ब्रेकिंग न्यूज़

शस्त्रहीन क्रांतीचा जनक

 

  •  शरद दळवी

    विसाव्या शतकाने मानवतेला दोन देणग्या दिल्या, ज्यांनी माणूस व समाज यांत महान परिवर्तन घडवलं. पहिली म्हणजे अणुशक्ती व दुसरी महात्मा गांधी. ‘येणार्‍या पिढ्यांना असा माणूस या पृथ्वितलावर खरंच होऊन गेला याची शंका येईल,’ असेदेखील आईन्स्टाईनने म्हटले आहे.

क्रांती म्हटलं की ती रक्तरंजित असायचीच. युद्ध-रक्तपाताविना ती अशक्यच, असे मानवी इतिहासातले प्रस्थापित सत्य होते. सारी युद्धे ही माणुसकीचा मुडदा पाडणारी व सार्‍या क्रांत्या या रक्तपंचमी खेळूनच झाल्या. पण गेल्या शतकात मानवजातीने निःशस्त्र युद्ध व रक्तहीन क्रांतीचा चमत्कार अनुभवला.

मोहनदास करमचंद गांधी या सामान्य परिस्थितीत जन्मलेल्या व वाढलेल्या माणसाने हे अशक्य ते शक्य करून दाखवले व ते महात्मा झाले, देशबांधवांचे ‘बापू’ झाले. स्वार्थी माणसांनी दोन्ही देणग्यांचा दुरुपयोग केला. अणुशक्तीचा उपयोग विकासाऐवजी शक्तिसंचय, दुर्बलांना भय दाखवण्यासाठी केला, तर ‘बापूं’चा उपयोग सत्तासंपादनासाठी चलनी नाण्यासारखा केला.

स्वातंत्र्यचळवळ
इंग्रजी राज्य आले, त्यांनी केलेल्या निरनिराळ्या सुधारणा आल्या. दळणवळणाच्या नव्या साधनांमुळे सामाजिक अभिसरण वाढले. ज्ञानाचा प्रसार वाढला. बुद्धीत विचार वाढला. व्यक्ती व समाजात आत्मभान वाढले. त्यामुळे परसत्तेची मुजोरी व आपल्या बांधवांची लाचारी, दारिद्य्रही जाणवू लागले.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आपले दुःख, दारिद्य्र वगैरे नष्ट करण्याचा उपाय म्हणून मर्यादित स्वातंत्र्याची मांडणी व मागणी सुरू झाली. पण विसाव्या शतकाच्या आरंभी स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क व तो मिळवणे हे कर्तव्य बनले आणि खर्‍या अर्थाने स्वातंत्र्यलढा सुरू झाला.
भौगोलिक वैविध्य, भाषिक, धार्मिक, वैचारिक वगैरे अनेक गोष्टींत असणारी भिन्नता यामुळे अशी आवळ्या-भोपळ्याची मोट बांधणे हा तर गोवर्धन उचलण्याचा प्रकार होता. टिळकांच्या काळात लाल, बाल व पाल या त्रयीमुळे स्वातंत्र्याचे महत्त्व सामान्य माणसापर्यंत हळूहळू पोचू लागले.

