शब्दब्रह्म

 

सृजन हा माणसाचा मूलधर्म असल्यामुळे वाणी आणि लेखणी यांच्या सहाय्याने आजवर संस्कृतीचे संवर्धन झालेले आहे. व्यक्ती आणि समष्टी यांमध्ये सुदृढ सेतू या माध्यमांतून झालेला आहे. प्रबोधनाची प्रक्रिया निरंतर चालू राहिली आहे.

मानवी संस्कृतीच्या विकासक्रमात वाङ्‌मयाला अत्युच्च स्थान दिले जाते. मानवाच्या आत्मिक उन्नयनासाठी ज्या अनेक कला पोषक ठरलेल्या आहेत, त्यांत वाङ्‌मयाने आपला महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. वाङ्‌मयाच्या वाचनाने, मननाने, चिंतनाने, श्रवणाने, निर्मितीमुळे आणि आस्वादामुळे माणूस आपल्या मूलप्रवृत्तींमध्ये बदल घडवून आणू शकतो. विकसनशीलता आणि सुसंस्कृतपणा या प्रयत्नसाध्य बाबी असतात. समाजजीवनात माणूस माणसाला जोडला जाणे आवश्यक असते. हे समसंवेदन आणि समानधर्मेपण निर्माण होण्यासाठी वाणी समृद्ध होणे ही प्राथमिक बाब होय. वाणीचे रूपांतर वाचाशक्तीत होते. वाचाशक्ती लाभलेल्या माणसाला अनेकांशी हृदयसंवाद करावासा वाटतो. ही अंतःप्रेरणा म्हणजे एक स्फुल्लिंग होय. तो साधनेने सतत चेतवावा लागतो. पुढे तो परिस्फुटित होतो. पल्लवित होतो. अशाने वाचाशक्तीचे लेखनशक्तीत रूपांतर होते. सृजन हा माणसाचा मूलधर्म असल्यामुळे वाणी आणि लेखणी यांच्या सहाय्याने आजवर संस्कृतीचे संवर्धन झालेले आहे. व्यक्ती आणि समष्टी यांमध्ये सुदृढ सेतू या माध्यमांतून झालेला आहे. प्रबोधनाची प्रक्रिया निरंतर चालू राहिली आहे.
आपल्या भारतीय परंपरेने परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार मानलेले आहेत. चतुर्विध वाणींपैकी वैखरीला प्राधान्य दिले आहे. हीच वाग्देवता. हीच वाचाशक्ती. केशवसुतांनी या वाग्देवतेचे स्तवन केले आहे. ‘दिव्य ठिणगी’ या कवितेत ते उद्गारतात ः
ज्वालेने रमणीय एक ठिणगी माझ्याकडे धाडिली,
ती मीं आपुलिया उदात्त हृदयीं सानन्द हो स्थापिली;
पृथ्वीनें मज आणण्यास वरतीं होतें जिला धाडिलें,
प्रीतीनें मग त्या फिरूनि मज या लोकांमधीं आणिलें
या वैखरीच्या अंगी वैशाखवणवा विझविण्याचे सामर्थ्य असते. कवितेमुळे गाणे गवसते. गाण्याने श्रम हलके होतात. केशवसुतांनीच म्हटले आहे ः
गाण्यानें होतात श्रमही हलके| हेही नसे थोडकें|
दुःखाचा निचरा करण्याचे कार्य कविता करते. गाणे करते. वाङ्‌मयाचा उगम कवितेतूनच झाला असे परंपरा सांगते. कवितेच्या माध्यमातून अंतर्मनाच्या पाकळ्या उलगडल्या जातात. भावना, विचार आणि संवेदना यांचे वहन करण्याचे कार्य कविता करते. पण हा उत्स्फूर्त उद्गार एकरसात्मक होऊन शब्दस्फोटाद्वारे बाहेर पडतो. कवितेतील भावकोमलतेची पखरण आपल्या मनाला आल्हाद देते. तुकारामांचा ः
सांडिली त्रिपुटी| दीप उजळला घटीं॥
हा उद्गार ऐकताना ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान या त्रिमितींचा विसर पडतो आणि घटात ज्योत तेवत असल्याचा म्हणजेच दृक्‌संवेदनेचा प्रत्यय येतो. तीच गोष्ट ज्ञानदेवांच्या या सुपरिचित उद्गारांची ः
इवलेसें रोप| लावियलें दारीं
त्याचा वेलु गेला| गगनावेर्‍ही
मोगरा फुलला| मोगरा फुलला
फुलें वेचितां| भार कळियासि आला
हे शब्द वाचताना, ऐकताना आपले मन एकतान होते. भावसमाधीच्या अनामिक अवस्थेत आपण आपले लौकिक जीवनातील दुःख विसरतो. पण ही कविता सहजासहजी उमलते का? त्यामागे कवीच्या जीवनातील अनुभवांचे संचित असते. त्याची जीवननिष्ठा जाणता-अजाणता व्यक्त होत असते. कवीचा आत्मा कवितेतून बोलत असतो. भावस्पंदनाच्या अनंत कळा त्याच्या शब्दांमधून अपरिहार्यपणे प्रकट होत असतात. अशा प्रकारच्या अनिर्वचनीय आनंदाच्या क्षणी तुकाराम म्हणतात ः
