ब्रेकिंग न्यूज़
व्यसनमुक्ती आठवडा

व्यसनमुक्ती आठवडा

देशात सध्या व्यसनमुक्ती आठवडा साजरा केला जात आहे. या दिवसाचा उद्देश म्हणजे व्यसनमुक्त देश घडविणे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे नेहमी संदेश दिले आहेत. अंमलीपदार्थ समाजाकरिता अत्यंत घातक विष आहे. कारण व्यसन फक्त मानवालाच नाही तर संपूर्ण समाजाला पोकळ करते. आजच्या या वेळेत मानव भरकटत चाललाय. आपल्या लक्ष्याला जलद गतीने प्राप्त करण्याकरिता आडमार्गाचा वापर व अस्थिर मन वाईट मार्गाने जायला भाग पाडते. मानव आपल्या परंपरा, प्रथा, कर्तव्य व संस्कारांपासून दूर होऊन आधुनिकतेच्या आंधळ्या मार्गावर भरटकत चाललाय.. पहिल्यांदा व्यसन अति उत्साहात, दबावाखाली, खूप ताणतणावात, जिज्ञासेपोटी, मित्रांसोबत, उत्सवांमधे, आधुनिकतेच्या दिखाव्यात व इतर मार्गे अंमली पदार्थांचे सेवन करतो. अंमली पदार्थांचे व्यसन पुष्कळ प्रकारचे आहे. जसे ड्रग्स, तंबाखू, अल्कोहोल, चरस, गांजा, अफीम, वॉइटनर, ज्वलनशील पदार्थ सुंगणे व इतर. व्यसन करण्याची काही वेगवेगळी कारणे अशी आहेत. बेरोजगारी, निराशा, जीवनातील संघर्ष, ताणतणाव, रिकामा वेळ, नवा अनुभव, नैराश्य, खोटा दिखावा, फॅशन, संबंधामधे कटुता, घरगुती भांडण, एकटेपणा, अज्ञानता, वाईट शेजार, शारीरिक व मानसिक आजार, अपयश, आर्थिक अडचण, कामाचा थकवा, खोटे भ्रम आणि व्यसनी लोकांच्या संगतीमुळे मानव आपल्या आतील वाईट गुणांना जोपासतो. समोर जाऊन याच वाईट गोष्टी नशेकडे वळवतात. पण आजकाल आनंदाच्या क्षणी जसे वाढदिवस, लग्न, कोणत्याही सणा-सुदीचा दिवस, सहल, पार्टीच्या नावाखाली नशा केली जाते.
आपल्या समाजात नशासारखे वाईट विष सहजपणे उपलब्ध होते… हीच खूप मोठी चिंतेची बाब आहे. समोर चालून हे व्यसन केव्हा माणसाच्या जीवनातील एक भाग बनतो हे कळतसुद्धा नाही आणि मनुष्य व्यसनाच्या आहारी जातो. व्यसनाद्वारे शारिरीक व मानसिक दुष्परिणाम होतात. शारीरिक गंभीर परिणामात व्यक्तींची कार्यक्षमता कमी होते. भूक कमी, लवकर थकवा, हात-पाय थरथरणे, गुंगी येणे, जीव घाबरणे, शारीरिक अशक्तपणा, आतील शारीरिक अंगामध्ये पोकळपणा, शरीरावर नियंत्रणाचा अभाव आदी. यकृत, डोके, जठर, हाड, रक्तघटक, गर्भ व गर्भवती माताला क्षती पोहोचवितात. एवढेच नव्हे तर ते क्षयरोग, डोकेदुखी, अंगदुखी, नेत्रदोष, पक्षाघात, हृदयरोग, विकलांगता, कर्करोग, शरीर कोमात जाणे, शारीरिक विकृती, अन्य गंभीर आजार आणि मृत्यू होतो. नशेमुळे मेंदूच्या कामात अडथळा निर्माण होता. अकार्यक्षमपणा, संवेदनात आकलनशक्ती व स्मृतीमध्ये कमजोरी, विचार व कार्यात असमानता, विभिन्न भ्रम निर्माण होणे, बडबडणे, बोलतांना अडखळणे, मनावर नियंत्रणाचा अभाव, चिडचीडेपणा, वाईट विचारांचा मनावर ताबा होणे, आत्महत्येचे विचार येणे, अपराधाकरिता मन प्रवृत्त होणे, वेडेपणा आणि मानसिक विकृत्तीसारखे गंभीर दुष्परिणाम होतात.
