ब्रेकिंग न्यूज़
विहिरीवरील रहाट

विहिरीवरील रहाट

– संदीप मणेरीकर

आमच्या घरी पाण्याची विहीर आहे. पूर्वी विहिरीचं पाणी हाताने ओढून काढावं लागे. पाणी ओढण्यासाठी विहिरीवर लोखंडी चाक आहे. तिला गाडी असं म्हणतात. त्यात जाड दोरी म्हणजे राजू घालायचा, त्याला एक फास तयार करायचा, तो फास कळशीला बांधायचा. कळशी पाण्यात सोडायची व नंतर भरली की बाहेर खालून वर ओढून काढायची. आणि मग ते पाणी घरी नेऊन हंड्यात भरायचं. 

आमच्या या विहिरीचं पाणी कधी बाधत नाही असं दादा, आई, आजी म्हणायचे तसेच आज भाईही म्हणतो. आणि ते खरंच आहे. कोणालाच ते पाणी कधीच बाधत नाही. काही विहिरीचं पाणी प्यायल्यानंतर त्या पाण्यामुळे सर्दी-पडसे किंवा खोकला असे आजार होतात. पण या आमच्या विहिरीचं पाणी तसं बाधत नाही. हे पाणी फ्रीजमधल्या पाण्यासारखं थंडगार आहे. अजूनही आहे. या विहिरीत असलेल्या झर्‍याच वैशिष्ट्य म्हणजे, यात असलेला झर्‍याचं पाणी एका बाजूने येतं व दुसर्‍या बाजूने निघून जातं त्यामुळे पाणी साठून राहतं नाही. सतत वाहतं असल्यामुळे ताजं पाणी मिळतं. त्यामुळे या पाण्याची बाधा होत नाही आणि एक वैशिष्ट्य असं की या पाण्याची पातळी उन्हाळ्यात कधी कमी होत नाही. जेवढं पाणी आहे, तेवढंच ते राहतं. पावसात एका विशिष्ट टप्प्यापर्यंत हे पाणी येतं. पण वरती ते पाणी येत नाही. विहीर भरलेली आम्ही कधी अद्यापपर्यंत पाहिलेली नाही. पावसात निळं निळं पाणी वरपर्यंत येतं. पण विहीर पूर्ण भरलेली कधीच नसते.
या विहिरीवरून अनेक लोक पाणी भरून नेत असतात. आमच्या तीन घरांसाठी प्रथम ही विहीर बांधलेली होती. पण जवळच असलेल्या आवाठातील लोकांना उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवू लागली की आवाठातून लोक या विहिरीचं पाणी नेण्यासाठी येतात. त्यावेळी मला त्यांचे हाल जाणवत होते. कारण साधारण दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावरून येऊन डोक्यावर एक व कंबरेवर एक अशा दोन कळश्या किंवा घागरी घेऊन पाणी घेऊन जायला किती त्रास होत असावा याची जाणीव होती. पण तिथे आवाठात असलेल्या एक-दोन विहिरींना उन्हाळ्यात पाणी नसायचं. त्यामुळे त्यांचाही नाइलाज व्हायचा. अर्थात केवळ पिण्यासाठी व जेवणासाठी हे पाणी नेलं जायचं. कपडे, भांडी धुण्यासाठी नाल्यावरच्या पाण्याचा उपयोग केला जातो.
आज आवाठात सर्वत्र नळ आलेले आहेत. पण हे नळ केवळ पाण्याचं बिल आणि मीटरचं भाडं वसुलीसाठीच असतात. कारण सरकारी योजना ही कल्याणकारी असते असं मला कधीच जाणवलं नाही. असो. पण उन्हाळ्यात या नळांना कितीसं पाणी येतं हाही संशोधनाचा विषय आहे. आणि पाणी तुम्हांला मिळो अथवा न मिळो, मीटरचं भाडं तरी तुम्हांला भरलंच पाहिजे. असा हा न्याय. पण तरीही आमच्या या विहिरीचं पाणी कितीतरी जणांना मिळतं हेच आम्हां सगळ्यांना मोठं सुख होतं. त्यानिमित्त कितीतरी माणसं आमच्या घराला पाय लावून जात होती. चौकशी केली जात होती. ‘आवाठात राती काय जालां गे?’ असं म्हणून संवाद साधला जायचा. तर कधी कधी, ‘ए झीला, केवा रे इलय?’ असं म्हणून आमच्याशीही संवाद व्हायचा. त्यातून सुखदुःखाची देवाणघेवाण व्हायची. पान सुपारी खाल्ली जायची. अंगणात पडलेल्या आंबाड्यांची चव चाखली जायची.
