विश्‍वजित राणे यांच्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

>> आदेशाचा मसुदा अभिप्रायासाठी पाठविला कायदे तज्ज्ञाकडे

आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे अपात्रता प्रकरणाच्या आदेशाचा मसुदा अभिप्रायासाठी कायदे तज्ज्ञाकडे पाठविण्यात आल्याने अपात्रता प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी काल दिली.

प्रभारी सभापती लोबो यांनी आरोग्य मंत्री राणे अपात्रता याचिकेवरील निवाड्यासाठी २२ मे २०१९ ही तारीख निश्‍चित केली होती. निवाड्यासाठी तक्रारदार सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांचे वकील आणि मंत्री राणे यांचे वकील उपस्थित होते. तथापि, प्रभारी सभापती लोबो उपलब्ध नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
या अपात्रता प्रकरणी आदेशाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या आदेशाच्या मसुद्यावर कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. त्याने आदेशाच्या मसुद्यात काही दुरुस्त्या सुचविल्या आहेत. ह्या दुरुस्त्या करून आदेशाच्या मसुद्यावर आणखी एका ज्येष्ठ कायदे तज्ज्ञाकडून सल्ला घेतला जाणार आहे. या आदेशाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्यात आल्यानंतर सुनावणी घेतली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी सभापती लोबो यांनी दिली.

आमदार गावकर यांनी जुलै २०१७ मध्ये आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्याविरोधात अपात्रता याचिका सभापतींसमोर दाखल केली होती. या अपात्रता याचिकेवरील पहिली सुनावणी ऑगस्ट २०१७ आणि दुसरी सुनावणी सप्टेंबर २०१७ रोजी घेण्यात आली होती. याचिकादार आणि मंत्री राणे यांच्या वकिलांनी लेखी स्वरूपात आपली बाजू मांडली होती. या याचिकेवर युक्तिवाद झाला नव्हता. २ मे २०१९ रोजी सभापतींसमोर याचिकेवर युक्तिवाद झाला होता.