ब्रेकिंग न्यूज़
शरद ऋतुतील पित्तज व्याधी

शरद ऋतुतील पित्तज व्याधी

आयुर्वेद शास्त्रामध्ये अगदी सूक्ष्मातून सूक्ष्म अशा सखोल विचारातून आरोग्य शास्त्र मांडलेले आहे. खरंच प्रत्येकाने या शास्त्राकडे गांभीर्याने पाहिल्यास व या शास्त्रानुसार आपला आहार-विहार, दिनचर्या – ऋतुचर्येचे किंवा सद्वृत्ताचे पालन केल्यास कोणत्याच प्रकारचे, मुख्यत्वे करून ऋतुनुसार होणारे कोणतेच व्याधी आपल्याला स्पर्शसुद्धा करू शकणार नाहीत. अजूनही आपण आपल्या आरोग्याला महत्त्वच देत नाही. कोणत्याही आजाराशिवाय आपण आपले संपूर्ण जीवन व्यतीत करू शकतो किंवा खरंच आपण आपले जीवन आनंदात पूर्णार्थाने जगू शकतो… हेच मुळी आपल्याला अजून पटत नाही. त्यासाठी फक्त आणि फक्त आयुर्वेद शास्त्र हेच उत्तर होय.
ऋतुनुसार प्रत्येकाने आपल्या आहार-विहारात का बदल करावा?…. या प्रश्‍नाचे उत्तरही त्या त्या ऋतूंत दवाखान्यात येणार्‍या रुग्णांची संख्या देते. हल्ली दवाखान्यात येणारे सत्तर टक्के रुग्ण हे कुठल्या ना कुठल्या पित्त-विकाराने ग्रस्त असतात. आणि असणारच, कारण शरद ऋतू हा पित्त प्रकोपाचाच काळ नव्हे काय? मग आपण केला का आपल्या आहार-विहार-आचारात बदल?? केलाच नसणार. म्हणूनच आज आपण प्राकृत (विकार रहित) शरीरास उपकारक पित्ताचे गुण-कर्म व हेच पित्त प्रकूपित, दूषित झाल्यावर त्याचे शरीरावर काय परिणाम होतात व आपण हे पित्तज व्याधी कसे टाळू शकतो ते पाहू. नाहीतर छातीत धडधडते पित्त वाढल्याने आणि आपण मात्र सगळे रक्ताचे रिपोर्ट, ईसीजी, ईकोसारख्या सगळ्या टेस्ट करून घेतो. हे रिपोटर्‌‌स सगळे नॉर्मल असूनही हृदयाची धडधड काही थांबत नाही. कुठल्याच औषधाने गुण मिळत नाही. मग काहींना मनोविकाराचीसुद्धा शंका येऊ लागते. हा सगळा अनाठायी खर्च व ताण टाळण्यासाठी आपल्याला अश्‍विन – कार्तिकमध्ये सर्वसाधारणपणे आढळणारे पित्तज व्याधी माहीत असणे गरजेचे आहे. आयुर्वेद शास्त्रात चरकांनी तर चाळीस प्रमुख पित्तप्रकोपक लक्षणे सांगितली आहेत.
पित्त दोष –
आपण जे काही अन्न, पाणी सेवन करतो, त्या घटकांना शरीरसात्म्य करण्यासाठी पचनप्रक्रियेची गरज असते. या शरीरामधील पचनाची, जबाबदारी पित्तदोषामार्फत पार पाडली जाते.
पित्ताचे गुण –
पित्त सस्नेह, तीक्ष्णोष्णं, लघु विस्त्रं सरं द्रवम् |
पित्ताचा प्रत्येक गुण पचन या कार्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने मदत करतो.
* सस्नेह – पित्ताद्वारे अन्नाचे पचन होताना अन्नाला मार्दवता आणण्याचे काम या गुणामुळे होते.
