विश्‍वजीतविरोधातील अपात्रता याचिका न्यायालयाने फेटाळली

कॉंग्रेस पक्षाने आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्याविरुद्ध दाखल केलेली अपात्रता याचिका काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली. या याचिकेसंबंधीचा युक्तीवाद गेल्या महिन्यात संपला होता व न्यायालयाने आपला निवाडा ११ ऑक्टोबर रोजी राखून ठेवला होता.

विश्‍वजीत राणे हे सध्या भाजपचे आमदार असून मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री आहेत. मार्च महिन्यात झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत विश्‍वजीत राणे हे कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर वाळपई मतदारसंघातून निवडून आले होते. पण त्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. नंतर २३ ऑगस्ट रोजी पोटनिवडणुकीतून ते भाजप उमेदवारीवर वाळपईतून निवडले गेले होते.
विश्‍वजीत राणे यांना जनतेने पुढील पाच वर्षांसाठी आमदार म्हणून निवडून आणले होते. मात्र, त्यांनी आमदारकीचा तात्काळ राजीनामा दिल्याने तसेच पक्षाचे राष्ट्रीय व्हीप धुडकावून लावल्याने कॉंग्रेस पक्षाने त्यांच्याविरुद्ध अपात्रता याचिका न्यायालयात दाखल केली होती.

मतदानात भाग न घेता पक्षाचे व्हीप मोडल्याचा राणे यांच्यावर आरोप होता. त्याशिवाय हंगामी सभापती हे त्यांचा राजीनामा स्वीकारू शकत नाहीत असाही दावा कॉंग्रेसने केला होता.,अर्जदाराने न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी सभापतींकडे करायला हवी होती, असे न्यायालयाने निवाड्यात म्हटले आहे.

न्यायपालिकेवर विश्‍वास
न्यायपालिकेवर आपला पूर्ण विश्‍वास असून कॉंग्रेस पक्षाने आपणावर दाखल केलेली अपात्रतेची याचिका न्यायालय फेटाळून लावेल याची आपणाला पूर्ण खात्री होती, असे विश्‍वजीत राणे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. आपणाला अपात्र केले जावे असे त्या याचिकेत काहीही नव्हते. कॉंग्रेस पक्ष दिवाळखोर झालेला असून काही नेत्यांनी आपल्या भ्रष्टाचारापासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच न्यायालयात ही याचिका दाखल केली होती, असेही ते म्हणाले. आपण पुन्हा कॉंग्रेसमध्ये जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.