ब्रेकिंग न्यूज़

वृद्धाश्रमांची वाढती संख्या चिंताजनक!

म्हातारपण म्हणजे वृद्धावस्था, दुसरे बालपण असते, असे म्हटले जाते. या दोघांनाही सांभाळण्याचे उत्तरदायित्त्व महत्त्वाचे असते. त्यांना दोघांनाही सारखेच जपावे लागते. इथे महत्त्वाचे म्हणजे बालपणी मुलांना आईचा सहवास असतो. त्यामुळे रम्य ते बालपण, बालपणीचा काळ सुखाचा, अशा तर्‍हेने बालपणावर अनेक रचना रचलेल्या आहेत. मात्र वृद्धावस्थेवर अश्या उत्साहजनक रचना मोजक्याच असाव्यात. बदललेल्या भौतिक आणि सामाजिक स्थितीशी जुळवता न आल्याने अनेकांना ही वृद्धावस्था नकोशी वाटते.
बालपणात शरीराची वाढ होऊन हळूहळू मनाचाही विकास होतो, तर वृद्धावस्थेत शरीराबरोबर मनही दुर्बळ बनत जाते. ही प्रक्रिया नैसर्गिक असली तरी अनेकांना स्वीकारणे जड जाते. आपल्या समाजात सुरुवातीपासूनच मोठा गैरसमज आहे की, वयानुसार प्रकृती खालावत जाते. यात तथ्य असले तरी याला मुख्य कारण तारुण्यातल्या वाईट सवयी कारणीभूत असतात. मद्यपान, धुम्रपान, स्वैराचार या वाईट सवयींचे दुष्परिणाम वार्धक्यात समोर येतात. तसेच चुकीचा आहार, मानसिक तणाव, आरोग्याकडे दुर्लभ यामुळे पुढे अनेक विकार उद्भवतात. समतोल आहार, पुरेसा व्यायाम, मानसिक शांतता टीकवली तर वृद्धत्त्व सुखकर होऊ शकते. तसेच आपल्या समस्यांचा बाऊ न करता आपल्या शरीरांतर्गत एखादी संस्था स्थापून एकत्रित येऊन आपल्या अनेक तक्रारींचे निवारण करू शकतात.
बदलत्या काळानुसार मनुष्याच्या गरजा वाढल्या. सर्व साधना, सुविधांसाठी खूप पैसा हवा, त्यासाठी अधिक श्रम आणि अधिक वेळ आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या पिढीकडे वेळेची कमतरता आहे. म्हणून वृद्धांना सांभाळण्यासाठी वृद्धाश्रम अथवा त्यांच्यासाठी देखभाल करणारा माणूस (केअरटेकर) याची मागणी वाढत आहे. प्रचंड मागणीमुळे यांना व्यापारी आणि व्यावसायिक स्वरूप आले आहे. त्यामुळे यांचे अवाढव्य दर अनेकांना परवडत नाहीत. आज भारतासह विदेशातही ६० वर्षांहून अधिक वयस्कर व्यक्तींची संख्या वाढत आहे. एका अंदाजानुसार २०२५ सालापर्यंत अश्या व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. पाश्‍चिमात्य राष्ट्रात कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे. इथे घटस्फोटांचे प्रमाण वाढत असून आईवडीलांचे अनेक विवाह होतात. मुलांची आपल्या आई-वडीलांप्रती आत्मीयता नष्ट झाली आहे. वृद्धांचे उत्तरदायित्त्व सरकार आपल्यावर घेते. त्यासाठी परदेशात वृद्धाश्रमांची संकल्पना पुढे आली आणि आता भारतातही त्याचा मोठा विस्तार होत आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात कौटुंबिक बंधन अत्यंत दृढ असल्याने वृद्ध दांपत्य आपल्या मुलांबरोबर भावनात्मक आणि मानसिक बंधनामुळे राहतात. मात्र आता काळ बदलला. भौतिक परिवर्तनाबरोबर सामाजिक परिवर्तन हळूहळू होत असते. आज बहुतेक उच्चभ्रू समाजातील युवा पिढींचा सर्वाधिक ओढा परदेशात स्थायिक होण्याच्या दिशेने आहे. इथे आईवडील वृद्धाश्रमात अथवा घरी एकटे किंवा सोबतीला केअरटेकर माणूस. आज काही ठिकाणी मुले आपल्या आईवडिलांना पैशाने सर्व सुखसुविधा देण्यास तत्पर असली तरी त्यांना आपल्या सोबत ठेवण्याची मानसिकता नसते.