नवे युग- नवा प्रेषित
एकोणिसशे वीसमध्ये टिळकयुगाचा अस्त झाला. तोवर राष्ट्रीय कॉंग्रेस या स्वातंत्र्यवादी संघटनेने बाळसे धरले होते. भारतीयांना आता काय हवे व का हवे याचे स्पष्ट भान येऊ लागले होते. पण ते कसे मिळवायचे याविषयी मात्र खूप टोकाची मतभिन्नता होती. खुद्द कॉंग्रेसमध्ये ‘जहाल’ व ‘मवाळ’ असे दोन विरोधी मतप्रवाह होते. या संधिकाळात एक एक अतिसामान्य वाटणारा माणूस पुढे आला. त्याने स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे हाती घेतली. सारा लढा आपल्या विचित्र व विक्षिप्त वाटणार्‍या कल्पनेप्रमाणे लढवला व जिंकलाही. ही व्यक्ती स्वतंत्र भारताची निर्माता म्हणजे राष्ट्रपिता बनली. सामान्यांचे ‘बापू’ बनली. जगातल्या स्वातंत्र्याची आस असणार्‍या माणूसमात्रांची प्रेरणा व आदर्श बनली.
त्या काळात अरविंद, सावरकर आदींसारखे सर्वस्व समर्पण करणारे नेते होते. जिना, सुभाषबाबू आदी असामान्य बुद्धिमत्तेचे कर्मयोगी होते. आंबेडकरांसारखे ज्ञानयोगी किंवा लोहिया, वल्लभभाई किंवा विनोबांसारखे कर्मयोगी होते. हे सर्व कोणत्याही बाबतीत गांधींपेक्षा कणभरही गुणवत्तेत कमी नव्हते. मग असे काय होते ज्यामुळे गांधींचे नेतृत्व सर्वमान्य ठरले?
तिसरा मार्ग
भारताच्या ज्ञात इतिहासात तीन मोठी व सर्वंकष युद्धे यापूर्वी झाली होती. पहिले सांस्कृतिक आक्रमण, तेही छुपे, मोडून काढण्यासाठी झालेले राम-रावण युद्ध. ते शत्रूच्या अंगणात झाले होते. दुसरै कौरव-पांडव युद्ध. ते सर्वव्यापी व संहारक असले तरी काहीसे कौटुंबिक वा व्यक्तिगत कारणांनी झाले.
तिसरे मराठेशाही व अब्दालीचे. पानिपतचे युद्ध. तेही कसल्या तत्त्वांसाठी नव्हते. त्यानंतरची चौथी लढाई म्हणजे भारतीयांची स्वातंत्र्यासाठी झालेली, स्वातंत्र्याची लढाई. या लढ्याचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे ही विलक्षण विषम लढाई होती. एकीकडे ज्यावरून सूर्य मावळत नाही असे विशाल, प्रगत, चतुर वगैरे असलेले साम्राज्यवादी शासन तर दुसरीकडे अनेक आंतरिक समस्यांनी ग्रासलेली दरिद्री, अर्धपोटी जनता. या लढाईला मिळालेला सेनापतीही त्यांच्यातलाच, तसाच होता. पूर्वानुभव, विजय परंपरा वगैरे काहीच त्याच्या गाठीशी नव्हते. कदाचित हीच त्यांच्या जमेची मोठी गोष्ट असावी.
ही लढाई बहुमुखी होती. तीत एकीकडे परकी सत्तेत होणार्‍या शोषणाविरुद्ध लढा होता, तो स्वतःशीही होता. आपली स्वार्थी वृत्ती, पलायनवादी प्रवृत्ती, दैववाद, परावलंबन, अहंकार, निरक्षरता, जातीयवाद आदी व्यक्ती व समाजाला ग्रासणार्‍या समस्यांशी लढायचे होते.
आजवरच्या कोणत्याही लढाईपेक्षा हिचे स्वरूप आगळेवेगळे होते. पण तसाच सेनापतीही वेगळा होता.

गांधींचे सामर्थ्य
गांधी राजकीय व सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर, आणि स्वकीय व परकी अशा दोन्ही आघाड्यांवर लढणारे दोनच महापुरुष भारतात झाले होते ते म्हणजे कबीर व तुकाराम. ते संत होते तसे समाजसुधारक, अंतर्बाह्य दुहेरी सुधारणेचा ध्यास असणारे परखड आणि निःसंग महापुरुष. गांधींचं पहिलं सामर्थ्य म्हणजे अनेक प्रयोग करून, पर्याय पारखून ते भारतात आले होते. परशक्तीची मानसिकता, आपले बळ याची स्पष्ट कल्पना त्यांना होती. भारतात आल्यावर परत भारतभ्रमण करून त्यांनी आपला गृहपाठ पक्का केला होता.
योग्य जागी योग्य प्रकारे बळाचा उपयोग केला तर एखादी मुंगीदेखील हत्तीला जेरीस आणू शकते हे समजण्याचे व्यवहार ज्ञान आणि वापरण्याचे शहाणपण त्यांच्याकडे होते. म्हणूनच या सेनापतीने निवडलेला मार्ग व शस्त्रे वेगळी होती तरी अभूतपूर्वही होती.

