्हणत होते. पण वातावरण बोलायला भाग पाडणारे नव्हते. ग्रंथालयातील निगडित माणसांनी ओठांवर बोट ठेवण्याची पाळी आणू देऊ नये याचे थोडेफार भान होते… पण ही व्यक्ती थोड्या वेळात ग्रंथालयाच्या संशोधन कक्षात गेली… तर क्षण निसटू नये म्हणून मनाची अस्वस्थता वाढत चालली होती… मनाचा हिय्या करून मी विचारणा केलीच… तीही हळू आवाजात… ‘‘आपण?’’ डोळे रोखून हसतमुख बोलणार्‍या त्यांच्या शैलीत ते म्हणाले, ‘‘मी अनिल अवचट.’’ याउपर स्व-परिचय नाही. ‘‘तुम्ही कोठून आलात?’’ त्यांचा अल्पाक्षरी प्रश्‍न. अंतःकरणाची ओळख अंतःकरणाला पटल्यासारखी वाटली. त्यांच्या जीवनाच्या विविध क्षेत्रांतील ती मोठी व्यक्ती होती. पण त्याचा आव कुठेही नव्हता… अहंकाराचा लवलेश नव्हता… शबनममधील ‘ड्रॉईंग पॅड’ त्यांनी माझ्यासमोर सरकविले. व्हॅन गॉगच्या धर्तीवर गुळगुळीत कागदावर हलक्या हाताने झाडांचे विविध आकार साकार करीत होते ते त्या काळात. व्हॅन गॉगच्या चित्रांत टिंबात्मकता असायची… डॉ. अनिल अवचटांच्या चित्रांत रेषात्मकता अधिक होती… गुंतवळ होती… परिसरातील वास्तव सृष्टीचे कलात्मकतेत रूपांतर कसे करावे याचे आत्मभान या माणसाकडे होते… डोळ्यांसमोरून त्यांनी काढलेली चित्रे सरकून गेली… मोरांची चित्रे… मयूराकृतींतून साधलेली चित्रसंगती… हत्ती…. हत्तीच हत्ती…. हत्तींची रांग… त्यानंतर त्यांनी रेखाटलेल्या म्हशी… झाडे… डोंगर… सख्य मात्र निरंतर निसर्गाशी… लेखनाची नाळ निसर्गाशी अन् त्याच्या समतोलाशी जुळलेली… माणसांच्या अंतरंगातील वेदना, विद्रोह, शल्ये आणि समाधान प्रांजळ, पारदर्शी, प्रवाही शैलीत लिहिणारा लेखक… दुसरीकडे कुणाच्याही शैलीचा संस्कार, प्रभाव आणि परिणाम न झालेली शैली. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी प्रामाण्य राखणारी ही शैली…. सुबोध, अनलंकृत…. निरीक्षणपूर्वक वाचणार्‍यांच्या ध्यानात येईल की या माणसाची विधाने मोजूनमापून केलेली… सत्याशी प्रतारणा न करणारी… कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची अट दरवेळेला न पाळणारी!
डॉ. अवचट म्हणाले, ‘‘चला, जरा बाहेर भटकून येऊ.’’ प्रथमतः पावले वळली ती ‘अनिकेत कँटिन’कडे. तेथील एका झाडाच्या खोबणीत ठेवलेली फाटकी-तुटकी चटई त्यांनी अंथरली. मागवलेले चहाचे कप घेऊन आम्ही बसलो. मनसोक्त गप्पा झाल्या, ज्या ‘जयकर ग्रंथालया’च्या बंदिस्त नियतकालिक कक्षात होऊ शकल्या नसल्या… तेव्हापासून ते माझे झाले… मी त्यांचा झालो. अधूनमधून पत्रे लिहिली गेली. गाठीभेटी अनेक झाल्या… एकदा भर दुपारी त्यांच्या घरी जाऊन आलो. नव्या सदनिकेच्या शोधात असलेले कविवर्य ग्रेस तिथे भेटले. डॉ. देवदत्त केरकर यांच्या निमंत्रणानुसार व्यसनमुक्तीवर व्याख्यान द्यायला ते मडगावला आले. आमच्या घरी आले… दोन दिवस त्यांच्या सान्निध्यात डॉ. देवदत्त केरकरांकडे मी राहिलो… त्यांचे ज्येष्ठ सन्मित्र प्राचार्य मे. पुं. रेगे यांचे जवळचे आप्त असल्याचा शोध तिथे लागला… समुद्राच्या ओढीने ते आमच्या पाळोळे या गावी आले… घरी आले. माझ्या छोट्या मुलींना त्यांनी आपली ‘ओरिगामी’ची ‘जादू-ई-नगरी’ दाखविली. क्षणार्धात त्यांचेही ते ‘अवचटकाका’ झाले. त्यांनी मुलींना दिलेली ‘मयूरचित्रे’ हा आमच्या घरातील अमूल्य ठेवा झाला आहे. हा ‘बहुरूपी’ प्रतिभावंत कागदाच्या छोट्या अवकाशात न मावणारा… बिहारच्या भ्रमंतीवर ‘पूर्णिया’पासून आज ‘जिवाभावाचे’पर्यंत घरच्या आणि सुहृदांच्या अंतरंगात शिरून अडतीस पैलूदार पुस्तकांची निर्मिती करून परिपूर्ण जीवन जगतो आहे. २६ ऑगस्ट २०१८ रोजी या ‘माणसांमधील माणूस शोधणार्‍या’ या प्रतिभावंताने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. वाढते डॉ. अनिल अवचट दिवसेंदिवस वाढतच आहेत. हा केवळ माणूस नाही; हे आहे बहुशाखांनी, नवपल्लवांनी आणि फुला-फळांनी बहरणारे वर्धिष्णू झाड!