वेणुगोपाळ राव निवृत्त

भारताचा माजी फलंदाज व आंध्र प्रदेशचा कर्णधार वेणुगोपाळ राव याने काल मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारताकडून १६ एकदिवसीय सामने तसेच ६५ आयपीएल सामने खेळलेल्या वाय. वेणुगोपाळ राव याने निवृत्ती जाहीर केल्याचे आंध्र प्रदेश क्रिकेट संघटनेने पत्रक जारी करत सांगितले. विशाखापट्टणमच्या ३७ वर्षीय वेणुगोपाळला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या संधीचा अपेक्षित लाभ उठवता आला नाही. ११ डावात एका अर्धशतकासह केवळ २१८ धावा त्याच्या खात्यात जमा आहेत. ३० जून २००५ रोजी दाम्बुला येथे श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केल्यानंतर २३ मे २००६ रोजी वेस्ट इंडीजविरुद्ध बासेटरे येथे तो आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. रावने १२१ प्रथमश्रेणी सामन्यात ७,०८१ धावा केल्या आहेत. यात १७ शतके व ३० अर्धशतकांचा समावेश आहे. २००८-२०१४ या कालावधीत आयपीएलमध्ये त्याने डेक्कन चार्जर्स तसेच सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्वदेखील केले आहे.