आमच्या या विहिरीला पाणी काढण्यासाठी लोखंडाची गाडी होती. त्या गाडीला तेल घातलं की गाडी अगदी हलकी व्हायची. त्यामुळे दोरी ओढून पाणी काढणं सोपं व्हायचं. पण त्याच्याशिवाय आणखी एक रहाट असतो हे मला तरी माहीत नव्हतं. लाकडाचा रहाट. त्याला दोन्ही बाजूंनी हाताने कळशी ओढायला मुठी लावलेल्या असत. आडव्या पट्‌ट्या जोडून दोनेक फुटाचा हा रहाट तयार केला जात असे. कुडाळला माझ्या आतेभावाकडे असला रहाट मी पहिल्यांदा पाहिला. मात्र इतर ठिकाणी मी लोखंडाचीच गाडी पाहिली आहे. पहिल्यांदा या लाकडी रहाटाने पाणी काढायला मला खूप भीती वाटायची. बर्‍याचवेळा पाण्याने भरलेली कळशी काढताना अर्ध्यावरच हाताची जजमेंट चुकायची आणि अर्ध्यापर्यंत आणलेली भरलेली कळशी वेगाने परत विहिरीत जाऊन कोसळायची. त्यामुळे नेहमी भीती वाटायची. पण एक वेगळी मजाही यायची.
आम्ही आमच्या घरच्या विहिरीवरून पाणी काढण्यासाठी मी आणि माझा मोठा भाऊ, भाई गेलो की, बर्‍याचवेळा तो पाणी काढत असे. त्यावेळी पाणी काढताना दोरीचं टोक आपल्या हातात घेत असे व कळशी विहिरीत आत टाकून देत असे. टोक हातात असल्यामुळे दोरीसह विहिरीत कळशी जात नव्हती. बर्‍याचवेळा भाई पायाने त्या दोरीचं टोक हातात धरण्याऐवजी पायाने घट्ट दाबून ठेवायचा. त्यानंतर विहिरीत कळशी सोडायची. कळशी विहिरीत असलेल्या खडकांना कुठेही न आपटता सरळ आत पाण्यात जाऊन पडायची. मात्र कधी कधी आईच्या हातून चुकून दोरीसह कळशी विहिरीत पडायची. मग दादा सुपारी काढायच्या काठीने कळशी बाहेर काढत असत. या सुपारी काढायच्या काठीला एका बाजूला सुपारी कापून काढण्यासाठी धारदार कोयती असायची. त्या कोयतीचं टोक कळशीत घालून हळू हळू काठी वर उचलायची. विहिरीची खोली साधारण १५ ते २० फूट आहे. तेवढ्या वर ती कळशी काढणं म्हणजे तसं जिकिरीचं काम. एकतर कळशी पाण्यात गेल्यानंतर भरलेली असायची. उपडी पडली तर ठीक. उपडी पडली तर त्यात पाणी जात नाही ना? उताणी जर पडली तर ती पार तळालाच जात असे व पाणी भरून राहात असे. २५ फूट लांबीच्या त्या बांबूने ती कळशी वर काढली जात असे. कधी कधी ती दोरीच तुटत असे व त्यामुळेही कळशी विहिरीत पडत असे. पण कोणीतरी ती काढून देत असे.
