व्यावसायिक अभ्यासक्रमात बदल करणार

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

व्यावसायिक शिक्षण घेणार्‍या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल घडवून आणण्यात येणार असल्याची माहिती काल शिक्षणमंत्री ह्या नात्याने बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्यासाठी कालबाह्य झालेले व्यावसायिक अभ्यासक्रम रद्द करून नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उच्च शिक्षण संचालनालय, कारागिर प्रशिक्षण व कौशल्य विकास ही तिन्ही खाती एकत्र येऊन व्यावसायिक अभ्यासक्रमात आवश्यक ते नव बदल घडवून आणणार असल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली.

प्रश्‍नोत्तरांच्या तासाला आमदार प्रवीण झांट्ये यांनी यासंबंधीचा प्रश्‍न उपस्थित केला होता.
अकरावी व बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांना जर चांगले व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले तर त्यांना रोजगार प्राप्त होऊ शकतो. मात्र, गोव्यात ह्या विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त होऊ शकतील असे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याचे झांट्ये यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री सावंत यांनी दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी चांगली मागणी असलेले नवव्यावसायिक अभ्यासक्रम पुढील वर्षापासून सुरू करण्यात येणार आहेत असे सावंत यांनी सांगितले.
यावेळी विरोधी नेते दिगंबर कामत यांनी एखाद्या मुलाची आवड काय आहे. त्याला कशात रुची आहे. हे जाणून घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.