* तीक्ष्ण – या गुणामुळे भेदनाचे कार्य होते. म्हणजेच अन्नकण सुटे होतात व याच गुणांमुळे जर पित्त अत्यधिक वाढले तर अवयवांवर, आतड्यांवर क्षत पडणे, व्रण उत्पन्न होणे ही लक्षणे निर्माण होतात. उदा. पेप्टीक अल्सर.
* उष्ण – या गुणामुळे पदार्थांच्या रूप-रस-गंध यामध्ये परिवर्तन, बदल घडून येतात म्हणजेच पदार्थांचे पचन होते.
* लघु – पचनासाठी लाघवतेची गरज असते. त्याचप्रमाणे प्राकृत पचनानंतर लाघवता प्राप्त होते.
* विस्त्र – म्हणजेच दुर्गंधीयुक्त. उलटीमधील येणारी दुर्गंधी मलीन पित्ताची असते.
* सर – अन्नपचनासाठी अन्नाला चहुबाजूंनी वेढून पाझरण्याची गरज असते. ती सर गुणामुळे पूर्ण होते.
* द्रव – पित्ताच्या उष्ण, तीक्ष्ण गुणांचा अतिरेक होऊ नये ही खबरदारी द्रव गुणामुळे घेतली जाते. घन पदार्थांचे पचनासाठी ओलावा निर्माण करण्यास विद्रावण करण्यास या गुणाची मदत होते.
* सत्त्व – पित्ताच्या ठिकाणी सत्त्वगुणाचे आधिक्य असते, म्हणूनच पित्तप्रकोप झाल्यास, दूषित झाल्यास मद, मूर्च्छासारखी लक्षणे आढळतात.
पित्ताची सामान्य कार्ये –
पित्तं पक्त्युष्मदर्शनैः |
क्षुतृट्‌रुचि प्रभामेधाधीशौर्य तनुमार्दवैः |
* पक्ती – पक्ति म्हणजे पचन. आयुर्वेद शास्त्रात ‘पचन’ या शब्दाने केवळ ‘आहार पचन’ अपेक्षित नाही तर विभिन्न ध्वनींचे, रंग, रूपाचे, गंधाचे शरीरास अनुकूल स्वरूपात परिवर्तन होऊन स्वीकार करणे अपेक्षित आहे.
आयुर्वेदाने कोणतेही आजार निर्माण होण्यामागे ‘पचन बिघडणे’ हे कारण सांगितले आहे. ‘रोगाः सर्वेऽपि मंदेग्नौ |
* उष्मा – शरीर व्यापार चालविण्यास उष्णता आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शरीर तापमान संतुलित राखण्याचे काम पित्तदोष करतो. म्हणूनच पित्तप्रकोपामध्ये उष्मा हे पित्ताचे कार्य बिघडल्याने दाह हे लक्षण आढळते किंवा ज्वर येतो.
* दर्शन – दर्शन म्हणजे पाहणे. रूपग्रहण करणे. आलोचक पित्ताद्वारे डोळ्यांच्या ठिकाणी रूप पचनाचे कार्य घडते. म्हणूनच आलोचक पित्तामध्ये बिघाड झाल्यास पित्ताचे दर्शन हे कार्य बिघडते व डोळ्यांना खाज, दाह किंवा दृष्टीमांद्य यांसारखे विकार होतात.
* क्षुत् – क्षुत् म्हणजे क्षुधा, भूक लागणे हे पित्ताचे प्रमुख कार्य आहे. भुकेची जाणीव करून देण्याचे काम प्राकृत पित्त करते. भूक ही घटना शरीरांतर्गत पचन कार्य सुरळीत चालू असण्याचे द्योतक आहे. म्हणूनच आजारी माणसाची सर्वप्रथम तोंडाची चव बिघडलेली असते व भूक लागत नाही.