आज गावातील परंपरागत व्यवसाय, रोजगारांना महत्त्व राहिलेले नाही. त्यामुळे आजची मुले रोजगारासाठी शहराकडे पळतात. या बदलत्या कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीचा सर्वांत जास्त फटका वृद्ध मातापित्यांना बसतो. ज्यांना एकाहून अधिक मुले असतात ते मातापित्याचे उत्तरदायित्त्व एकमेकांवर ढकलत असतात. आईवडिलांचा सहर्ष स्वीकार करण्याची तयारी कोणीही दाखवत नाही. हे वृद्धत्त्व असहनीय तेव्हा होते जेव्हा आपलीच मुले नोकरांसारखा व्यवहार करतात. सतत टोमणे मारून अपमान करणे हे मरणयातना भोगण्यासारखे असते. काही कर्कश सुना आपल्या वयोवृद्ध सासू-सासर्‍यांना झाडू मारणे, कपडे धुणे, बाजार करणे अशी कामे करण्यास प्रवृत्त करतात. त्यांना औषधांसाठी पैसे वेळेवर मिळत नाहीत. अनेक वृद्धजन आपल्या भविष्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने आपल्या मुलांवर पूर्णपणे निर्भर राहतात. आधी भावनेच्या आहारी जाऊन बेधडक आपल्या आयुष्याची पूर्ण पुंजी मुलांच्या हवाली करतात आणि स्वतः कंगाल बनतात. अनेक वृद्धांना मासिक निवृत्तीवेतन मिळत नाही. त्यांना आपल्या मूलभूत गरजांसाठी मुलांकडे हात पसरावे लागतात. निदान आपल्या गोव्यात शासनाने वृद्धांना दयानंद निराधार योजनेअंतर्गत भरीव मासिक निवृत्तीवेतन देऊन अनेकांना दिलासा दिला आहे. उर्वरित देशात वृद्धांना अल्प वेतन मिळते. तेसुद्धा वेळेवर मिळत नाही. अनेक वृद्धजन आपल्या मानवाधिकारांबद्दल अनभिज्ञ असून त्याबद्दल सतर्कता दाखवत नसल्याने खूप अल्प मामल्यात ते आपल्या अधिकारांसाठी पुढे येतात. आज असेही आढळून आले आहे की अनेक कुटुंबात आईवडील मुलांबरोबर भावनिकरित्या जोडलेले असूनही एकूण सध्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीचा कल लक्षात घेता भविष्यात आपली मुले आपला सांभाळ करतील की नाही यावरचा विश्‍वास हरवत चालला आहे. त्यामुळे भविष्यातील आपली तरतूद आधीच करण्याची कल्पना अनेक कुटुंबांत रूजत आहे. आधी एकत्रित कुटुंबात एक एक व्यक्तीचा विचार केला जायचा. वयोवृद्धांच्या शब्दाला किंमत होती. त्यांच्याविषयी अतिशय आदराची भावना होती. त्यांचा सल्लाही मानला जायचा. त्यांनी अखेरपर्यंत कुटुंबात राहायचे असा अलिखित नियम होता. परंतु बदलत्या जीवनशैलीने, आधुनिकतेच्या वार्‍याने हे सारे संदर्भच बदललेले आहेत. पैसे कमावण्याच्या नादात आपले कुटुंब, नातीगोती यांच्याप्रती संबंधांमध्ये आपलेपणा हरवत चालला आहे. शहरात असो, गावात, मोजकीच कुटुंबे एकत्रित आहेत तर काही कुटुंबातील व्यक्ती लग्नसोहळा, धार्मिक सण किंवा इतर बर्‍यावाईट क्षणांपुरते एकत्रित येताना दिसतात. एकत्रित कुटुंब व्यवस्था ही भारतीय परंपरेचा एक प्रमुख भाग मानला जायचा. सार्‍या विश्‍वात या भारतीय सभ्यतेचा डंका पिटला जात असे. वृद्ध आजी-आजोबांच्या सहवासात मुले संस्काराचे धडे गिरवायचे आणि मुलेही त्याच संस्काराने मोठ्यांना सन्मान द्यायची. असं नव्हे की सर्वत्र वयोवृद्धांबरोबर दुर्व्यवहार होतो. त्यांच्या गरजा दुर्लक्षित केल्या जातात. परंतु आज अनेक घरांत त्यांच्या सल्ल्यांना महत्त्व राहिलेले नाही. त्यांच्याबरोबर चर्चा करण्यास कोणालाही वेळ नाही. ते कुटुंबात राहूनही वेगळे पडत आहेत.
आधुनिक काळात आईवडील दोघेही नोकरी करीत असल्याने मुलांना पाळणाघरात ठेवतात. हीच मुले वेळेअभावी आईवडीलांना पुढे वृद्धाश्रमात ठेवतील. मूळ मुद्दा असा आहे की, पैसे कमावणे जास्त महत्त्वाचे आहे. आज धडधाकड वृद्धजनही मुलांना नकोसे झाल्याने आश्रमाचा आश्रय घेतात. भारतीय संस्कृतीचा विचार करताना वृद्धाश्रमाची मान्यता नाही तरी १९९९ साली प्रत्येक जिल्ह्यात एक तरी वृद्धाश्रम असावा असा आयोगाचा प्रस्ताव आहे.कधीकाळी आपणही वृद्ध होऊ आणि आपली मुले आपल्याशी अशी वागली तर कसे वाटेल?