ब्रेकिंग न्यूज़

विश्‍वजितांच्या प्रमाणपत्राची गरज नाही ः शिवसेना

शिवसेनेला अशा कोणत्याही राजकारण्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जे स्वतः गोव्यातील राजकारणाचा दर्जा खालावायला कारणीभूत ठरले आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी मंत्री विश्वजीत राणे यांनी शिवसेनेच्या दर्जाबद्दल केलेल्या टीकेला काल दिले. आपल्या विधानांनी राणे यांनी स्वतःचे अज्ञान पाजळल्याची टीका त्यांनी केली.

गोव्यातील राजकारण्यांनी केलेल्या गलिच्छ राजकीय खेळीमुळेच पूर्ण देशात गोव्यातील राजकारण बदनाम झालेले असून गोव्याच्या राजकीय घडामोडी वाईट उदाहरण म्हणून वापरतात हा गोव्यातील सभ्य, सुशिक्षित लोकांचा अवमान असल्याची खंत एका प्रसिद्धी पत्रकातून कामत यांनी व्यक्त केली आहे.

सध्या मंत्री विश्वजीत राणे ज्या भाजपात आहेत तो पक्षही १९९४ मध्ये शिवसेनेसोबत युती केल्यामुळेच विधानसभेत पोहोचला. शिवसेना पक्षाला ख्रिस्ती बांधव जवळ करणार नाहीत असे विधान करून विश्वजीत यांनी स्वत:चे अज्ञान पाजळले असल्याची टीका कामत यांनी केली आहे.