व्यवस्थापन पुराण

  •  दत्ताराम प्रभू-साळगावकर

व्यवस्थापन करण्यासाठी जाडे-जाडे ग्रंथ वाचायची गरज नाही किंवा डिग्री मिळवायची पण! थोडं डोकं वापरून गोष्टी साध्य होतात, फक्त इच्छा हवी व मार्ग शोघावा!

 

कुठलंही ऑफिस समर्थपणे चालवणं कठीण किंवा जिकिरीचं नसलं तरी सोपं व सरळही नसतं. आपले कर्मचारी, आपल्याशी व्यवहार असणारे लोक या सगळ्यांत ताळमेळ राखावा लागतो. सर्वजण काही सारखे नसतात. आपल्या हाताची बोटं सारखी नसतात तसंच काहीसं! वाचाळ, बेफिकीर, शीघ्रकोपी, अतिशहाणे असे नानाप्रकारचे लोक असतात. सर्वांनाच बरोबर घेऊन जावं लागतं. जो यात यशस्वी होतो तो चांगला प्रशासक किंवा मॅनेजर ठरतो! चांगल्या गुणांचं कौतुक, कदर करावी लागते व वाईटावर मात. सांगावं, शिकवावं लागतं. समजून घ्यावं तसंच समजून द्यावं लागतं. आपण क्लार्क असलो व प्रमोशन मिळून ऑफिसर झालो तर कामाची पद्धतच बदलून जाते. पूर्वी आपण आपल्याला वाटून दिलेलं व कधीकाळी वरिष्ठांनी दिलेलं अतिरिक्त काम करत असतो. ऑफिसर झाल्यावर आपल्या हाताखालच्यांकडून काम करून घ्यावं लागतं. करणं आणि करून घेणं यातील आमूलाग्र बदलाला पात्र ठरावं लागतं. कुठल्याही कामात प्रत्येकजण वाकबगार असतोच असं नाही. अशावेळी चुकणार्‍याला त्याची चूक दाखवून त्यात सुधारणा करून घ्यावी लागते. प्रसंगी कुठलंही काम करायची आपली तयारी लागतेच! कारण आपण व्यवस्थापनाचा भाग किंवा हिस्सा बनलेलो असतो! त्यात कमी पडलो तर आपल्या हाताखालचे लोक आपल्यातलं ‘पाणी’ ओळखतात व जणू आपल्यावर एक प्रकारची हुकूमत गाजवतात! कामाची माहिती नाही, असलं काम कधीच केलं नाही, कोणी शिकवलं नाही असंही सांगणारे भेटतात.

आपल्याकडून चूक झाली तर आपण जबाबदार राहणार नाही, ती तुमची जबाबदारी एवढं सांगण्यापर्यंत काहींची मजल जाते. अशा लोकांना कामासाठी प्रवृत्त करणे, शिकवणे, त्यांची भीती दूर करून त्यांना आश्‍वस्त करणे असले एकदा-एकदाच नव्हे, चार-चारदा करावे लागते. यासाठी आपण त्यांची ‘फ्रेंड ऍण्ड गाईड’ अशी वृत्ती जोपासावी लागते. निर्णय घेताना सारासार विचार करावा लागतो. कारण काही विपरित घडलं तर अंगावर येऊ शकतं व ते निस्तरावून त्याच्यातून मार्ग काढावा लागतो.

माझे एक मॅनेजर होते. कामाचं ज्ञान जेमतेम व निर्णय घेण्यात कमी किंवा कसूर. त्यांचा लोकसंग्रह मात्र बर्‍यापैकी, त्यामुळे आमची व्यवसायवृद्धी जरूर व्हायची व झालीही! एक दिवस ऑफिसमध्ये काही वेगळं प्रकरण झालं. लगेच नाही पण काही कालांतराने प्रत्ययास आलं. जेव्हा ते प्रत्ययास आलं व शहानिशा करण्याची पाळी आली तेव्हा मॅनेजरांना अंधुकशी आठवण झाली की त्यावेळी ते रजेवर असावेत. खात्री करण्यासाठी त्यांनी ऍटेन्डन्स रजिस्टर मागून घेतलं व म्हणाले, ‘‘हां, मी त्यावेळी नव्हतो; रजेवर होतो!’’ त्यानी जणू सुस्कारा सोडला. हे माझ्यासमोर, माझ्या उपस्थितीत घडलं व माझी सटकली. मी त्यांना स्पष्ट बजावलं,
‘‘मी त्यावेळी नव्हतो, रजेवर होतो असं म्हणून स्वतःची सुटका करून नामानिराळे राहणे योग्य नाही. तुम्ही मॅनेजर म्हणून सामूहिक जबाबदारीचा हिस्सा आहात. कोणी लबाडीनं, हेतुपुरस्सर काही केलं असेल तर त्याला परिणाम भोगावेच लागतील, नव्हे त्याला ते भोगलेच पाहिजेत, सुटका नाही. पण अनभिज्ञपणे, अनावधानाने जर काही घडलं असेल तर त्यातून योग्य मार्ग काढणे व सुटका करण्याचा प्रयत्न करणे हे व्यवस्थापकाचं कर्तव्य ठरतं. तुमच्याकडूनही अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतील. पण आपल्यावरून झटकून टाकण्याची आपली वृृत्ती असेल तर अशावेळी तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही. सामूहिक जबाबदारीची जाणीव बाळगून आपण उपाय शोधण्याचा किमान प्रयत्न करू व असल्या गोष्टीची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत काळजी घेऊ.’’
माझी ग्रेड माझ्या त्या मॅनेजरांच्या ग्रेडपेक्षा कमी होती, पण मीही व्यवस्थापनातला एक हिस्सा होतो. सबब माझं हे त्यांना ऐकवणं माझ्यामते अपरिहार्य असंच होतं. त्यांना ते रूचेल, पचेल याची पर्वा मी केली नाही. ‘लहान तोंडी मोठा घास’ असं काहीसं असलं तरी किंवा त्यांना वाटलं तरी! माझ्या त्यांच्याविषयीच्या मागील अनुभवावरून पुष्कळ दिवस त्याना काही सुनवायची माझी इच्छा होती व मला ती संधी आज मिळाली… परिणामांची पर्वा न करता मी ती साधून घेतली! व्यवस्थापनाचाच भाग व कर्तव्य म्हणून!