गांधींचा शस्त्रसाठा
सर्वप्रथम गांधींनी निवडलेला मार्ग वेगळा होता, ज्यात बुद्धाची करुणा होती, महावीराची अहिंसा होती, पैगंबरांची बंधुता होती, चक्रावून टाकणारी कृष्णनीतीही होती. भक्कम माणुसकीच्या पायामुळे सर्वच संस्कृतीशी नाळ जुळत असल्याने सार्‍या भारतीयांत ती स्वागतार्ह ठरली.
गांधींनी कधीही स्वतःला राजकारणी म्हणवून घेतलं नाही. तसेच ‘गांधीवाद’ अशी वेगळी विचारधारा असल्याचे मान्य केले नाही. तसे पाहिले तर त्यातले सारे भारतीय परंपरेतलेच होते. अहिंसा, सत्य, अपरिग्रह आदी संस्कृतिसंचितातले मोतीच धूळ झटकून वापरले. त्यात समता होती, पण साम्यवादातील दुराग्रह वा वर्गविग्रह नव्हता. त्यात अनाग्रह होता, पण आर्जव मात्र होती. विग्रह नव्हता, साहचर्य होते, सहकार्य होते.

आपले सारे प्रयोग आधी केले मग सांगितले अशा स्वरूपाचे असल्याने त्यांच्या सांगण्याला आत्मबलाचे सामर्थ्य लाभले होते. म्हणून आपल्या अहिंसेच्या धोरणाच्या विरुद्ध चळवळ भरकटण्याचा धोका दिसताच त्यांनी सत्याग्रह थांबवला. कृष्णासारखी योग्य कारणासाठी माघार घेतली. त्यामुळे त्यांचे नेतृत्व अवांछित वा लांछित झाले नाही. उलट ते झळाळून निघाले. त्यांची अहिंसा भयगंड किंवा पलायनवादातून जन्मलेली नाही हे सिद्ध होते. विनोबांनी म्हटल्याप्रमाणे तलवारीशी ढालीचे लढणे होते. तलवारीला तलवार भिडली तर एक तरी तुटण्याचा जुगार असतो. असा आंधळा जुगार गांधींनी कुठल्याच बाबतीत कधीच केला नाही. आत्मबल हे पहिले अदृश्य शस्त्र त्यांनी आपल्या अनुयायांना दिले, ज्याचा उपयोग सामुदायिक सविनय सत्याग्रहात केला गेला.
गांधींचं दुसरं शस्त्र होतं झाडू. हो साधा झाडू. या शस्त्राने त्यांनी स्वकीयांचे दोष झाडले. जन्मश्रेष्ठत्व, अहंकार, आळस वगैरे अनेक दोष आणि सामाजिक विषमता दूर करून सर्वांना समान पातळीवर आणण्याचे थोर कार्य या झाडूने सहजपणे केले.
गांधींचे तिसरे शस्त्र होते ‘चरखा.’ कृष्णाच्या सुदर्शनचक्रापेक्षा मोठे कार्य या चक्राने केले. जनतेच्या स्वाभिमानाला सामूहिक चालना देणारे हे सुदर्शन एकाच हाती नव्हते, तर प्रत्येक राष्ट्रभक्त व स्वातंत्र्याची आस असणार्‍या आबालवृद्ध स्त्री-पुरुषाने घेण्यासारखे होते व तसेच ते घेतले गेले.
स्वदेशीच्या या चळवळीमुळे मॅन्चस्टरच्या गिरण्यांतली चाके थंडावली. मस्तवाल व लुटारू सत्ताधीशांची झोप उडाली. इथून मातीच्या भावाने कच्चा माल नेऊन त्यातून निर्माण केलेला ‘तयार’ माल सोन्याच्या भावाने विकण्याच्या लुटारू कारखानदारीवर हा जालिम उपाय होता.

