वेर्ले-सांगेत ४०० सुपारी झाडांची कत्तल

वेर्ले-सांगेत ४०० सुपारी झाडांची कत्तल

>> लागवड करणार्‍या ग्रामस्थांची वन खात्याविरुद्ध तक्रार ः अधिकार्‍यांकडून आज पाहणी

नेत्रावळी सांगे अभयारण्य क्षेत्रातील वेर्ले गावात गावकर्‍यांनी लागवड केलेल्या सुपारी झाडांपैकी ४०० झाडांची कत्तल अभयारण्य वनरक्षकांनी केल्याची रितसर तक्रार सांगे पोलीस स्टेशन, सांगे उपजिल्हाधिकारी, सांगे मामलेदार, आमदार व नेत्रावळी ग्रामपंचायतीला सादर केली. या प्रकारामुळे वन खात्याविरुद्ध संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी वेर्लेवासियांची बैठक घेवून सविस्तर माहिती जाणून घेतली व आज दि. २१ रोजी सकाळी ११.३० वा. वेर्लेवासीय, वनखाते व पोलीस अधिकार्‍यांसमक्ष घटनेची पाहणी करणार असल्याचे काल झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. वनखात्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करणारे प्रकाश गावकर, खुशाली गावकर, प्रभाकर म्हागळो गावकर, रोहिदास रामा गावकर यांच्या म्हणण्यानुसार शनिवार दि. १८ मे रोजी वनखात्याच्या दोघा वनरक्षकांनी दिवसभरात लहान मोठ्या मिळून चारशे सुपारी झाडांची कत्तल केली. वरील तक्रारदारांपैकी प्रकाश गावकर हा संध्याकाळच्या वेळेस आपल्या बागायतीमध्ये जात असताना मुख्य रस्त्यावरच दुचाकी घेवून दोन वन रक्षक पूर्ण गणवेशात आपल्याला दिसले. पण काही बोलण्याआधीच ते निघून गेले व त्यानंतर बागायतीत जावून पाहतो तर सर्वत्र सुपारी झाडांची नासधूस केल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर ही घटना गावात जाऊन सांगितली. घडलेला प्रकार पाहून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

सदर बागायत सर्व्हे क्र. ३४/१ मध्ये समाविष्ट आहे. याच जमिनीत सुपारी झाडांची लागवड करण्यात आली आहे. वनखात्याच्या दाव्याप्रमाणे सदर जमीन अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट होत आहे. पण गोवा प्रशासनाने नेत्रावळी अभयारण्य घोषित केले त्यावेळी सरकारनेच अहवाल सादर करण्यासाठी माजाळकर समितीची नेमणूक केली होती. त्या समितीनेही सदर क्षेत्र नेत्रावळी अभयारण्य क्षेत्र परिघात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय सर्व्हे क्र. ३४/१ महसुली गाव वेर्ले, तुडव, साळजीणी, कुणगे, बिलचे हे क्षेत्राची मालकी हक्कासाठी मे. तिंबलो लिमिटेड आणि ग्रामस्था यांच्यात न्यायालयात वाद सुरू आहे. असे असतानाही लागवड केलेली सुपारीची झाडे वनखात्याने नष्ट करणे ही घृणास्पद घटना असल्याने उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांच्या निदर्शनास वेर्लेवासियांनी आणून दिले.

उपजिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल वेर्लेवासियांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रकाश गावकर यांची २०० झाडे, कुशाली गावकर यांची १५० झाडे, प्रभाकर गावकर यांची २५ तर रोहिदास गावकर यांची ६० सुपारी झाडांची नासधूस झाली आहे.
सरकारने वेळीच या प्रकरणात लक्ष न घातल्यास भविष्यात विपरीत घटना घडल्यास त्याला वनखातेच जबाबदार राहणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.