वीज दरवाढ स्थगितीचा प्रस्ताव : वीजमंत्री

कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त वीज नियमन आयोगाने सूचित केलेल्या वीज दरवाढीची अंमलबजावणी स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत ह्या प्रस्तावाबाबत सकारात्मक असून वीज दरवाढीबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत, अशी माहिती काल वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

संयुक्त वीज नियमन आयोगाने जून २०२० पासून वीज बिल दरामध्ये वाढ करण्याची सूचना केली आहे. विजेच्या बिलात प्रत्येक टप्प्यांमध्ये साधारण १० ते १५ पैसे एवढी वाढ सूचविण्यात आली होती. गेल्या मार्च २०२० पासून वीज दरवाढीचा प्रस्ताव होता. तथापि, कोविडच्या पार्श्‍वभूमीवर वीज दरवाढीचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला होता. आता आयोगाने वीज दरवाढीची सूचना करून जून २०२० पासून लागू करण्याची सूचना केली आहे, अशी माहिती वीजमंत्री काब्राल यांनी दिली.

थकबाकीदारांसाठी वन टाइम सेटलमेंट योजना राबविण्यावर विचार असून थकबाकीदार ग्राहकांकडून थकबाकीच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू केला होता. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर वसुलीला गती मिळालेली नाही. त्यामुळे वन टाइम सेटलमेंट योजना राबवून थकबाकी वसूल करण्यावर विचार केला जात आहे, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.