* तृट् – तृट् म्हणजे तहान. शरीरांतर्गत पित्ताच्या पचन कार्याला अल्प द्रवत्वाची गरज असते. ही गरज तहानेने पूर्ण होते. त्याचप्रमाणे पित्ताची उष्णता अत्यधिक वाढून शरीराला इजा पोहचू नये याची दक्षता तहानेद्वारे होते.
* रुचि – रुचि म्हणजे चव. अन्नाचे योग्य पचन होण्यावर तोंडाची चव अवलंबून असते.
* प्रभा – प्रभा म्हणजे त्वचेची कांती, शरीर तेज, प्रसन्न चेहरा या सर्व गोष्टी शरीरामधील सप्त धातूंमध्ये सुस्थिती असेल धातूंची सारता उत्तम असेल तर प्राप्त होऊ शकतात.
* मेधा –  मेधा म्हणजे धारण शक्ती. मन, बुद्धी या संदर्भातील पचनक्रिया सुरळीत असतील तर साधक पित्ताचे कार्य दिसून येते. मन, बुद्धीचे व्यापार सुरळीत चालतात. पित्ताच्या ठिकाणी सत्वाधिक्य असते म्हणून मेधा हे कार्य घडते.
* धी – धारणा शक्ती, धैर्य.
* शौर्य – जे सर्वसामान्यांना जमत नाही ते करून दाखविण्याची क्षमता. पित्ताचे पाचन कार्य प्राकृत रितीने घडत असेल तर सप्त धातूंचे धारण कर्म उत्तम पार पडते. तसेच शरीरबल व मानसबल वाढून शूरता निर्माण होते.
* तनुमार्दव – नाजूक, मृदू शरीर.
पित्ताचे प्रकार –
१) पाचक पित्त – पक्वाशय आणि आमाशय यामधील भागात (ग्रहणी) प्रामुख्याने पचन प्रक्रिया घडून येते. याच ठिकाणी पाचक पित्ताचे स्थान सांगितले आहे. बाह्य सृष्टीमधील अन्न-पाणी या महत्त्वाच्या पदार्थांचे पचन करण्याचे कार्य या पित्त प्रकारामुळे घडते. त्याचप्रमाणे उरलेल्या पित्त प्रकारांनाही बल व ताकद देते. म्हणजेच उदरातील मुख्य अन्नपचन नीट नसेल तर, शरीरामधील इतर ठिकाणी होणारे पचन व्यापार नीट घडून येत नाही.
२) रंजक पित्त – आमाशयस्थानी असणारे ते रंजक पित्त. रसाला लाल रंग प्राप्त होऊन रक्त निर्माणाची जी घडामोड घडते त्यामध्ये रंजक पित्ताची महत्त्वाची भूमिका आहे.
३) साधक पित्त – साधक पित्त हृदयामध्ये राहून बुद्धीचे/मनाचे कार्य सुरळीतपणे घडवून आणते. म्हणूनच पित्त वाढल्यास हृदयात धडधडते, चिंता-क्रोधादी गुणांनी पित्त वाढल्यास बुद्धीच्या ठिकाणी तमाचे आवरण निर्माण होते व विषयाचे ग्रहण नीट होत नसल्याने निर्णय घेण्याची क्षमता नष्ट होते, मनोदौर्बल्य उत्पन्न होते.
४) भ्राजक पित्त – त्वचेच्या ठिकाणी कांती, छाया, वर्ण हे प्रकाशित करण्याचे, प्राकृत राखण्याचे कार्य भ्राजक पित्त करते त्वचेवर लेप, अभ्यंग, परिषेक अशी जी औषधांची रचना केली जाते. त्याचे पचन करण्याचे, शोषण करण्याचे कार्य भ्राजक पित्ताचे.
* आलोचक पित्त – रूपग्रहण, पाहण्याची प्रक्रिया आलोचक पित्ताद्वारे घडते.