आनंदाचे डोहीं आनंदतरंग
आनंदचि अंग आनंदाचें
काय सांगो, झालें कांहींचिया बाहीं
पुढें चाली नाहीं आवडीनें
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे|
शेवटच्या दोन ओळींत त्यांनी फार मोठा आशय व्यक्त केला आहे. पोटातील गर्भाची जशी आवड असेल तेच डोहाळे मातेला होतात; कारण त्या ठिकाणचा स्वभाव आईमध्ये प्रकट होतो. तुकाराम म्हणतात, जो अनुभूतीचा ठसा माझ्या अंतःकरणात उमटला आहे, तोच माझ्या वाणीद्वारा प्रकट झालेला आहे.
झपाटलेपण हा मनमोहनांच्या प्रतिभेचा स्थायी भाव असूनही जीवनसौंदर्याचा प्रत्यय आल्याशिवाय कागदावर कवितेचे अवतरण होऊ नये याचे पुरेसे आत्मभान त्यांना आहे. ‘रसिकवरा’ या कवितेत ते म्हणतात ः
सौंदर्याचा साक्षीदार मी
प्रतिबिंबे शब्दांत साठली
शालिनतेची आर्द्र कौतुके
निर्माल्याला देठे फुटली
रूपदर्शनासाठी केवळ
मीच मनाची केली समई॥
अशा प्रकारच्या उद्गारांत उपदेश नसतो, असतो तो आत्मस्पर्श. या वैयक्तिक अनुभूतीत ‘साकल्याचा प्रदेश’ सामावला जातो. त्यांच्या वाचनाने आणि श्रवणाने आपण वेगळ्या भावविश्‍वात प्रवेश करतो.
कवितेप्रमाणे गद्यही आनंद दोते. श्रीनिवास विनायक कुलकर्णी, दुर्गा भागवत, शांता शेळके, वासंती मुझुमदार, इंदिरा संत, मंगेश पाडगावकर आणि गो. वि. करंदीकर (विंदा करंदीकर) इत्यादींचे ललित निबंध वाचणे हा एक आनंदानुभव असतो. रवींद्र पिंगे यांनी आपल्या लेखनाची वेगळी शैली निर्माण केली आहे. कवितेतील आरती प्रभू आणि ‘वारा वाहे रुणझुणा’मधील चिं. त्र्यं. खानोलकर यांमध्ये अद्वैत असते. पण ललित गद्यात ते वेगळा ताल आणि तोल निर्माण करतात. उदा.
‘‘संध्याकाळ झाली. गॅलरीत बसलो होतो. न येणार्‍या कुणाची तरी वाट पाहत. नेहमीप्रमाणे ओठात जांभई आली. एक आठवण प्राजक्ताच्या पावलांनी आली.
कळ्यांतला सुगंध सायंकालीन रंगावर मधुर घोटाळत होता. सायंकालीन रंगाचा शालू होऊन. अशी मिजास त्या घाटदार देहावर होती की त्या देहासाठी एक संध्याकाळ ईश्‍वरानं माळी होऊन फुलवावी. सुगंध तरळून गेला होता. भुईची आरास हळूहळू येणार्‍या कातरवेळेत डहुळत होती. तरी खिडकीसमोरच्या त्या आंब्याच्या डहाळीवर भिरभिरत्या दृष्टीच्या पात्यात घाव घालणारं एक अमोघ शस्त्र पाजळून खार आली नाही. फळभार पिकून तुटायला आला होता. खारीचे दात लागून फळ अधिक गोड झालं असतं. सुखाचाही एक दुःखद भार सहन होत नव्हता.
संध्याकाळ संपली आणि आकाश निळंभोर होऊन गेलं. कुणीच आलं नाही. डाळिंबासारखे पाणीदार सायंकालीन रंग विरून गेल्यावरही कुणी आलं नाही. मृत्यू आला असता तरीही चालला असता. तो क्षणच असा आला. उगीचच एकटेपणा घेऊन. त्या क्षणाचं सामर्थ्य असं होतं की खडकाचंही टरफल व्हावं. कविता हा जन्म असतो; तसाच मृत्यूही, हे आज मला जाणवलं.’’
(‘ललित’/दिवाळी अंक, १९७०)
– कवितेच्या जन्मप्रक्रियेचा शोध काव्य आणि गद्य यांच्या सीमारेषेवरून तरल मनोवृत्तीने खानोलकरांनी येथे घेतलेला आहे.
कविवर्य ग्रेस यांचे ‘चर्चबेल’, ‘मितवा’, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’, ‘मृगजळाचे बांधकाम’, ‘वार्‍याने हलते रान’ आणि ‘कावळे उडाले स्वामी’ यांसारख्या ललितबंधसंग्रहांमधून ग्रेस यांच्या शैलीतील असाधारण शक्तीचा, आत्ममग्नतेचा आणि आत्मशोधाच्या प्रक्रियेचा प्रत्यय येतो. निर्मितिशीलतेचा आगळा-वेगळा झपाटा येथे दिसतो. त्यांच्या प्रतिभाधर्माचे अनोखेपण त्यातून सिद्ध होते.