व्यक्तिगत आणि सामाजिक ताटातूट होते. क्षणिक, खोट्या आनंदाच्या आहारी जाऊन नशेने माणूस शारीरिक व मानसिक रूपाने कमजोर होतो, घरचे लोकं व्यसनी व्यक्तीला सांभाळण्यात असमर्थ होतात. परिवारात संस्कारांची कमी येते, अनैतिक आचरण निर्माण होते, परिवार, नातेवाईक व समाजाद्वारे व्यसनींचा तिरस्कार केला जातो, व्यसनींना हीन भावनेने पाहतात, व्यसनींच्या घरात नेहमी भांडणं होतात. यामुळे पूर्ण समाज प्रभावित होतो. नशेमुळे समाजात घरे तुटतात. आत्महत्या, गरिबी, बेकारी, भिक्षावृत्ती, वेश्यावृत्ती, वाहनांनी अपघात, मृत्यूदरवाढ व अपराधात विशेष रूपाने मोठ्या प्रमाणात वाढ होते. अशाप्रकारे आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक मूल्यांचा नाश होतो. व्यसनी माणूस नशेच्या सवयीमुळे एक चांगला नागरिक, पालकदाता, संरक्षक, मार्गदर्शक, जबाबदार, नियंत्रकाची योग्य भूमिका कधीच पार पाडू शकत नाही. समाजात गुन्ह्यांचा आलेख खूप वेगाने वाढतोय आणि ५० टक्के गुन्हे नशेमध्ये किंवा नशेकरिता केले जातात. नशा समाजात एक विष म्हणूनच काम करते. भेसळ, नकली दारू यामुळे मृतांच्या संख्येतही निरंतर वाढ होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीप्रमाणे मागील दहा वर्षात दारूचा खप दुप्पट झालाय आणि भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये ३० लाख लोकांचा मृत्यू अल्कोहोलमुळे झाला.
व्यसनी व्यक्तीचे स्वनियंत्रण, दृढनिश्‍चय आणि सोबत मदत समूह हे सर्वात चांगले नियंत्रण आहे. नशेपासून दूर राहणे, तपासणी करणे, नियमांचे पालन करणे, डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलावे, मनात येणार्‍या प्रश्नांचे तज्ज्ञांद्वारे निराकरण करणे, एकटे न राहणे, दुसर्‍यांसमोर आपले मन मोकळे करावे, शक्य असेल तर नेहमी परिवारासोबतच रहावे. व्यसनावर आतापर्यंत केलेले खर्च आणि त्याद्वारे झालेले शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक नुकसान या गोष्टींवर एकदा मूल्यांकन करून पाहावे.
आपल्या स्वत:ची काळजी घेणे, निर्व्यसनी लोकांच्या संपर्कात येणे, ध्यानसाधना करणे, आपले खेळ जोपासायला शिकणे, ताणतणावाला स्वस्थ मार्गाने सोडवणे याची निरंतर तपासणी करीत राहावी. विशेष म्हणजे पालकांनी आपल्या मुलांसोबत एका मित्राप्रमाणे व्यवहार करावा, त्यावर नियंत्रण ठेवावे, लहानपणापासूनच मुलांना चांगल्या-वाईट गोष्टींची समज द्यावी व आपली मुले कशाप्रकारच्या मित्रांसोबत वावरतात याची जाणीव ठेवावी, चांगले संस्कार व योग्य वातावरण निर्माण करून देणे. जेव्हा केव्हा व्यसनाची इच्छा होईल तेव्हा आपल्या परिवारातील लोकांना, त्याच्या आनंदाची, आपल्या कर्तव्याची, जबाबदारीची, जे लक्ष्य पूर्ण करायचे आहे त्याची आठवण करायची. व्यसनापासून मुक्ततेकरिता प्रेरित करणारे व्यक्ती, समूह, मित्रमंळडी, पुस्तकांचे वाचन-लेखनाच्या संपर्कात रहावे व स्वत:ला निरोगी ठेवावे. आणि आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवावी.
व्यसनापासून मुक्ततेकरिता प्रशासकीय व खासगी हॉस्पिटल, पुनर्वसन केंद्राद्वारे व्यसनाधीन व्यक्तींवर शारीरिक आणि मानसिक उपचार केले जातात. संयुक्त राष्ट्र संघ, सरकार आणि पुष्कळशा स्वयंसेवी संस्था विविध स्तरावर व्यसनमुक्ती सप्ताह, व्यसनमुक्ती दिवस, अंमलीपदार्थ निषेध दिवस, कार्यक्रम, चर्चासत्रे, पथनाट्ये, चित्र प्रदर्शने, चळवळ, लेखनाद्वारे समाजात नशेच्या विरोधात जनजागृती आणली जाते.. आता ही मानवाची जबाबदारी आहे की त्यांनी कोणते जीवन निवडावे म्हणजे नरक यातना देणारे घाणेरडे व्यसनी जीवन की स्वस्थ, सुखी, आनंदी जीवन यापैकी एक निवडावे.