शांतादुर्गा किटलकरीण  मंदिर चोरट्यांनी फोडले

शांतादुर्गा किटलकरीण मंदिर चोरट्यांनी फोडले

किटला, फातर्पा येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण देवीचे मंदिर चोरट्यांनी फोडून दोन फंडपेट्या पळविण्याबरोबरच दोन सोनसाखळ्या लंपास केल्या आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या वेळी घडली असून एकूण ऐवज सुमारे लाखभर किमतीचा असल्याचे देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
मुसळधार पडत असलेल्या पावसाचा फायदा उठवत रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला व सीसी टीव्ही कॅमेरे फोडले. त्यानंतर मंदिरातील दोन फंडपेट्या पळविल्या. चोरट्यांनी कपाटात ठेवलेल्या दोन सोनसाखळ्याही चोरून नेल्या.

हे मंदिर लोकवस्तीपासून दूर असल्याने चोरांनी चोरी करून मंदिरापासून दीडशे मीटर अंतरावर फंडपेट्या फोडून टाकल्या. दर सहा महिन्यांनी फंडपेट्या देवस्थान समितीतर्फे उघडण्यात येतात. या फंडपेट्यांत सरासरी तीन लाखांची रक्कम जमा होते. मागच्या मार्च महिन्यात या दान पेटीतील पैसे काढून ते बँकेत जमा केल्यामुळे आता केवळ २० हजाराच्या आसपास रक्कम दानपेटीत असावी असा अंदाज देवस्थान समितीचे अध्यक्ष उदय देसाई यांनी व्यक्त केला आहे.

काल सकाळी पुजार्‍याच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी देवस्थान समितीला त्याबाबत माहिती दिली. हे देऊळ मुख्य रस्त्यापासून थोडेसे आतील भागात असल्याने या चोरीचा कोणालाही सुगावा लागू शकला नाही. चोरीची घटना घडल्यानंतर ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी सापडलेल्या ठशांचे नमुने घेतले आहेत. नऊ वर्षांपूर्वी याच मंदिरात अशीच चोरी होऊन सुमारे ८ लाखांचा ऐवज चोरून नेला होता.