आमच्या शेजारच्या घरात आमची काकी राहात होती. ती काकी खूप सोवळं-ओवळं पाळत असे. आम्ही साधारण दुपारच्या वेळी विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात असू. त्याचवेळी तीही पाणी नेण्यासाठी येत असे. ती आंघोळ करून दुपारच्या स्वयंपाकाला, पूजेला पाणी नेत असे. आम्ही आंघोळीला किंवा घरात पाणी भरण्यासाठी म्हणून येत असू. त्यावेळी ती काकी आम्ही विहिरीच्या कठड्यावर ठेवलेल्या कळश्याही आम्हांला काढायला लावत असे. तसंच आमचा राजू (दोरी) काढायला लावून आपली दोरी त्या गाडीत घालत असे. इतकी ती सोवळेपणाने वागत असे. आम्हांला तिच्या या अतिसोवळेपणाचा रागही यायचा. ती निघून गेल्यानंतर पुन्हा आम्ही आमची दोरी गाडीत घालायची व पाणी काढणं सुरू करत असू.
विहिरीवर उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही आंघोळ करत असू. कधी कधी मला व भाईला आमची बहीण संध्या ही पाणी ओढून काढून देत असे. तिथे एक दगडाची टाकी होती. त्या टाकीवर आम्ही उभे राहून आंघोळ करत असू. ती टाकी भरण्याचा आमचा प्रयत्न असे. पण ती कधी भरत नसे. कारण तिला एकतर खूप पाणी लागत असे. आणि तेवढं पाणी ओढून काढायला कोणी तयारही नसे. मी शिक्षणाच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी राहिलोय त्या त्या ठिकाणी मी हे विहिरीचं असं पाणी काढून आणण्याचं काम केलेलं आहे.
मनुष्याला पाणी हे सदैव लागतच असतं. त्यामुळे सतत हे रहाटाचं कुरकुरणं चालूच असायचं. त्यामुळेच रहाटगाडगे हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा. आता जरी हा रहाट नसला तरी आजच्या माणसाच्या जीवनात रहाटगाडगं हे चालूच आहे. सतत एकाच प्रकाराने चालणार्‍या प्रक्रियेला रहाटगाडगं असं म्हणतात. काही ठिकाणी विहीर बांधलेली नसते. आणि अगदीच जवळ विहिरीला पाणी लागलेलं असतं. अशा विहिरींना आड म्हणतात. अशा आड्यांवर हे रहाट नसतात. केवळ दोरी आत सोडायची व हाताने ओढायची अशी परिस्थिती असते. अर्थात या आड्यांवरून आड्यात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार ही म्हण निर्माण झालेली आहे.
हे असं रहाटावरून पाणी काढण्याच्या प्रक्रियेमुळे कितीतरी व्यायाम नकळत होत होता. सध्या मात्र ही परिस्थिती बदललेली आहे. आमच्या शेजारची ती काकी सध्या मुलाकडे रहायला गेल्यामुळे ती काही विहिरीवर पाणी भरण्यासाठी येत नाही. तर आणखी एक शेजारी, आमचे चुलत भाऊ त्यांनी नवीन विहीर खोदलेली आहे. त्यामुळे त्यांचाही या विहिरीशी काही संबंध फारसा येत नाही. आमच्या या विहिरीवर सध्या आम्ही पंप बसवलेला आहे. पंप बसवलेला असल्यामुळे केवळ एक बटण दाबलं की घरात टाकीत पाण्याचा ओघ सुरू होतो. त्यामुळे पाणी काढण्याचा व्यायामप्रकारही आपसूकच बंद झालेला आहे. आवाठातून कधी तरी कोणीतरी पाण्यासाठी येतात. पण त्यांनाही आता नळाचं पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे आवाठातून येणार्‍या बित्तंबातम्या सध्या जवळ जवळ बंद झालेल्या आहेत. केवळ पाण्याच्या निमित्ताने कितीतरी गुजगोष्टी होत होत्या. आज त्या सार्‍या बंद झालेल्या आहेत. केवळ एका नळाची सुविधा गावात आल्यामुळे कितीतरी मोती ओघळून जात आहेत.