प्राकृत पित्ताच्या या सामान्य गुणधर्मांचे, कार्याच्या स्थानांविषयी जेव्हा आपल्याला ज्ञान होते, माहिती मिळते तेव्हाच आपल्याला पित्तकर आहार-विहाराचे ज्ञान होते व तेव्हाच आपल्याला उष्ण, तिखट, मसालेदार पदार्थानेच पित्त का वाढते किंवा हे पदार्थ आपण का टाळावे याचे योग्य मार्गदर्शन होते.
शरद ऋतू हा पित्त प्रकोपाचा काळ म्हणूनच सध्या सर्वांग दाह, सर्वांगाला खाज येणे, छातीत धडधडणे, अपचन, सकाळी उठल्यावर घशाकडे आंबट-कडू येणे, डोळ्यांची जळजळ, करपट ढेकर, चव नसणे, चिडचिड होणे यासारखीच पित्तजवृद्धीची लक्षणे घेऊन रुग्ण दवाखान्यात येताना दिसतात.
पित्तप्रकोपक लक्षणे –
पित्तस्य दाहरागोऽष्म्‌पाकिताः|
स्वेदः क्लेदः सुतिः कोथः सदम मूर्च्छनं मदः |
कटुकाम्लौ रसौ वर्णः पाण्डुरारुणवर्जितः |
– सर्वांगाला मिरची लागल्याप्रमाणे जळजळते, म्हणजेच भ्राजक पित्त दूषित होणे
– शरीराची उष्णता वाढणे, पाचक पित्त, भ्राजक पित्त दूषित होणे
– अतिस्वेद प्रवृत्ती, भ्राजक पित्त दूषित.
– शरीर शैथिल्य
– मद-मूर्च्छा, साधक पित्त विकृती
– पाण्डू लक्षणे म्हणजेच पाचक पित्त व रंजक तित्ताची दुष्टी
– छातीत धडधडणे, साधक पित्ताची दुष्टी
– डोळ्यांना खाज येणे, डोळ्यांची आग होणे, आलोचक पित्तदुष्टी
– डोकेदुखी, चिडचिडेपणा, रागावर नियंत्रण नसणे.
– निद्रानाश, भूक लागते पण तोंडाला चव नाही- अशी अनेक प्रकारची लक्षणे पित्तप्रकोपात किंवा पित्त दूषित झाल्यावर रुग्णांमध्ये दिसतात. काही वेळा ही लक्षणे एवढी तीव्र असतात की प्रत्येकाला आपल्याला काहीतरी मोठा आजार झाला आहे असेच वाटते पण जरा समजून जरासाच आहारामध्ये बदल केल्यास या व्याधीपासून उपशय – आराम मिळेल.
स्वस्थ मनुष्याने तसेच ज्यांना दरवर्षी या काळात पित्ताचा त्रास होतो त्यांनी शरद ऋतूत विरेचन हा संशोधन उपक्रम योग्य त्या वैद्याच्या सल्ल्याने करून घ्यावा. कारण विरेचन हा पित्तदोषावरील श्रेष्ठ असा शोधनोपक्रम आहे. विरेचनाच्या पूर्व कर्मामध्ये रुग्णाला सात दिवस स्नेहन-स्वेदन द्यावे. स्नेहनामध्ये मध्यम प्रमाणाइतके म्हणजेच १२ तास भूक लागणार नाही इतके स्नेहन अपेक्षित आहे. स्नेहन पूर्ण झाल्यानंतर २ दिवस मध्ये जाऊ देऊन मगच विरेचन करावे. या मधल्या २ दिवसांच्या काळात स्वेदन मात्र चालूच ठेवावे. तसेच या काळामध्ये स्निग्ध, द्रव, उष्ण असे मांसरस, ओदन, अम्लफळांचा रस यांनी युक्त आहार घ्यावा. हलका आहार घ्यावा व पिण्यासाठी गरम पाणी वापरावे. शारदीय विरेचनात पित्तप्राधान्य असल्याने त्रिवृत्त चूर्ण, द्राक्षाक्वाथ द्यावा. अनुपान म्हणून सारखे कोष्ण जल द्यावे. औषधी सेवनानंतर लगेच गरम पाण्याने गुळण्या करून मुखभाग आतून स्वच्छ करावा. वेगोदीरण चांगले व्हावे यासाठी वारंवार गरम पाणी प्यावे. वेगोवीरण झाल्यानंतर फार जोर न करता, न कुथता येणार्‍या वेगाचे विसर्जन करावे. सम्यक् शोधनाने सर्व स्रोतसे शुद्ध होतात. शरीरास लाघव प्राप्त होते. व्याधी कमी होतात. असे हे शारदीय विरेचन करून घेतल्यावर हळुहळू हलक्या आहारापासून किंवा सूप, यूप इ. आहार सेवनाने सुरुवात करावी. जसा जसा अग्नी प्रदीप्त होतो तसा तसा आहार वाढवावा.
