ब्रेकिंग न्यूज़

शबरीमलाचा पेच

केरळमधील शबरीमलाचे मंदिर महिलांना खुले करण्याचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने हे मंदिर भाविकांना खुले झाल्यापासून तेथे दर्शन घेऊ पाहणार्‍या महिलांच्या विरोधात तेथे उग्र आंदोलन सुरू झाले आहे. मंदिराकडे निघालेल्या दोन महिलांना वाटेत अडवून परतवले गेले, तर कडेकोट पोलीस संरक्षणात जाणार्‍या दोन महिलांना मुख्य पुजार्‍याने मंदिरच बंद करण्याची धमकी दिल्यानंतर परत फिरावे लागले. शबरीमलाच्या विषयात केरळमध्ये दोन्ही बाजूंनी तीव्र झालेल्या भावना, त्यातून होत असलेले धार्मिक ध्रुवीकरण आणि या विषयाचे चाललेले राजकारण हे सगळेच चिंताजनक आहे. शबरीमलाच्या अय्यपा मंदिरात महिलांनी प्रवेश न करण्याची शेकडो वर्षांची परंपरा सर्वोच्च न्यायालयाने स्त्री – पुुरुष समानतेच्या निकषावर आपल्या निवाड्याद्वारे मोडली असली, तरी त्याचे निमित्त साधून जोरजबरदस्तीने मंदिरात घुसण्याचा सध्या काही महिलांकडून चाललेला प्रयत्न पाहता त्यामागे खरोखरच भाविकता आहे की धार्मिक तणाव निर्माण करण्याचे मनसुबे असा प्रश्नही नक्कीच उपस्थित होतो. अय्यप्पाच काय, कोणत्याही मंदिरामध्ये, मशिदीमध्ये, चर्च, गुरुद्वार्‍यामध्ये महिलांनाही प्रवेश अवश्य मिळायला हवा, परंतु तो अशा प्रकारच्या जोरजबरदस्तीने नव्हे. त्याबाबत सर्वसहमती निर्माण होण्याची खरी गरज आहे. धार्मिक स्थळावर जायचे असते ते भाविकतेने. पर्यटनस्थळ म्हणून नव्हे आणि राजकारण करण्यासाठी तर नव्हेच नव्हे. दांडगाईने, पोलिसांचे गणवेष, बुलेटप्रुफ जाकिटे, हेल्मेट वगैरे घालून तीन तीनशे पोलिसांच्या ताफ्यामधून मंदिरात घुसण्याचा जो प्रयत्न काही महिलांनी केला तो अनाठायी आणि निष्कारण धार्मिक तणाव निर्माण करणारा आहे. त्यातून प्रतिगामी शक्तींचे आयते फावले आहे. विशेष म्हणजे यापैकी एक महिला रेहाना फातिमा ही मुस्लीम आहे. तिच्या घरावर हल्ला झाला. मेरी स्वीटी ही ख्रिस्ती आहे, तर कविता जक्कल ही हैदराबादच्या एका टीव्ही वाहिनीची पत्रकार आहे. यांचे शबरीमलाला जाण्यामागचे उद्देश स्वच्छ दिसत नाहीत. अशा प्रकारच्या प्रयत्नांनी प्रतिगामी शक्तींना एकवटण्याची आणि सामाजिक समर्थन मिळवण्याची संधीच आज केरळमध्ये मिळवून दिलेली आहे. ज्या प्रकारे तेथे स्त्री – पुरुषांचे शबरीमला संदर्भात आंदोलन चालले आहे, ते पाहिले तर बाबरी – रामजन्मभूमी आंदोलनाची पुनरावृत्ती घडवण्याचा आणि त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न तर नाही ना असा प्रश्न पडल्याविना राहात नाही. केरळ हे साम्यवाद्यांच्या प्रभावाखालील राज्य. परंतु तेथे धार्मिक भावनाही तितक्याच तीव्र आहेत. अशा वेळी शबरीमलाच्या विषयामध्ये धार्मिक उन्माद माजवणे म्हणजे मतांच्या गणितांना समोर ठेवून खेळलेली खेळी असू शकते. शबरीमलाच्या अय्यपाची चाळीस किलोमीटरची पदयात्रा ही अत्यंत खडतर मानली जाते. दाट जंगलातून ती होते. त्यासाठी भाविक चाळीस दिवस व्रत करतात. काळी एकसमान धोतरे नेसलेले उघड्या अंगाचे भाविक डोक्यावर कापडी पिशवी घेऊन ही यात्रा करतात. तेथे उच्च नीचता नसते, धार्मिक भेदभाव नसतो. मात्र १० ते ५० वर्षांच्या महिलांना प्रवेश नसल्याचे परंपरेने मानले गेले आहे. ही परंपरा कोणी निर्माण केली, का निर्माण केली याचे काही पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु अय्यप्पा हा देव ब्रह्मचारी असल्याने मंदिराचे संकेतस्थळ सांगते. रजस्वला स्त्रियांसंदर्भातल्या जुनाट, वेडगळ कल्पना कालानुसार बदलल्या. प्रगत वैद्यकीय ज्ञानाने त्यासंदर्भातील समाजातील गैरसमज दूर झाले. असे असताना त्या कारणावरून महिलांना प्रवेश देणे निश्‍चितच अनुचित आहे, परंतु म्हणून अशा संवेदनशील विषयांचा राजकीय लाभासाठी वापर करण्यासाठी अशा विषयांना चिथावणी दिल्याने काही साध्य होणार नाही. समाजामध्ये सकारात्मक रीतीने अशा कालबाह्य प्रथांबाबत जागृती करण्याची खरी आवश्यकता आहे. तेवढे सामंजस्य, तेवढा विवेक समाजात निर्माण करणे ही ज्या नेत्यांची जबाबदारी, तेच राजकीय लाभाचा शॉर्टकट म्हणून अशा प्रकारचे संवेदनशील विषय बेजबाबदारपणे हाताळतात आणि त्याची परिणती अशा संघर्षात होते. एखाद्या वेळी जोरजबरदस्तीने मंदिरात प्रवेश केला, तर त्यातून क्षणिक प्रसिद्धी जरूर मिळेल, परंतु समाजाची मानसिकता बदलू शकणार आहे का? शनी शिंगणापूरच्या बाबतीतही हेच चालले होते. आज देशामध्ये अनेक धार्मिक स्थळांमध्ये अशा प्रकारचे कालबाह्य व अनावश्यक निर्बंध आहेत. केवळ परंपरा म्हणून ते पाळले जात आहेत. त्या प्रथा कोणी निर्माण केल्या, का केल्या याची कोणाला माहिती नसते. त्यामुळे याबाबत लोकशिक्षण, समाजजागृती आणि सकारात्मकतेने, सामंजस्याने, विवेकाने सकल समाजाचे उद्बोधन हाच खरा योग्य मार्ग ठरेल. अन्यथा जरासा हलकल्लोळ माजविला जाईल, अशा विषयांचे भांडवल एकीकडे राजकारणी करतील आणि आपली मतपेढी घडवतील, दुसरीकडे प्रतिगामी शक्ती करतील आणि आपले जनसमर्थन वाढवतील, तिसरीकडे उठवळ टीव्ही वाहिन्या आपला टीआरपी वाढवतील आणि कालबाह्य कुप्रथांचा अंमल मात्र सुरूच राहील.