ब्रेकिंग न्यूज़

वेस्ली, स्नेहाला दुहेरी किताब

पणजी (क्री. प्र.)
क्लब टेनिस दी गास्पर डायस टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेेत वेस्ली रोझारियो याने पुरुष व कनिष्ठ गटाचे विजेतेपद पटकावत दुहेरी किताब मिळविला. स्नेहा राणे हिने उपकनिष्ठ व कनिष्ठ गटात बाजी मारत शानदार कामगिरी केली. सृकृती दासने महिला एकेरीचे जेतेपद आपल्या नावे केले.
गोवा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष व्हेरो नुनीस, उपाध्यक्ष विष्णू कोलवाळकर, क्लब गास्पर डायसचे सचिव सुनील नाईक, संयुक्त सचिव एडविन मिनेझिस यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विविध गटांमधील विजेत्यांना रोख रुपये ४३०० हजार देण्यात आले.
वेस्ली दो रोझारियोने मुलांच्या कनिष्ठ गटात नागेश वेर्णेकर याच्यावर ३-० (११-७,११-६,११-३) अशी मात केली. वेस्ली दो रोझारियोने धीरज राय याला ४-१ (११-७,११-६,११-९,८-११,११-८) असे हरवून पुरुष गटातल्या विजेतेपदाचा बहुमान पटकावला. या दोघांनी उत्तम प्रदर्शन करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
स्नेहा राणेने उपकनिष्ठ गटात सिमरन कुबलवर ११-४,११-४, ११-१ असा विजय मिळवला तर कनिष्ठ गटात पृथा पर्रीकरला ३-२ (११-९,११-५,६-११,४-११,११-६) हरवत विजेतेपद पटकावले. ऍरन फारियास याने कॅडेट मुलांच्या गटात अक्षन लवंदे याला ३-० (११-८, ११-३,११-९) असे हरवले. मुलींच्या कॅडेट गटात सिमरन कुबलने तृषा हमन्नवर हिचा ३-२ (७-११, ११-८, ९-११,१३-११,११-६) असा पराभव केला. उपकनिष्ठ गटात अंशुमन अगरवालने नागेश वेर्णेकरला ३-२ (११-५,११-४,९-११,९-११,११-८) असे नमवले. सुकृती दासने महिलांच्या गटात मलिका गोगोई हिला १२-१०,८-११,११-२ असा धक्का दिला.
४० वर्षांवरील ज्येष्ठ एकेरीमध्ये अमित नाईक यांने सचिन सुआरेझ यांना ३-१ (९-११,११-४,११-६,११-६) असे हरवले. ५० वर्षांवरील ज्येष्ठ एकेरीमध्ये दीपक गोपामी याने अरुण नाईक याला ३-२ (५-११,११-६, ११-६,५-११,१३-११) असे नमवले. ६० वर्षांवरील ज्येष्ठ एकेरीमध्ये अँथनी गोम्सने प्रकाश आल्फान्सो याला ३-० (११-३,११-७,११-९) असे पराजित केले.