वेर्ले पोफळी कत्तलप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आदेश

वेर्ले पोफळी कत्तलप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून चौकशी आदेश

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेर्ले – सांगे येथील नागरिकांच्या बागायतीच्या नासधूस प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पर्वरी येथे एका उच्चस्तरीय बैठकीत या बागायत नासधूस प्रकरणाचा आढावा घेतला असून पोलीस खात्याकडून चौकशीचा आदेश काल दिला.

या उच्चस्तरीय बैठकीला स्थानिक आमदार प्रसाद गावकर, मुख्य सचिव परिमल रॉय, माजी मंत्री रमेश तवडकर, मुख्य वनपाल आणि शेतकरी यांची उपस्थिती होती.
वेर्ले सांगे वनक्षेत्रात राहणार्‍या लोकांच्या बागायतीतील सुमारे ४०० पोफळीची झाडे कापून टाकण्यात आली आहेत. सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी वेर्ले गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे. वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी बागायतीचे नुकसान केल्याची शेतकर्‍याची तक्रार आहे.

वेर्ले गावातील शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देऊन याप्रकरणी लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी या प्रकरणी शेतकर्‍यांना योग्य न्याय देण्याचे आश्‍वासन दिले.