अनेक कारणांनी लोभ, लाचारी व अकर्मण्य दैववाद या त्रिदोषांवर गांधींनी आत्मबलाची कवचकुंडले दिली. चरखा आणि झाडू ही शस्त्रे दिली आणि अवघी चार आण्यात मिळणारी गांधीटोपी हे शिरस्त्राण दिले.
परसत्तेच्या मानसिकतेचा अचूक अंदाज बांधून त्याच्यातील मूळ मानवतेला आवाहन केले. आपल्या देशबांधवांच्या गुण-दोषांची नेमकी पारख केली, दोषही गुणाप्रमाणे वापरून घेतले. आवळ्या-भोपळ्याची मोट बांधून हा जगन्नाथाचा रथ मार्गी लावण्यापुरते समाजभान जागवले. जनतेच्या रक्तात असलेल्या मूळ मानवतावादी भावनांना आवाहन केले आणि मग कवीने म्हटल्याप्रमाणे- ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के सन्त तूने कर दिया कमाल|’ ‘पृथ्वी सर्वांची गरज भागवू शकते, पण हाव असेल तर एकाचीही नाही’ ही त्यांची शिकवण होती.
गांधी व नंतर…
कोणतीही गोष्ट लोकसहभागाने सहज साध्य होते; जे कायदेकानून करून, सक्तीची दंडयोजना करून नाही हे त्यांनी साध्य व सिद्ध करून दाखवले. पण महात्माजी गेले आणि ती एकी, ते स्वावलंबन, तो स्वाभिमान आणि स्वदेश व स्वदेशीची आस्था धुक्यासारखी विरून गेली.

असे का झाले? त्यांचे विचार वा मार्ग तकलादू किंवा तात्कालिक होते का? नाही. मुळीच नाही. मग भारतात पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ असे का झाले?
पहिली गोष्ट म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे गांधींचे शब्दबद्ध असे काही तत्त्वज्ञान नव्हते. आपली विचारसरणी मार्क्सच्या ‘कॅपिटल’प्रमाणे त्यांनी कुठे शब्दबद्ध करून ठेवली नव्हती. काही ठिकाणी विस्कळित स्वरूपात त्यांचे विचार व १९०९ मधल्या ‘हिन्द स्वराज्य’मध्ये भारतीय स्वातंत्र्याविषयी चिंतन मिळते. पण ते परिस्थितीच्या गरजेप्रमाणे बदलत गेले. जेवढ्या प्रमाणात त्यांनी परिस्थिती घडविली तशीच परिस्थितीनेही त्यांना घडवले. ही मानसिकता त्यांच्या नंतरच्या नेतृत्वात नव्हती.
गांधी छापातले राजकीय नेते नव्हते. ते केवळ समाजसुधारक नव्हते. धर्मधुरीण संतही नव्हते. पण तरीही यांच्यातले गुण आवश्यक तितके सारे त्यांच्यात होते. उक्ती व कृतीतील पारदर्शक एकरूपता हे त्यांचे मोठे सामर्थ्य होते. एकाच वेळी अनेक राजकीय, आर्थिक व सामाजिक रोगांवर योग्य इलाज करणारे वैद्य होते. कबीराप्रमाणे परखड व तुकारामाप्रमाणे माणूस व माणुसकीवर विश्‍वास ठेवून देवत्व शोधणारे संत होते. हे सारे असून आपल्या ध्येयसिद्धीसाठी अथक प्रयत्न करणारे व्यवहारी बनियाही होते.

पण असा माणूस आणि समाज, समस्या व त्यांचे समाधान, हाती असलेली साधने आणि ध्येय यांची सांगड घालणारा, चतुरस्त्र, व्यवहारी व अनुभवातून घडलेला नेता भारताला कॉंग्रेसमधून मिळाला नाही. स्वातंत्र्यलढ्यातल्या बहुतेक नेतृत्वाने गांधींपर्यंत भारतीय संस्कृती संचिताला राजकारणाचा आधार बनवले. त्यामुळे राजकारणाचा ताल व तोल सांभाळला गेला. गांधींनी नीतिधर्म, राजकारण व समाजकारण सारे एका सूत्रात बांधले. ते तसे आवश्यकही होते.
गांधींच्या अनुयायांनी लोकशाहीची राजवट सुरू केली खरी, पण त्याला आवश्यक ते लोकशिक्षण देण्यात ते उणे पडले. गांधीजींनंतर त्यांच्या कार्याचे विभाजन झाले. राजकारण, शासन आदी नेहरू-पटेलांनी घेतले. तर समाजकारण विनोबा, जयप्रकाश वगैरेनी. एक रुपया फोडून छाप व काटा वेगळा केला तर त्या रुपयाची किंमत काय? शून्यच ना?
अनुभवहीन नेतृत्वाकडे शासनयंत्रणा आणि व्यक्ती तितके विचार, परिस्थितीचे अचूक आकलन व त्यावर कठोर उपाय करण्यात आलेले अपयश, व्यवहारावर आदर्शवादाने केलेली निर्णयप्रक्रियेतील मात वगैरे अनेक कारणांनी लोकशाहीची फरपट झाली खरी, पण तो गांधींच्या मार्गाचा नव्हे तर तो सोडल्याचा परिणाम होता.

