ब्रेकिंग न्यूज़
वेंडेल रॉड्रिक्स यांचे निधन

वेंडेल रॉड्रिक्स यांचे निधन

>> जागतिक कीर्तीचे गोमंतकीय फॅशन डिझायनर

>> कोलवाळ येथील राहत्या घरी घेतला अंतिम श्वास

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर, पर्यावरणवादी आणि समलैंगिकचळवळीचे समर्थक सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स (५९) यांचे काल बुधवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास कोलवाळ येथील निवासस्थानी अकाली व आकस्मिक निधन झाले. वेंडेल यांच्या निधनाचे वृत्त वार्‍यासारखे पसरले आणि त्यांच्या देशविदेशातील चाहत्यांवर शोककळा पसरली. वेंडेल यांंच्या पार्थिवावर १३ फेब्रुवारीला संध्याकाळी ३.३० वाजता कोलवाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

वेंडेल याचे जागतिक फॅशन व कलाक्षेत्रात मोठे योगदान होते. गोव्याची कीर्ती देशविदेशांत पोहोचवणार्‍या वेंडेल यांचे गेली सव्वीस वर्षे गोव्यात वास्तव्य होते. आपल्या स्वतःच्या ‘वेंडेल रॉड्रिक्स’ या ब्रँडखाली त्यांनी वस्त्रप्रावरणांच्या नानाविध मालिका बाजारात उतरवल्या होत्या, ज्या देश विदेशात प्रचंड लोकप्रिय ठरल्या.

मुंबईत जन्म
वेंडेल रॉड्रिक्स यांचा जन्म मुंबईत एका गोमंतकीय ख्रिस्ती कुटुंबात २८ मे १९६० रोजी झाला. त्यांचे बालपण व शिक्षण मुंबईत माहीम येथे झाले. त्यांनी हॉटेल व्यवस्थापनक्षेत्रातून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु पुढे मस्कतमध्ये वास्तव्यास असताना ते फॅशन डिझायनिंगकडे वळले. लॉस एंजेलिस आणि पॅरिसमध्ये जाऊन त्यांनी फॅशनचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला.

आघाडीच्या ब्रँडस्‌सह काम
प्रशिक्षित होऊन भारतात परतल्यावर त्यांनी लॅक्मे, गार्डन वरेली आदी आघाडीच्या ब्रँडस् समवेत फॅशन डिझायनिंगचे काम केले. त्यानंतर त्यांनी आपल्या मायभूमीत, गोव्यात वास्तव्य करणे पसंत केले व येथूनच आपला व्यवसाय भरभराटीला नेला.

२०१० साली त्यांनी गोव्याच्या पारंपरिक कुणबी साडीला नवी ओळख मिळवून दिली. वेंडेल यांच्या विविध वस्त्रप्रावरणांपैकी रिसॉर्ट वेअर तसेच पर्यावरणपूरक पेहरावाच्या प्रसारासाठी ते प्रसिद्ध होते. भारतीय खादीला लोकप्रियता मिळवण्यासाठी देखील त्यांनी योगदान दिले. २०११ मध्ये जर्मनीतील न्युरेमबर्ग येथे जगातील सर्वांत मोठी सेंद्रिय वस्त्रप्रावरणांची जत्रा मानल्या गेलेल्या बायोङ्गेच येथेही त्याला आमंत्रित करण्यात आले होते.

पद्मश्रीने सन्मान
वेंडेल याच्या फॅशन क्षेत्रातील योगदानाची व सामाजिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने २०१४ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला.

२०१७ मध्ये लॅक्मे फॅशन वीकमध्ये त्यांनी प्लस-साइज महिलांसाठी वस्त्रसंग्रह सादर केला होता. २०१६ च्या सरेंडिपिटी कला महोत्सवात वेंडेल यांनी गोमंतकीय वेशभूषेचे सविस्तर सादरीकरण केले होते.