या काळात विरेचन घेतल्यास निश्‍चितच फायदा होतो, पण तरीही विरेचन शोधनोपक्रम करून घेण्यास जमत नसल्यास रोज रात्री मृदु विरेचन घ्यावे. यासाठी आमलकी, आरग्वध, एरंड, हिरडा, मनुका किंवा अविपत्तीकर चूर्णाचा वापर करावा.
औषधी द्रव्यांमध्ये कामदुधा, सुतशेखर, शंखवटी, हिंग्वाष्टक चूर्ण, शतावरी, यष्टीमधु, गोक्षुर यांसारख्या शीत, मधुर द्रव्यांचा उपयोग करावा.
मग…, काय बदल कराल तुमच्या आहारात…?
– पित्तप्रकोप असल्याने आहारात पित्तशामक अशा मधुर, तिक्त व कषाय रसाच्या द्रव्यांचे आधिक्य असणे आवश्यक आहे. या दृष्टीने पाहता भात, ज्वारी, गहू या द्रव्यांचा आहारात प्रामुख्याने उपयोग करावा.
– मूग, मटकी, हरभरा, मटार यांसारखी तुरट रसाची व मधुर अनुरस असणारी द्विदल धान्येही भरपूर प्रमाणात घ्या. भरपूर दूध व तूप घ्यावे.
– नारळ हा मधुर रसाचा, शीतल, पित्तप्रशमन करणारा असल्याने त्याचाही उपयोग भरपूर करावा.
– कडवट पदार्थांपैकी कारल्याची भाजी, मेथीची भाजी अधिक खाव्यात.
– आंबट मात्र खाऊ नये. पण आममूल व आवळा मात्र पित्तशामक असल्याने त्यांचा वापर करावा. मोरावळा, गुलकंद खावा.
– संत्री, मोसंबी, चिक्कू, डाळींब, केळी ही फळेही हितकर आहेत.
– आले, ओली हळद व लिंबू लोणचे खावे पण कैरीचे लोणचे मात्र खाऊ नये.
– लसूण पूर्णपणे वर्ज्य करावे.
– बदाम, खारीक, पिस्ता यांसारखी मधुर, बल द्रव्ये खावीत.
– उकाडा व घाम यांमुळे फार व्यायाम करणे शक्य नसेल पण पोहण्याचा व्यायाम या ऋतूंत योग्य ठरतो.
– तसेच योगासने, प्राणायाम, ध्यान हितकारक ठरतात.
अपथ्यकर…
– उष्ण, तीक्ष्ण, मसालेदार, विष्टब्ध, आंबवलेले, शिळे पदार्थ पूर्ण टाळावे.
– पोटात तडस लागेपर्यंत जेवू नये.
– दिवसा झोपू नये.
– रात्री जागरण करू नये.
याप्रमाणे जर आहार-विहार ठेवला तरच आरोग्य टिकून राहते व या ज्या ऋतुनुसार होणार्‍या पित्तज विकारांमुळे तुम्ही त्रस्त आहात, त्यांचा त्रास होणार नाही.