वेस्ट इंडीज संघ इंग्लंडमध्ये दाखल

कर्णधार जेसन होल्डर याच्या नेतृत्वाखाली तीन कसोटी सामन्यांची ऐतिहासिक मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा संघ काल मंगळवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला. विंडीजमध्ये करण्यात आलेल्या खेळाडूंच्या व साहाय्यक पथकाच्या चाचणीत सर्वजण निगेटिव्ह असल्याचे आढळून आले होते. सोमवारी दोन वेगवेगळ्या विमानांतून कॅरेबियन बेटांवरील सर्व खेळाडूंना एकत्र करण्यात आले. यानंतर खासगी चार्टरमधून सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले.

‘क्रिकेटसाठी आम्ही उचलेले हे सर्वांत मोठे पाऊल आहे,’ असे होल्डर याने इंग्लंडमध्ये दाखल होताच सांगितले. विंडीजने इंग्लंड दौर्‍यावर येण्याचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने त्यांचे आभार मानले होते. इंग्लंड क्रिकेट संघ व संपूर्ण देश विंडीजचे हे योगदान कधीच विसरणार नसल्याचे त्याने म्हटले होते.

मँचेस्टर येथे वेस्ट इंडीजचा संघ पोचल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्याआधी त्यांची कोरोना चाचणी देखील होईल. त्यानंतर सात आठवड्यांच्या या दौर्‍याला सुरुवात होईल. या दौर्‍यात खेळाडूंना सरकारी दिशानिर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे.
या मालिकेतील तीन कसोटी सामने एकवीस दिवसांच्या आत खुल्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. पहिला कसोटी सामना ८ जुलै रोजी साऊथम्पटन येथे खेळवला जाईल. दुसरा कसोटी सामना १६ ते २० जुलै आणि तिसरा कसोटी सामना २४ ते २८ जुलै दरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. खेळाडूंसाठी येथे सुरक्षित वातावरण असल्याने सामन्यांसाठी ही मैदाने निवडण्यात आली आहे. वास्तविक पाहता वेस्ट इंडीजचा हा दौरा मे आणि जूनच्या दरम्यान होणार होता, पण कोरोना विषाणूंच्या महामारीमुळे हा दौरा रद्द स्थगित करण्यात आला होता.