ब्रेकिंग न्यूज़

विश्‍वजित राणेंविरोधातील अपात्रता याचिकेवर २ मे रोजी सुनावणी

>> प्रभारी सभापतींकडून संबंधितांना नोटीस

गोवा विधानसभेच्या सभापतींकडे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांच्याविरोधात सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर २ मे २०१९ रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.

विश्‍वजित राणे यांनी निवडून आल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपच्या उमेदवारीवरून आमदार म्हणून निवडून आले. कॉंग्रेस पक्षाने विश्‍वजित राणेंच्या विरोधात पक्षाचा व्हीप धुडकावल्याचा आरोप करून न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच वेळी सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी सभापतींसमोर मंत्री राणे यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती. ही अपात्रता याचिका गेले वर्षभर निर्णयाविना पडून आहे.
प्रभारी सभापती मायकल लोबो यांनी प्रलंबित याचिका निकालात काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. या याचिकेवर २ मे रोजी सुनावणी घेतली जाणार असून याचिकादार आमदार प्रसाद गावकर आणि मंत्री विश्‍वजित राणे यांना सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी सभापती लोबो यांनी दिली.

मगो-भाजप विलीनीकरण
याचिकाही यायला हवी
याचिका जास्त काळ प्रलंबित राहू नये. याचिकादाराला न्याय मिळाला पाहिजे. तसेच, ज्याच्याविरोधात याचिका दाखल केली त्यालाही न्याय मिळाला पाहिजे, असे लोबो यांनी सांगितले. सुनावणीसाठी ज्येष्ठ कायदे तज्ज्ञाचा सल्ला घेतला जाणार आहे, सर्व अंगांनी विचार विनिमय करून निर्णय घेतला जाणार आहे, असे लोबो यांनी सांगितले.
मगोच्या दोन आमदारांच्या गटाच्या भाजपमध्ये विलीनीकरणाबाबतची याचिकासुद्धा सभापतीसमोर आली पाहिजे, असे मत लोबो यांनी व्यक्त केले. या विषयावरील याचिका सध्या उच्च न्यायालयात दाखल असून ती येत्या दि. ३० एप्रिल रोजी सुनावणीस येणार आहे.