त्याच व्यवस्थापकांविषयी मला आणखीही एक अनुभव आला होता, असेल थोडासा वेगळा! आमचं ऑफिस असलेल्या परिसरात विशेषकरून एप्रिल-मे महिन्यात वीज व पाणी यांचा प्रॉब्लेम असायचा. दोन्हीही मध्येच गूल व्हायची. ऑफिस बंद करतेवेळी लाईट नसेल तर मेन स्वीच बंद करायचा राहून जायचा. परिणामी लाईट आल्यावर रात्री सर्व दिवे व फॅन रात्रभर चालू राहायचे. नळाला पाणी नसेल तर पाण्यासाठी चालू केलेले नळ तसेच राहायचे. परिणामी ते आल्यावर ऑफिसभर पाणी भरायचं व दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसच्या सफाईसाठी येणार्‍या बाईचं- जी थोडी वयस्क होती- कंबरडं मोडायचं! असं बर्‍याच वेळा व्हायचं व त्यावर उपाय कोणी करत नव्हता. मी व्यवस्थापकाना सजेशन दिली की रोज ऑफिस बंद करताना लाईटचा मेन स्वीच व पाण्याचे सर्व नळ बंद आहेत याची शहानिशा करण्याचं काम कोणावर तरी संपवा व त्यात हलगर्जीपणा झाला तर त्याला जबाबदार धरा. अहो आश्‍चर्यम्! माझ्या सजेशनचा परिणाम असा झाला की ती माळ मी माझ्याच गळ्यात घालून घेतली! अर्थात मी ती स्वीकारलीही. मी कार्डबोर्डवर इंग्रजी अक्षरात ‘टी.ए.एल.एल.’ असा बोर्ड बनवला व तो ऑफिस बंद करतेवेळी कोणालाही दिसेल अशा ठळक जागी लावला. ‘टी’ म्हणजे टॅप (नळ), ए म्हणजे अलार्म, पहिला एल म्हणजे लाईट (वीज मेन स्वीच), दुसरा एल म्हणजे लॉक्स (सर्व कुलुपे). पाणी व लाईट यांबरोबर रात्रीचा अलार्म व ऑफिसची सर्व कुलुपे यांचा पण मी अंतर्भाव केला, कारण न जाणो त्याबाबत पण कधीतरी हलगर्जीपणा होऊ शकतो. कोणी सांगावं? मी तो बोर्ड लावल्या दिवसापासून त्याची काटेकोर शहानिशा करत होतो. पण थोडे विघ्नसंतोषी लोक टी.ए.एल.एल. म्हणजे टॉल, टॉल म्हणून माझी (कु)चेष्टा करू लागले. पण मी बधलो नाही, ते निमूट सहन करत राहिलो. परिणाम असा की, दीड-दोन महिने पाणी किंवा लाईट रात्री चालू राहायचा प्रकार बिल्कुल बंद झाला. मला वाटलं, माझ्या सजेशनचा चांगला उपयोग झाला व आता सुरळीत होईल!

एक दिवसच मी रजेवर होतो तर त्या रात्री ऑफिसमध्ये फॅन व लाईट्‌स चालू! यातला अतिशय चांगला भाग म्हणजे ही गोष्ट दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिस उघडताना त्या व्यवस्थापकानीच सर्वप्रथम पाहिली. ज्याने आदल्या दिवशी ऑफिस बंद केले होते त्याला त्यानी त्याबद्दल जाब विचारला.

‘‘काल ऑफिस बंद करताना लाईट नव्हती म्हणून मेन स्वीच बंद करायचा राहून गेला,’’ असं उत्तर मिळालं! हे संभाषण चालू असताना मी तिकडे हजर झालो. विचारलं,
‘‘काय झालं? लाईट व फॅन रात्रभर चालू राहिले का? पण कसे?’’
‘‘काय बोलू?’’ उद्वेगाने मॅनेजर उत्तरले.
‘‘बोला… काहीतरी बोलाच! एवढे दिवस ‘टॉल’ ‘टॉल’ म्हणून मला हिणवणार्‍यांना तरी त्या बोर्डला नाक घासायला लावा!’’ व्यवस्थापक निमूट पडले. मठ्ठ झाले.
व्यवस्थापन करण्यासाठी जाडे-जाडे ग्रंथ वाचायची गरज नाही किंवा डिग्री मिळवायची पण! थोडं डोकं वापरून गोष्टी साध्य होतात, फक्त इच्छा हवी व मार्ग शोघावा! म्हणतात ना…
‘इच्छा असेल तर मार्ग सापडेल!!’