विविध तालुक्यांत कोरोना रुग्णांमुळे नागरिकांत भीती

>> अनेक भागांमध्ये स्वयंस्फूर्त लॉकडाऊन ः गुरुवारी सापडले ३० नवीन कोरोना रुग्ण

मुरगाव तालक्यातील वास्कोमधील मांगूर हिल हा मोठ्या संख्येतील कोरोना रुग्णांमुळे गोव्यातील हॉटस्पॉट ठरला असला तरी या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग आता राज्याच्या अन्य काही तालुक्यांमध्येही पसरल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांगूर हिल पाठोपाठ आता सत्तरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या १४ वर गेली आहे. तर काणकोण तालुक्यातील अशा रुग्णांची संख्या काल एक नवीन रुग्ण सापडल्याने ४ वर गेली आहे. तिसवाडीतील प्रथम ताळगावातील कोरोना रुग्णापाठोपाठ काल पणजीशी संबंधित दोन कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने संसर्गाचे गांभीर्य वाढले आहे. यामुळे सत्तरीतील अनेक गावांसह उसगाव, पाळी येथे स्थानिकांनी लॉकडाऊन केले. तर आजपासून ५ दिवस कुळे-शिगाव लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.
सांगे, धारबांदोडा (कुळे), सासष्टी (मडगाव) या तालुक्यांमध्येही कोरोना रुग्ण सापडले आहेत. पेडणे तालुक्यात प्रथम पालयेत कोरोना रुग्ण सापडला होता. त्यानंतर काल कोरगावात दोघेजण पॉजिटिव्ह सापडले. सत्तरीतील गुळेली, मोर्ले, शिरोली, मलपण येथील काही व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह ठरल्या.

दरम्यान, आरोग्य सचिव नीला मोहनन काल पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, राज्यभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा फैलाव वाढत चालला आहे. मांगूर हिलनंतर वास्को परिसर, सत्तरी, तिसवाडी, सांगे, पेडणे, मडगाव, धारबांदोडा, कुळे, काणकोण आदी भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहेत. राज्यात ३० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनो पॉझिटिव्ह सध्याची रुग्ण संख्या ३५० वर पोहोचली आहे, अशी माहिती मोहनन यांनी दिली.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मांगूर हिलशी संबंधित १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. वेर्णा येथे ३, धारबांदोडा येथे १, रेल्वेतून आलेले ३, रस्ता मार्गाने आलेला १ आणि कोरोना बाधितांच्या संपर्कातील ९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती मोहनन यांनी दिली.

आरोग्य खात्याचे वास्को केंद्रात कार्यरत असलेले अनेक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून त्यांच्या कुटुंबीयांना सुध्दा कोरोना विषाणूची बाधा होत आहे. आरोग्य खात्याच्या कोविड १९ साठी काम करणार्‍या कर्मचार्‍यांची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये केली जात आहे. आरोग्य खात्याच्या कर्मचार्‍यांबरोबर कदंब महामंडळाचे कर्मचारी, पोस्ट खात्याच्या कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.

त्या ९० जणांचे
अहवाल निगेटिव्ह
ताळगाव येथील ९० जणांच्या स्वॅबचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. ताळगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर रुग्ण गेले कित्येक दिवस जीएमसीमध्ये उपचार घेत होता. ताळगावातील आणखी काही नागरिकांच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे, असे मोहनन यांनी सांगितले.