व्हीव्हीपॅटविषयक विरोधी पक्षांची मागणी आयोगाने फेटाळली

मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रथम पाच व्हीव्हीपॅट यंत्रांची पडताळणी करावी. तसेच फेरफार आढळल्यास यंत्रांची पडताळणी करावी. तफावत आढळल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व व्हीव्हीपॅट स्लिपप्सची मोजणी करावी ही विरोधी पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगाने काल फेटाळली. २२ पक्षांच्या शिष्टमंडळाने तशी मागणी आयोगाकडे केली होती.

कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली २२ पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करताना म्हटले होते की व्हीव्हीपॅटची पडताळणी करताना जर काही फेरफार आढळला तर सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची पडताळणी करावी.
कॉंग्रेसचे नेते अभिषेक सिंघवी यांनी निवडणूक आयोगासमोर विरोधी पक्षांची बाजू मांडली होती. निवडणूक आयोगाने त्यावेळी आमच्या मागण्यांचा विचार करू असे सांगितले होते, अशी माहिती विरोधकांनी पत्रकारांना दिली होती.

तथापि त्यावेळी निवडणूक आयोगाची देहबोली सकारात्मक नव्हती असेही विरोधी नेत्यांनी म्हटले होते. तर भाजपाने विरोधक पराभवाच्या भीतीने या सर्व गोष्टी करीत असल्याची टीका केली होती.