लेखनाची आवड
वेंडेल यांना फॅशन डिझानिंगबरोबरच कला, साहित्य, संगीत यांचीही आवड होती. ‘द ग्रीम रूम’ हे आत्मचरित्र) आणि ‘मोडा गोवा – हिस्ट्री ऍण्ड स्टाईल (गोवन फॅशन)’ ही त्यांची दोन पुस्तके २०१२ मध्ये प्रसिध्द झाली. २०१७ मध्ये पोस्के ः गोवन इन द शॅडोस हे पुस्तक त्यांच्या हस्ते प्रकाशित झाले. वेंडेल यांनी गोव्यातील नियतकालिकांमधून पर्यावरण, तसेच सामाजिक विषयांवर विपुल लेखनही केले. २००३ मध्ये ‘बूम’ चित्रपटात त्यांनी एक छोटीशी भूमिका साकारली. २००८ मध्ये फॅशन चित्रपटातही त्याची विशेष भूमिका होती.
वेंडेल यांनी आपल्या जेरॉम मॅरेल या फ्रेंच मित्राशी पॅरीसमध्ये समलिंगी विवाह केला होता. समलिंगींच्या हक्कासाठी ते आवाज उठवत असत. गोव्याच्या पर्यावरणविषयक प्रश्नांवरही ते सक्रिय होेते.

एक स्वप्न अधुरेच राहिले…
तीन दिवसांपूर्वीच वेंडेल यांनी इन्स्टाग्रामवर मॉडा गोवा म्युझियम या पारंपरिक गोमंतकीय वस्त्रप्रावरण संग्रहालयाचे काम आपण करीत असून तो देशातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प ठरेल, असे म्हटले होते. हा प्रकल्प कोलवाळ येथील आपल्या ४५० वर्षापूर्वीच्या पारंपरिक गोमंतकीय व्हिलामध्ये साकारत असल्याचे त्यांनी म्हटले होते. या प्रकल्पाचे अंतिम प्लास्टरिंगचे काम सुरू असल्याचेही त्यांनी त्यात नमूद केले होते. मात्र, त्यांचे स्वप्न असलेला प्रकल्प पूर्ण होण्याआधीच त्यांचे निधन झाले आहे.

सुंदर क्षणांची आठवण ः मलायका अरोरा
बातमी ऐकून मी आधी खाली बसले आणि रडले. मग मी एकटीच बसून हसत राहिले, आम्ही एकत्र घालवलेल्या सुंदर सुंदर क्षणांची आठवण काढत.

सामाजिक कार्यात पुढाकार ः पूनम धिल्लन
वेंडेल हे केवळ प्रतिभावंत डिझायनरच नव्हते, तर नेहमीच चांगल्या कामासाठी ते पुढे असायचे. सामाजिक कार्यासाठीही त्यांनी वस्त्रप्रावरणे पुरवली आहेत हे मला ठाऊक आहे.

बातमी ऐकून धक्का बसला ः मुख्यमंत्री
वेंडेल रॉड्रिक्स यांच्या अकाली निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. वेंडेल यांनी फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात मौलिक कार्य केलेले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.

ही देशाची हानी ः दिगंबर
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी वेंडेल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. भारत देश हा एका उत्कृष्ट फॅशन डिझायनरला मुकला आहे, अशी प्रतिक्रिया कामत यांनी व्यक्त केली.

फॅशन कौन्सिलला दुःख
फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाने वेंडेल याच्या अकाली व आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. भारत देश एका आयकॉनिक डिझायनरला मुकला आहे, असे फॅशन डिझाईन कौन्सिलने म्हटले आहे.

अकाली निधनामुळे धक्का – स्मृती इराणी
वेंडेल ऱॉड्रिक्स यांच्या अकाली निधनामुळे धक्का बसला अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी व्यक्त केली आहे. वेंडेल हे देशातील एक नामवंत फॅशन डिझायनर होते, अशा शब्दांत त्यांनी त्यांचा गौरव केला, तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या.

एक स्वप्न अधुरे – ओनिर
माझे मित्र वेंडेल रॉड्रिक्स यांच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. एक स्वप्न असेला आपला संग्रहालय प्रकल्प सुरू करण्याआधीच तो हे जग सोडून गेला याचे खूप दुःख वाटते आहे, असे चित्रपट निर्माते ओनिर यांनी म्हटले आहे.