गांधी व गांधीमार्ग
गाधीमार्ग आता फक्त भारतीय शहरांतील रस्त्यांच्या नावापुरता उरला आहे. पण ते गेल्यावर पाऊणशे वर्षानंतरही अमेरिकेसारख्या संपन्न देशातल्या ट्रम्सपासून उद्यमी दक्षिण कोरियासारख्या देशापर्यंत त्यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. पण भारतात मात्र पिकते तिथे विकत नाही, असे झाले. आता गांधी फक्त तीन ठिकाणी आहेत. मुन्नाभाई म्हणतो तसा ‘ओ नोटवाला गांधी, दुसरा रस्त्याच्या पाट्यावर आहे, तर तिसरा न्यायालयात फोटोफ्रेममध्ये कोळिष्टकांच्या जाळ्यात आहे.’ गांधींनी साध्यासाध्या मार्गाने असाध्य ते साध्य केले. साध्या गांधीटोपीला इंग्रज सत्ता घाबरू लागली. तिला राजमुकुटाचा मान मिळाला. त्यांचे अनुयायी हे सर्व टिकवण्यात उणे पडले. सत्तेसाठी चलनी नाणे म्हणून त्यांचा वापर संपल्यावर त्यांनी त्यांना अडगळीत टाकले. त्यांचा पारदर्शकपणा, उक्ती व कृतीतली पारदर्शकता, सत्यनिष्ठा वगैरे पचणारे, झेपणारे आणि परवडणारे नव्हतेच.

नव्या शतकाची ललकारी
विसाव्या शतकाच्या अखेरीने पुन्हा नव्याने गांधी व गांधीमार्गाचे स्मरण जागे केले. अखेरच्या चार-पाच वर्षांत ‘अण्णा हजारे’ या नावाचा एक नवा शिलेदार शासनातील भ्रष्टाचार, दिरंगाई, पक्षपात वगैरेंवर खवळून उठला. सैन्यदलात नोकरी केलेला एक सामान्य निवृत्त सैनिक. कधीतरी निवृत्तीनंतर ‘गांधी पथका’चा सैनिक झाला. पटले ते गावपातळीवर गांधीजींच्या मार्गाने जाऊन ग्रामसुधारणेचे काम करू लागला.
काही वर्षांनी गांधीजींनी ज्या चौकटीवर प्रहार करून ती खिळखिळी केली ती पूर्ण मोडली नाही. उलट वेगळ्या स्वरूपात ती अधिक बळकट झाली हे त्यांना जाणवले.
भ्रष्टाचार नष्ट झाला नाही. उलट भूमिगत होऊन अधिक सक्रिय झाला. सिंहासने तीच, वृत्ती-वर्तनदेखील तसेच, फक्त गोरे गेले, काळे आले. परके गेले स्वकीय आले. अस्वस्थ हजारेंनी गेली दोन दशके गांधीमार्गाने जनतेचे हक्क व न्यायासाठी लढा सुरू केला, आणि त्याच्या यशाची प्रसादचिन्हेही दिसू लागली. वीस वर्षांनंतर म्हणजे एकोणिसशे अठरा साली केंद्रात लोकायुक्त आला. काही राज्यांत लोकपालही आले. त्यांच्या कळपात सामील होऊन काहींनी त्यांचा वापर सत्ता संपादनासाठी केला हे खरे. पण वारी भक्तीची असो की समाज परिवर्तनाची, तिथे हौशे, नवशे बरोबर गवशेदेखील येणारच.

तरी पण हा ‘चौकटी किंवा सिस्टिम’चा जगन्नाथाचा रथ योग्य मार्गावर काही अंशावर तरी वळला. हे यश गांधी आणि गांधी मार्गाचेच आहे. हजारे केवळ निमित्त मात्र.
हे गांधीजन्माचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष. गांधी व गांधीमार्ग अद्याप उपयुक्त आहेत, राहणार आहेत. पण अणुशक्ती असो की गांधी त्यांचा उपयोग तारतम्याने व विवेकाने करणे आवश्यक आहे.